नथूराम व धोंडीबा दोघांचीही नाक्यावर वडापावची दुकानं होती. दोघांचेही वडापाव सरस होते. वडापावासोबतच समोसे, पेटिस, कांदा-बटाटा भजीही यांच्या दुकानांत विक्रीला असायची.
ही दुकानं फक्त संध्याकाळी उघडायची. सकाळी बाजारातनं माल आणणे, भाजी वगैरे पुर्वतयारी करण्यात ही मंडळी व्यस्त नि संध्याकाळी तेलाच्या कढईजवळ तळण काढणं, सुरीने पाव कापणं, तळलेली मिरची; सुकी चटणी; कांदा; वडापाव अगर भजीपाव बांधून भराभर पुड्या बांधणं, गल्ला सांभाळणं यात रात्र कधी व्हायची ते कळायचंच नाही. लहानथोर सगळ्यांच्याच छोट्या भुका भागवण्याची ही दोन हक्काची दुकानं होती.
नथूराम बीडचा. त्याचं कुटुंब तिकडे लांब बीडला रहायचं. दुकानाच्या आत असलेल्या छोट्या खोलीतच तो आपली पथारी पसरायचा, तिथेच वड्याभजींची तयारी करायचा. धोंडीबाची दोन्ही मुलं सुट्टीच्या दिवशी नथूरामकडे जायची, त्याच्याशी गप्पागोष्टी करायची. नथूरामही त्यांना आपल्या शिवाराकडल्या गोष्टी सांगायचा, आपल्या देखण्या बैलजोडीची महती गायचा. धोंडीबाच्या मुलांनी शेती पाहिली नसल्याने, किंबहुना फक्त पुस्तकातील धड्यांतच वाचल्याने नथूकाका सांगत असलेली माहिती त्यांना फार रोचक वाटायची. बाजूच्या आळीतच धोंडीबाचं घर होतं. धोंडीबा, त्याची दोन गोजिरवाणी मुलं नं बायको असं त्यांचं इवलंस घरकुल होतं.
त्या छोट्याशा परिसरात अधिकाधिक लोकं वस्तीला येऊ लागले, लोकसंख्या वाढली. विक्री सुधारू लागली तशी दोन्ही दुकानदारांनी हाताशी मदतीला नोकरही ठेवले होते पण शंभरातलं ऐंशी टक्के काम ते स्वतः करायचे.
धोंडीबाच्या बायकोच्या ओटीपोटात अधनंमधनं दुखे. डॉक्टरकडे नेऊन तपासलं तेव्हा शस्त्रक्रिया करावी लागेल असं निदान झालं. धोंडीबाची बायको चालढकल करत होती पण धोंडीबाने तिला इस्पितळात दाखल केलं नि दुकान बंद ठेवून घर नि बायको दोन्हीकडे लक्ष ठेवू लागला.
चारेक दिवस धोंडीबाचं दुकान बंद असल्याने त्याच्याजवळील गिऱ्हाईकं नथूरामच्या दुकानाकडे येऊ लागली. नथूरामचं नि त्याच्या नोकरांचं काम दुपटीने वाढलं. दुकानातनं क्षणभर बाहेर जाऊन बघायची फुरसत नव्हती.
तिसऱ्या दिवशी मात्र नथूरामने सकाळी धोंडीबाच्या दुकानाशेजारच्या फुलवालीकडे चौकशी केली तेव्हा कळलं की धोंडीबाची बायको एडमिट होती. चार दिवसांनी तिचं ऑपरेशन होणार होतं. नथूरामने जास्तीचा हिरवा मसाला, बटाटे घेतले. दोन्ही दुकानांच्या गिऱ्हाईकांची गरज भागवू लागला.
ऑपरेशनच्या दिवशी सकाळी मात्र तो धोंडीबाच्या घरी गेला. धोंडीबा मुलांसाठी भाजीभाकरी बनवून हॉस्पिटलला जायच्या तयारीत होता. नथूरामने धोंडीबाकडे वहिनीची चौकशी केली नि तो नको नको म्हणत असतानाही त्याच्या हाती दहा हजार रुपये ठेवले व त्याच्या लेकरांना घरून आणलेला वरणभाताचा डबा दिला. “वहिनी बरी होऊन लौकर येतेय बग घरला. मग परत दोन्ही दुकानं आपली साथीने चालतील बघ. काम्पीटीटर नाय तर मजा नाय बग दोस्ता!” असं म्हणत त्याने धोंडीबाची पाठ थोपटली तसं धोंडीबाच्या डोळ्यातून आसवं ठिबकली नि गालावर हसू उमटलं.