जुन्या ‘मानिनी’ या मराठी चित्रपटात एक गाणे होते, “वनवास हा सुखाचा, सुखाचा. दिनरात लाभता हे सहवास राघवांचा.” सीतेच्या तोंडी असलेले हे गीत राजभोग आणि सर्व सुखसोयी त्यागून रामाबरोबर अरण्यात गेलेल्या सीतेला आपल्या प्रिय पतीचा सहवास लाभल्याने तिला जे सुख मिळते ते कशातच नाही मिळू शकत. इथे तिला मिळालेला रामाचा आणि निसर्गाचा सहवास तिला आनंद देत असतो. म्हणून सहवास कुणाचा आहे, कुणाबरोबर आहे यावर आपला आनंद, दु:ख अवलंबून असते.
एखाद्यासाठी सहवास हा ‘सु वास’ असू शकतो, जर तो तिच्या आवडत्या व्यक्तिसोबतचा असेल तर. जेव्हा ती व्यक्ति तिच्या खास मर्जीतली असते, तेव्हा त्या व्यक्तीचा सहवास हवाहवासा वाटत असतो. तर कधी कधी दुसऱ्याच्या स्वभावाशी जुळत नसेल, वारंवार खटके उडत असतील, तर नको त्या व्यक्ति बरोबर राहणे असे होऊन जाते. अशावेळी सहवास कुणाचा? हे खूप महत्त्वाचं ठरतं.
आईला आपल्या मुलांसोबत राहणं आवडत असतं. तिची ती मनापासूनची ओढ असते. पण कधीकधी आई जास्त कडकपणे वागणारी, सारखी शिस्त लावणारी, ओरडणारी, मारणारी असेल तर मुले तिच्यापासून दूर राहायचा प्रयत्न करतात. तिचा सहवास त्यांना नकोसा वाटतो. पती-पत्नीच्या नात्यात तर सहवासाचे अनन्य साधारण महत्त्व असते. एकाशिवाय दुसऱ्याचे पानही हालत नाही अशी स्थिती असणं हे महत्त्वाचं असतं. नाहीतर संपूर्ण आयुष्य ज्या जोडीदाराबरोबर घालवायचे त्याच्या सहवासाची ओढ वाटत नसेल, तर त्या वैवाहिक जीवनाला काहीच अर्थ उरत नाही. त्या सहवासाच्या सुखावर त्यांच्या जीवनाचे भवितव्य अवलंबून असते. कधी सहवासाने संसारसुख उमलत जाते, तर कधी करपून जाते.
सहवास म्हणजे स्वत: बरोबर दुसऱ्याला समजून घेणे असते. बसमध्ये, रेल्वेमध्ये प्रवास करताना अगदी थोडा वेळ ज्याचा सहवास लाभला असेल, असे सहप्रवासी भेटतात. त्याचेही आपण कधीकधी निरीक्षण करतो. कधी गप्पा मारून त्यांच्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. माहिती होत जाते. कधीकधी दोघांमध्ये गाढ मैत्रीही होते. आजकाल या मोबाईलच्या युगात अशी प्रत्यक्ष भेटणारी माणसे खूप कमी झालीत. आभासी युगात आपण वावरत असतो तेव्हाही माणसाची माणसाशी झालेली भेट आणि त्यातून निर्माण होणारा सहवास खूप महत्त्वाचा ठरतो. पण कधी कधी मात्र चुकीच्या माणसाचा सहवास हा वाईट परिणामाकडे नेणारा ठरू शकतो. विशेषत: तरुण वयातल्या मुलांची त्यांच्या समवेत राहणाऱ्या मित्रवर्गाची त्यांच्यावर छाप पडत असते. ती मुले जर चांगल्या संस्कारात वाढलेली, समजदार असतील, तर त्या मुलांच्या सहवासाचा नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. पण तीच मुले जर व्यसनी असतील, दुर्वर्तन करणारी असतील, तर त्यांच्या सहवासाने दोष लागू शकतात. “ढवळ्या शेजारी बांधला पवळा, वाण नाही पण गुण लागला” अशी परिस्थिती निर्माण होते. याला कारण ठरतो तो सहवास. चुकीचा सहवास चुकीची वाट दाखवतो.
योग्य सहवास हा स्वत:बरोबर इतरांचे आयुष्यही उजळवून टाकतो. सहवासाचा परिणाम किती होऊ शकतो या बाबत विनोबा भावे म्हणतात, “आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जर तळहातावर झेलला, तर तो पिण्यायोग्य असतो. जर पावसाचा थेंब गटारात पडला तर त्याची योग्यता अगदी शून्य होते. गरम तव्यावर पाण्याचा पडलेला थेंब हा वाफ होऊन नाहीसा होऊन जातो. कमळाच्या पानावर पडला, तर सूर्यकिरणांनी सोन्यासारखा चमकतो; तर शिंपल्यात पडला तर त्याचे रूपांतर मोत्यात होते. म्हणजे एक थेंब पाण्याचा, पण तो कुठे आहे त्यावर त्याचे भवितव्य किती अवलंबून असते ते कळते.” एखाद्या व्यक्तीच्या सहवासात येणाऱ्या माणसांमुळे त्याची पद, प्रतिष्ठा ठरत असते. “जनी नामयाची रंगली कीर्तनी” हे त्याचे सर्व सुंदर उदाहरण म्हणता येईल. लहानपणापासून जनाबाई नामदेवांच्या घरी राहिल्याने त्यांच्या सहवासात त्यांचेही मन विठ्ठल भजनी रंगले. त्यांनी ही अभंग रचना केली.
कानावर पडणारे विचार सहवासाने दृढ होत जातात. भक्तीच्या फुलांचा सुवास जिथे दरवळतो, तिथे राहणारी माणसे आपोआप भक्तिमार्गाकडे वळतात. संतांचा संग सहवास हा मनात परिवर्तन घडवून आणतो. गुरुचा सहवास लाभला, की शिष्य जास्त प्रगल्भ होत जातो. एखाद्या कलाकाराचा सहवास हा नेहमी जीवनात आनंद देणार ठरतो. चांगल्या कलाकृतीचा सहवास मन प्रसन्न करून जातो. पुस्तकांमध्ये ही शक्ति असते. जो पुस्तकाच्या सहवासात रहातो, तो आपोआपच विचार करू लागतो. त्याच्या मनावर चांगल्या विचारांचा पगडा दिसून येतो. वाचनाचा सहवास म्हणजे एक वरदान ठरते. तासन्तास माणूस तिथे रमतो.
प्रत्येकाच्या जीवनात काहीतरी श्रद्धास्थाने असतात. तिथे गेल्यावर तिथला सहवास लाभल्यावर मनाला शांती मिळते. कुणाला चर्चमध्ये जाऊन तिथल्या शांततेत राहिल्यावर मिळते, तर कुणाला मंदिरात थोडा वेळ थांबलं तरी मन प्रसन्न होतं. कुणाला अनाथाश्रमातल्या चिमुकल्या मुलांसोबत वेळ घालवला की छान वाटतं. कुणाला वृद्धाश्रमातील वयोवृद्धांना भेटून आपल्या आईवडिलांना भेटल्याचे समाधान मिळते. इथे सहवास किती वेळचा हे महत्त्वाचं नसतं, तिथे जाऊन प्रत्यक्षात भेटणं इतका सहवास पुरेसा असतो.
सध्याच्या मोबाइलच्या युगात प्रत्यक्ष भेटी कमीच होत चालल्या आहेत. त्यामुळे सहवासाचे सुख ही गरजेपुरते उरले असं म्हणायला हरकत नाही. नातेवाईक, मित्रमंडळी लांब दूरदेशी असले आणि मोबाईल आणि व्हिडिओद्वारे एकमेकांशी जोडले गेलेले असले, तरी प्रत्यक्ष भेटीचे सुख मात्र दुरावत चालले आहे. दूरच्या देशातली आपली मुले-नातवंडे कशी आहेत? कशी दिसतात? हे जरी आईवडिलांना वेळोवेळी दिसत असले, सतत त्यांच्या संपर्कात असले तरी प्रत्यक्षातली भेट मात्र कधी वर्ष, दोन वर्षांनी घडत असते. तेही आठ पंधरा दिवस सुट्टीला येतील तेव्हढाच सहवास लाभतो. कधीकधी पती दूरदेशी किंवा वेगळ्या प्रांतात कामानिमित्त राहत असतो तेव्हा त्याच्या कुटुंबातील लोकांना त्याचा सहवास अगदी कमी काळ लाभत असतो.
खरं तर जोडीदाराला फक्त आपल्या जोडीदाराचा सहवास हवा असतो. हेच त्याच्यासाठी महागडे गिफ्ट असते. एकमेकांनी एकमेकांसाठी दिलेला वेळ हा जास्त महत्त्वाचा असतो. मुलांचा सहवास म्हणजे निखळ आनंद असतो मुलांबरोबर तुम्हीही लहान मूल होऊन जाता तेव्हा मिळणारा आनंद हा अधिक आनंददायी असतो.
हल्लीच एक सहवास या विषयावर टिप्पणी वाचनात आली. विचार करायला लावणारी होती. ‘बायको बरोबर थोडा वेळ घालवून बघा आयुष्य किती अवघड आहे ते कळेल. शिक्षकासोबत थोडा सहवास लाभला की तुम्हाला परत विद्यार्थी व्हावेसे वाटेल, आईवडिलांसोबत वेळ घालवला तर त्यांनी तुमच्यासाठी केलेल्या कष्टाची जाणीव होईल. शेतकऱ्याच्या सहवासात राहून पहा, धान्य उगवण्यापासून विकण्यापर्यंत त्याचे कष्ट दिसतील, मग तुम्ही पानात उष्टं टाकणार नाही. संन्याशासोबत राहिल्याने आपल्या मनातही दानाची भावना निर्माण होईल. वारीतल्या एखाद्या वारकऱ्यासोबत राहून बघा, अहंपणा गळून जाईल. निसर्गाचा सहवास तुमच्या मनमोराचा पिसारा फुलवेल, आनंदी वाटू लागेल. चांगल्या मित्र मैत्रिणीसोबत राहिलात तर जीवन सुखी होईल. इतके सारे सहवासाचे परिणाम बघायला मिळतात. म्हणूनच सहवासाची गोडी कायम टिकून आहे आणि ती तशीच राहणार आहे.
प्रतिभा कारंजकर, फोंडा