वाघोबा आणि त्याचे मित्र

Story: छान छान गोष्ट |
just now
वाघोबा आणि त्याचे मित्र

एक घनदाट जंगल होते. त्या जंगलात सगळे प्राणी मिळून मिसळून आनंदात राहायचे. वाघ, बिबटे, कोल्हे, हत्ती, हरण, भेकर, रानमांजर, ससे इत्यादी सगळेच आपापसात अगदी आपुलकीने जीवन जगायचे. इतकंच नव्हे, तर ते एकाच पाणवठ्यावर पाणीसुद्धा प्यायचे. माणसांसारखा भेदभाव जंगलातली जनावरं करत नसत.

जंगलातील उंच टेकडीवरील जांभळाच्या झाडावर बिटलु माकड बसला होता. त्याला जंगलाच्या दिशेने येणारी चार बंदूकधारी माणसं दिसली. त्याने सभोवतालच्या प्राण्यांना केकाटून सावध केलं. ती माणसं आपापसात काहीतरी बोलत होती पण उंच झाडावर असल्यामुळे माकडाला त्यांचं बोलणं नीट ऐकू आलं नाही. त्यांचं बोलणं ऐकण्याचं काम गवताळ भागात लपून बसलेल्या गट्टू सशाने पार पाडलं. ही माणसं शिकारीसाठी जंगलात आली होती. वाघोबाची शिकार करण्याचा त्यांचा बेत होता. एवढंच ससुल्याला कळलं व तो घामाने जागच्या जागी भिजून गेला.

ससुल्याकडनं माकडाला, माकडाकडनं हरणाला, हरणाकडून गवारेड्याला असं करत ही बातमी वाऱ्यासारखी जंगलभर पसरली. मग सगळ्याच प्राण्यांनी वाघाच्या रक्षणाचा भार स्वत:वर घेतला. शिकाऱ्यांची गोष्ट वाघोबाला सांगायची हिंमत मात्र जंगलातील कोणत्याच प्राण्याला झाली नाही.

उंच झाडावरून टुणकन उडी मारून बिटलू माकड खाली आले आणि म्हणाले, “काहीही झालं तरी वाघोबांची शिकार होऊ द्यायची नाही.” टिकलू हरण म्हणाले, “वाघोबा जंगलातून नाहीसा झाला, तर जंगलाचं वैभवच संपून जाईल.” कावरे वावरे झालेले भेकर म्हणाले, “हल्ली गावाकडील सगळी गुरं जंगलात चरण्यास येतात व जंगलातील चारा खाऊन टाकतात. आम्ही काय बरं खायचं? निदान वाघाच्या भीतीने ही गुरं जंगलाच्या अतिसंवेदनशील भागात येत नाहीत.” चितळ म्हणाले, “तृणभक्षी प्राण्यांना माणसाने हळूहळू संपवले व वाघोबाचं खाद्य कमी केले. जिवंत राहण्यासाठी त्याने जर गुरं मारली, तर यात वाघोबाची काय चूक?”

सांबर घाबरे घुबरे होऊन म्हणाले, “अगदी बरोबर! वाघोबा जंगलात असल्यामुळे इतर कोणी शिकारी सहसा जंगलात यायचं धाडस करत नाहीत. जरा जपूनच असतात. जर वाघच नाहीसा झाला, तर आमचंही काही खरं नाही.” सुळेवाला हत्ती दुरून हे सगळं ऐकत होता. वाघ नाहीसा झाला तर? ही कल्पना सुद्धा त्याला मानवली नाही. वाघोबाच्या डरकाळीने माणसांची उडालेली घाबरगुंडी त्याने एकदा पाहिली होती. तो म्हणाला, “वाघोबाच्या शिकारीला जर कोणी आलेच, तर त्यांना पहिल्यांदा माझ्याशी सामना करावा लागेल.”

तेवढ्यात कुठून मधमाशा आल्या. आपला घु घु असा आवाज करीत त्या म्हणाल्या, “आम्हीही तुमच्या मदतीला आहोत हो! शिकाऱ्यांना अशा चावू की त्यांना पळता भुई थोडी होईल आणि ते सैरावैरा पळत सुटतील.” चिटुकली मुंगी म्हणाली, “मी सुद्धा आहे बरं का तुम्हा सर्वांसोबत. मला काही तुम्ही कमी लेखू नका. मी शिकाऱ्यांना अशी कडकडून चावेन की त्यांना चांगलीच अद्दल घडेल.” तिच्या म्हणण्यावर सगळेच प्राणी हसत सुटले. या प्राण्यांचं आपापसात बोलणं चालू होतं खरं पण जंगलातील वाघोबाला ह्या गोष्टीचा थांगपत्ता नव्हता की शिकारी त्याच्या मागावर आहेत.

वाघ म्हणजे जंगलाचा आत्मा. त्याच्या रक्षणासाठी सगळ्यांनीच खारीचा वाटा उचलला होता. एवढं मात्र निश्चित होतं, की वाघापर्यंत पोहोचण्यासाठी शिकाऱ्यांना इतर प्राण्यांशी सामना करावा लागला असता. त्याचवेळी उंच झाडावर सावधपणे बसलेल्या बिटलू माकडाला वाघोबा दिसला. तो आपली नखं नाण्याच्या झाडाच्या खोडावर घासत होता. जणू काही तो शिकारीला जाण्यासाठी सज्ज होत होता. त्याने एक मोठी डरकाळी फोडली व जंगलातील सारे प्राणी सैरावैरा पळू लागले.

जंगलातील नियम मोडायचे नाही ते प्राण्यांना पक्कं ठाऊक असतं. पळताना जो तो म्हणत होता, 

“वाघोबाला शिकाऱ्यांच्या हाताला लागू द्यायचं नाही,

आपली शपथ मोडायची नाही” 

निदान माणसांपेक्षा जास्त या प्राण्यांना जंगलातील वाघोबाचं महत्त्व समजलं होतं जणू!


शितल नंदकुमार परब