हळदुली हळद

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
12th January, 03:22 am
हळदुली हळद

हातात घेताच आपले हात पिवळे करणारी हळद तुम्हा सर्वांना माहीत आहे. स्वयंपाकघरात, देवघरात, प्रथमोपचाराच्या पेटीत अश्या विविध ठिकाणी आपल्या घरी हळद असतेच. आपल्या भारतीय स्वयंपाकात तर हळद हा महत्त्वाचा घटक आहे . वरणाला, पोह्यांना पिवळा धम्मक रंग देणारी हळद. अशी ही हळद औषधांमध्ये सुद्धा वापरली जाते. आज आपण या हळदीविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. हळदीला संस्कृत भाषेत 'हरिद्रा' असे म्हटले जाते. 

कुठेही जखम झाली की त्यावर हळद पूड दाबून धरली की रक्तस्त्राव थांबतो आणि जंतुसंसर्ग न होता जखम सहज भरून येण्यास मदत होते हे आपण अनेक वेळा घरी बघितले आहे ना? 

सुंदर दिसण्यासाठी सुद्धा हळदीचा वापर उटण्यामध्ये, फेस पॅकमध्ये, साबण, फेसवॉश बनवण्यासाठी केला जातो. 

शरीरावर कुठेही मुका मार लागला किंवा एखादा शरीर भाग मुरगळला व त्या ठिकाणी सूज आली तर हळकुंड व आंबेहळद उगाळून तयार केलेले गंध गरम करून लावल्याने वेदना कमी होतात.

भूक लागत नसेल, तोंडाला चव नसेल तर ओली हळद, आले, लिंबाचा रस व मीठ घालून केलेले लोणचे खाल्ल्याने भूक लागते.

वारंवार आवाज बसणे, घसा दुखणे, सर्दी होणे, सुका खोकला येणे यासारख्या त्रासात २ चिमूट हळद व चमचाभर साजूक तूप घातलेले पिवळे दूध तुम्हाला आजीने दिले असेलंच. असे हळद घातलेले दूध प्यायल्याने घसा दुखायचा थांबतो, खोकला कमी होतो आणि आराम मिळतो. पण असे हे हळदीचे दूध रात्री पिऊ नये, तसेच छातीत खूप कफ असेल, खोकून भरपूर कफ असेल तर दूध पिणे टाळावे. खूप कफ असेल तर चिमूटभर हळद मधातून चाटावी.

आत्ता हिवाळ्यात कच्ची हळद बाजारात मिळते. तासून साल काढली की आतून पिवळी धम्मक दिसते, सोलणाऱ्याचे हात सुद्धा पिवळे होतात. थंडीत या ओल्या हळदीची भरपूर साजूक तूप घालून भाजी केली जाते. ही भाजी चविष्ट लागते, वारंवार सर्दी होणाऱ्यांनी थंडीत ओल्या हळदीेची भाजी एकदातरी खवी. ओल्या हळदीचे लोणचे सुद्धा बनवले जाते. 

पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा. हळद ही उष्ण आहे त्यामुळे हळदीचा अतिवापर टाळावा. तुमच्यासारख्या लहान मुलांना चिमूटभर हळद पुरेशी आहे. मोठ्यांनी सुद्धा जास्त प्रमाणात हळद वापरू नये. 

हळदीची पानं सुद्धा स्वयंपाक बनवताना वापरली जातात, नागपंचमीला हळदीच्या पानातल्या चविष्ट पातोळ्या तुम्ही खाल्ल्या असतीलंच. छान सुगंध या पानांना येतो. पिवळ्या धमक हळदीचे आरोग्यासाठी असलेले फायदे तुम्ही नक्की लक्षात ठेवाल आणि तुमच्या प्रथमोपचराच्या पेटीत हळद ठेवायला विसरू नका.


वैद्य कृपा नाईक,
आयुर्वेदाचार्य