माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरू!

माणुसकीवर होणारे हल्ले आणि त्यांना दिलेले प्रत्युत्तर! ग. दि. माडगूळकरांच्या 'जिंकू किंवा मरु!' या समरगीताच्या अनुषंगाने, इतिहासातून शिकवण घेत, देशाप्रती कर्तव्यभावनेतून होणाऱ्या सामूहिक संघर्षाचे महत्त्व विशद करणारा लेख.

Story: शब्दगीते |
09th May, 09:49 pm
माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरू!

जेव्हा माणुसकीवर हल्लाबोल होतो, तेव्हा युद्ध होणे हे अटळ असते. देशात अराजकता माजवण्यासाठी निरपराध जनतेला जेव्हा बळी बनवले जाते, तेव्हा समाजात क्षोभ उसळतो. ज्या निरपराध जनतेला लक्ष्य बनवले जाते, त्यांच्या आणि अशा वेळी त्यांच्या परिवाराला तर दु:खाची परिसीमा म्हणजे काय हे माहीत नसते.

ज्या ज्या वेळी आपल्या देशावर परकीयांचे आक्रमण झाले, त्याला भारतीयांनी धीराने तोंड देत त्याचा प्रतिकार केला आणि आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेतला. याला इतिहास साक्षी आहे. तरीही आपण गाफील राहतो ही आपली चूक आहे. इतिहासातही अशा खूप चुका झाल्या आणि त्यामुळे मोठी हानी झाली. या इतिहासापासून आपण खरे तर शिकायला हवे. पण या इतिहासापासून आपण काहीच न शिकता गाफील राहतो आणि मग आपल्या देशावर, आपल्या निरपराध जनतेवर हल्ले होत राहतात. त्यासाठी प्रत्येकाने सजग राहताना, चांगले आरोग्य राखताना आपल्या स्वत:चे संरक्षण करण्यासाठी सजग राहणे गरजेचे आहे. कारण जेव्हा कधी काळी अचानक माणुसकीवर हल्ला होतो आणि मग युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते, तेव्हा त्याला सामोरे जाताना जिंकू किंवा मरु हे ब्रीद पुढे ठेवावे लागते.

देश पहिला म्हणजेच सर्वप्रथम देश. हा संदेश जेव्हा प्रत्येक भारतीयाच्या मनात रुजतो, तेव्हा देशाप्रती स्वाभिमान जागृत होतो. हा स्वाभिमान एकदा का मनात जागृत झाला, की देशप्रेम मनात रुजते व तिथे ते अंकुरतेही. ही भावना जेव्हा बालवयात रुजते, तेव्हा देशाची भावी पिढी ही मनात निस्सीम देशप्रेम घेऊनच मोठी होते. आणि या स्वाभिमानी देशप्रेमी पिढीमुळे देशाचे भवितव्य हे सुरक्षित हातात आहे याचे समाधान लाभते."

प्रतिभाशाली ज्येष्ठ गीतकार ग. दि. माडगुळकर यांनी आपल्या वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश करतानाच कथाकार, पटकथाकार, गीतकार, निर्माता अशा विविध भूमिका साकारताना १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहित या क्षेत्रात आपले भक्कम स्थान निर्माण केले. कविवर्य ग. दि. माडगूळकर यांनी"

“ माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरू

जिंकू किंवा मरु !...”

हे जाज्वल्य देशप्रेमाने ओतप्रोत भरलेले समरगीत जेव्हा लिहिले, तेव्हा या समरगीतातील शब्दाशब्दांतून देशप्रेम ओसंडून वाहताना दिसून येते. या समरगीताला प्रख्यात संगीतकार वसंत देसाई यांनी गायक महेंद्र कपूर यांच्या आवाजात सादर करताना असे काही संगीत दिले की, हे गाणे ऐकताना आपण भारतीय आहोत, याचा अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही.

लढतील सैनिक, लढू नागरिक

लढतील महिला, लढतील बालक

शर्थ लढ्याची करू, जिंकू किंवा मरु!

युद्ध एकदा पेटले की मग त्यात देशातील सर्वच नागरिक सामील होतात. मग ते सीमेवर लढणारे जवान असोत किंवा घरातील महिला किंवा बालके असोत... प्रत्येकाचा काही ना काही अर्थाने या लढ्यात आपला सहभाग असतोच. त्यांनी दिलेल्या धीराच्या चार वाक्यानेही लढणाऱ्यांनाही धीर मिळून जातो आणि देश संघटित होण्यास मदत होते.

आपल्या देशाचा इतिहास हा वैभवशाली आहे. शिवरायांनी मोगल साम्राज्याशी टक्कर देताना स्वराज्य अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. झाशीची राणी लक्ष्मीबाईने तर आपल्या लहान मुलाला पाठीशी बांधून आपले शिर तळहातावर घेऊन म्हणजेच आपल्या प्राणांची पर्वा न करता दुश्मनासोबत शर्थीची लढाई केली. देशाच्या या सुपुत्रांनी आपल्या देशासाठी वीरमरण पत्करले. त्यांच्याबद्दल सांगताना ग. दि. माडगूळकर म्हणतात...

देश आमुचा शिवरायाचा

झाशीवाल्या रणराणीचा

शिर तळहाती धरू

जिंकू किंवा मरु

जेव्हा दुश्मनाचा हल्ला होतो, तेव्हा त्याला निकराचे प्रत्युत्तर द्यायलाच हवे. शस्त्राला शस्त्र हेच खरे उत्तर आहे. आपली भूमी बळकावण्याचा कुटील हेतू मनात ठेवून दुश्मनाचा जेव्हा हल्ला होतो, तेव्हा एक तसूभरही जमीन शत्रूच्या ताब्यात येऊ नये यासाठी जिंकू किंवा मरु हाच नारा कायम ठेवावा लागतो. हे सांगताना कवी म्हणतात,

शस्त्राघाता शस्त्रच उत्तर

भुई न देऊ एक तसूभर

मरु पुन्हा अवतरू

जिंकू किंवा मरु!

दुश्मनांचा जेव्हा हल्ला होतो, तेव्हा त्या हल्ल्याला जेव्हा प्रत्युत्तर देण्यात येते, तेव्हा काही प्रमाणात हानी ही होणारच... ही हानी अटळ आहे. त्याशिवाय शत्रूला प्रत्युत्तर देणे शक्य होणार नाही. दुश्मनांचा हा संग्राम पिढ्यानविढ्या चालत राहणार असला तरी अंतिम क्षणी विजय हा आमचाच आहे, याची खात्री आहे, आणि म्हणूनच ग. दि. माडगूळकर आपल्या या गाण्याच्या अंतिम कडव्यात लिहितात,

हानी होवो कितीही भयंकर

पिढ्यानपिढ्या हा चालो संगर

अंती विजयी ठरू!


- कविता आमोणकर