आपल्या अवतीभोवती हसतमुखाने वावरणारी माणसे असली की एक उत्साही, आनंदी वातावरणाची निर्मिती होते व त्या वातावरणात काम करायला हुरूप येतो. एखाद्या घरात हास्यमुखाने स्वागत करणारी, त्या घरात राबणारी गृहस्वामिनी, अन्नपूर्णा असली की आपोआप घरात सकारात्मक ऊर्जा संचारते. घर कसे आनंदी, प्रसन्न राहते.
काल खूप वर्षानंतर मला एका लग्नसोहळ्याला माझी बालमैत्रीण भेटली. शारीरिकदृष्ट्या आम्ही बदललेलोच... पण ती मात्र अगदी खळखळून हसत बोलत होती. मी मात्र स्मितहास्य करीत बोलत होते. तिने ते बरोबर टिपले. सहज म्हणून गेली, "काय गं तू आधीसारखी नाहीस...? जणू हसणेच विसरलीस."
लग्नसोहळा उरकून मी घरी आले. रात्री झोपताना मनात विचारांची खळबळ सुरू झाली. तिचे म्हणणेही खरेच होते. काळाच्या ओघात, संसाराच्या रहाटगाड्यात माझे ते खळाळते हास्य कुठेतरी विरून गेले होते. कदाचित संसारात मुरताना मी हसणे विसरून गेले होते. मला बालपणी अगदी खळखळून हसण्याची सवय होती, त्यामुळे एखादा तरी साधा विनोद घडला तरी मी अगदी खळखळून हसायची. मलाही ते माझ्या निखळ हास्याने काठोकाठ भरलेले दिवस आठवले. हायस्कूलमध्ये शिकताना आमच्या मराठी विषयाचे शिक्षक मला "हास्य सम्राट" म्हणायचे. एकदा मराठीच्या तासाला मला खळखळून हसताना पाहून एका मुलाने मला चिडवण्याच्या हेतूने, "काय बत्तीशी दाखवून हसतेस ग येडपट कुठली? गप्प बैस!" असे म्हटले. यावर सरांनी आम्हाला वर्गात हसण्याचे महत्त्व सांगितले आणि सरांनी त्या मुलाची बोलती बंद केली. घरी परतल्यावर जेवताना आई-बाबांना मी ही वर्गात घडलेली गोष्ट सांगितली. त्यावर आई म्हणाली, "पोरीची जात तुझी, असे फिदीफिदी हसणे बरे नव्हे." त्यावर बाबा म्हणाले, "अगं हसू दे की तिला मनसोक्त, माझी कन्या एखाद्या मुलापेक्षाही समजूतदार आणि हुशार आहे."
काळाच्या ओघात, स्वानुभवातून मी खूप काही शिकत गेले. मला हळूहळू कुठे व किती हसायचे ते समजत गेले, उमजत गेले आणि माझे हसणे हळूहळू कमी होत गेले. हसणे ही जगातील अगदी सुंदर, मनमोहक अदा. देवाने माणसाला दिलेले सुंदर भावनिक दान म्हणजे हास्य. स्मितहास्यी मुखकमल पाहिले की मन प्रसन्न होते. त्यातल्या त्यात तान्हुल्या बाळाचे हसू तर अतिशय आनंददायी. निरागस बाळाला झोपेत हसताना पाहिले की आपण म्हणतो देव त्याला झोपेत हसवतो. हसण्याने निर्भेळ आनंद गवसतो आणि मनावरचा ताणतणाव कमी होतो असे मानसशास्त्रज्ञ म्हणतात. या दुनियेत व्यक्ती तितक्या प्रकृती, त्या म्हणीप्रमाणे प्रत्येक मनुष्याच्या हास्याचे प्रकार निरनिराळे. काही माणसे खळखळून हसतील, तर सर्वसाधारण माणसे स्मितहास्य करतील, तर काही गालातल्या गालात कोपरकळी फुलवीत हसतील. काही माणसे "हा...हा...हा...ही...ही...ही...हु...हू..." अशा प्रकारचे आवाज काढून हसतील. काही माणसे झोपेत हसतील. माणसाचे हसणे त्याची प्राप्त परिस्थिती, मानसिक स्थिती, जसे विजय, आत्मसुख, आनंद यावर अवलंबून असते. थोडक्यात सांगायचे झाल्यास हसणे हा एक आपल्या मनातील आनंद व्यक्त करण्याचा दिलखुलास, सुंदर मार्ग. मनमुराद हसण्याने मनुष्य निरोगी राहतो व दीर्घायुषी होतो, मग तो पुरुष असो किंवा स्त्री.
आपल्या अवतीभोवती हसतमुखाने वावरणारी माणसे असली की एक उत्साही, आनंदी वातावरणाची निर्मिती होते व त्या वातावरणात काम करायला हुरूप येतो. एखाद्या घरात हास्यमुखाने स्वागत करणारी, त्या घरात राबणारी गृहस्वामिनी, अन्नपूर्णा असली की आपोआप घरात सकारात्मक ऊर्जा संचारते. घर कसे आनंदी, प्रसन्न राहते. नवनिर्मितीच्या यशामुळे प्रकट होणारे हास्य, कष्टाच्या, मेहनतीच्या श्रमसाफल्यामुळे निर्माण होणारे ते हास्य अनमोल आहे. शृंगाररसातील हास्य अभिव्यक्तीत भावनिक सुखाची मोहकता जाणवते, तर विजयातील हास्य अभिव्यक्तीत वीरत्वाचे, आत्मसन्मानाचे समाधान लाभते. भक्तीरसातील ते निर्मळ हास्य म्हणजे आपण भक्तिमार्गाद्वारे त्या परमात्म्याशी जोडलो गेल्याचा भक्तिमय विश्वास असतो. या हास्याचा आणि विनोदाचा एक आगळावेगळा घट्ट नातेसंबंध आहे. ज्या विनोदाने मानवी जीवनातील दुःख, कष्ट, त्रास यांचे काही काळापुरते का होईना विस्मरण होते, तो खरा विनोद. हास्यातही जेव्हा नयनी अश्रू तरळतात, तेव्हा त्या विनोदातील हास्य-आनंद हा सर्वश्रेष्ठ असतो. गंमत म्हणजे माणूस जन्माला येताना रडत येतो, आयुष्यभर स्वतः रडतो, इतरांनाही रडवतो आणि हसण्याचे नाटक करीत जगतो आणि या दुनियेचा निरोप घेताना कोणाला रडवतो तर कोणाला हसवतो. आजच्या या मुखवट्याच्या दुनियेत दिवसेंदिवस हसणे दुर्मिळ होत चालले आहे. आधुनिक जगात माणसाने कधी, कुठे, कसे हसावे ह्याचेही त्याला सदैव भान ठेवावे लागते. अजब दुनियेत विनाकारण हसणाऱ्यांना वेड्यात काढतात, न हसणाऱ्यांना मठ्ठ म्हणतात. स्वतः हसून हसून इतरांना शेंडी लावणारे 'भामटे' या जगात पावलोपावली सापडतात. या दुनियेत मानवी हास्याचे किती प्रकार म्हणून सांगू? एखाद्याची ओळख करून देताना माणूस स्मितहास्य करतो. चुटकुला, विनोद घडून आला तर तेथे हशा पिकतो, परिस्थितीचे भान लक्षात घेऊन आतल्या आत दबके हसणे. विरोधी पक्ष, राजकारणी हस्तांदोलन करीत राग, द्वेष मनात असूनही त्यांचे नाटकी हसणे. प्रतिथयश हास्यकवीचे काव्य ऐकताना काव्यात हास्य नसतानाही हसणे. हास्य क्लबला व्यायाम करताना जीवाच्या आकांताने, बळजबरीने हसणे असे हे अनेक हास्यप्रकार.
मानवी जीवन हे सुख-दुःखांचे भांडार. जीवन मार्गावर अगदी आपण नाकासमोर पाहून चालावे म्हटले तरी वाटेत दगडधोंडे पाय ठेचकाळतात. म्हणून काय आपण हसायचे सोडायचे का? दिग्गज हास्यकवी मंगेश पाडगावकर आपल्या काव्यात म्हणतात, "माणसाने जगावं कसं, हसत हसत की रडत रडत...?" मी तर म्हणेन हसत हसत आणि इतरांना हसवत जगावे, कारण इतरांना आपण हास्यसुख देतो याचा आनंद उच्च कोटीचा असतो. आपण हसत जगलो काय, रडत जगलो काय...? कष्ट, त्रास, दुःख, विवंचना काही जन्मभर माणसाचा पाठलाग सोडतच नाहीत. उलट प्राप्त परिस्थितीत आपण हसत जगलो, तर प्राप्त परिस्थितीशी दोन हात करण्याचे बळ नक्कीच वाढेल आणि जीवन सुकर होईल. आपल्या साधुसंतांनी सांगितले आहे, मनात द्वेष, ईर्षा, मत्सर न ठेवता अगदी निरागस दृष्टीने इतरांकडे पाहिले व तसे वागलो, तर आपणही अगदी जीवनाचा निखळ आनंद घेत घेत आपलं जगणं सुकर करू शकतो.
पाच जून हा जागतिक हास्य दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. त्यानिमित्ताने का होईना, काळाच्या ओघात हसणे विसरलेल्यांना हसण्याचे महत्त्व परत एकदा पटू लागते व हास्यठेव्याची महती समजते.
- शर्मिला प्रभू
आगाळी फातोर्डा 9420596539