मुलं पाहतात तसं शिकतात

पालक हे मुलांसाठी पहिला आरसा असतो. मुलं तुमचं अनुकरण करतात. तुम्ही जेवढं सकारात्मक आणि प्रेमळ वागाल तेवढं ते तुमच्याकडून शिकतील. दुसऱ्यांबद्दल द्वेष बाळगणं, आपली मतं लहान मुलांवर लादणं, त्यांना चुकीच्या मार्गाकडे ढकलणं हे टाळायला हवं.

Story: सांगत्ये ऐका |
09th May, 10:20 pm
मुलं पाहतात  तसं शिकतात

लहान मुलं बोलायला लागण्याआधीच बघायला, समजायला लागतात. मुलं आपल्या वागण्याकडे फारसं लक्ष देत नाहीत. असं आपल्याला वाटतं, पण हे पूर्णपणे खरं नाही. लहान वयातली मुलं जास्त ऐकत नाहीत, ती पाहतात आणि पाहूनच शिकतात. घरातल्या मोठ्या माणसांचं बोलणं, वागणं, भावना व्यक्त करण्याची पद्धत आणि इतरांशी असणारे संबंध  हे सगळं मुले लहान वयातच आत्मसात करू लागतात. आपण कुणाशी कसं वागतो, कसं बोलतो, ते पाहूनच मुलं त्याच पद्धतीनं वागायला लागतात. 

शाळा, शिक्षक, पुस्तक हे सगळं तर पुढच असतं. पहिल्या काही वर्षांमध्ये मूल आपल जग फक्त घरापुरतच पाहतं. जर आई बाबा एकमेकांशी प्रेमाने बोलत असतील, आदराने वागत असतील, तर मूलही तसंच शिकतात. पण जर सतत राग, ओरड, तक्रारी किंवा इतरांबद्दल तुच्छ बोलणं चालू असेल तर मूलही नकळत तेच शिकायला लागतात.

अनेक पालक आपल्या व्यक्तिगत अनुभवांतून ठराविक लोकांबद्दल द्वेष, तिरस्कार करतात आणि आश्चर्य म्हणजे, तीच भावना ते आपल्या मुलांनाही देतात. “त्याच्याशी बोलू नकोस”, “तिचं वागणं बघून घ्यावं”, “हे लोक आपल्यासारखे नाहीत” अशा प्रकारचे विचार मुलांना सांगितले जातात. ही गोष्ट मुलांच्या मनात एक प्रकारचा द्वेष निर्माण करते. त्यांना न समजता कोणावर नकारात्मक मत बिंबवलं जातं. हळूहळू तेही इतरांविषयी मत तयार करू लागतात तेही कोणतेही अनुभव न घेता केवळ ऐकलेल्या किंवा पाहिलेल्या गोष्टीवरून. 

आई वडील म्हणून आपण नेहमी म्हणतो की मुलांना चांगलं शिकवा, पण शिकवणं म्हणजे केवळ उपदेश देणं नव्हे तर जे आपण वागण्यात दाखवतो, तेच मूल खऱ्या अर्थाने शिकत असतात. जर आपण दुसऱ्यांशी सहनशीलतेने, प्रेमाने, समजून घेण्याच्या वृत्तीने वागलो, तर आपल्या मुलांमध्येही तेच गुण आपोआप येतात. पालक हे मुलांसाठी पहिला आरसा असतो. मुलं तुमचं अनुकरण करतात. तुम्ही जेवढं सकारात्मक आणि प्रेमळ वागाल तेवढं ते तुमच्याकडून शिकतील. दुसऱ्यांबद्दल द्वेष बाळगणं, आपली मतं लहान मुलांवर लादणं, त्यांना चुकीच्या मार्गाकडे ढकलणं हे टाळायला हवं. ‘मुलं तुमचं ऐकत नाही, तर ती तुम्हाला पाहून शिकत असतात.’ हा विचार मनात ठेवून प्रत्येक पालकाने स्वतःचं वागणं समजून घेणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जसं वागाल, तुमचं मूलपण तसंच घडेल.

पालकत्व ही एक जबाबदारी आहे. पण ती केवळ मुलांना वाढवण्यापुरती मर्यादित नसते. आपल्या प्रत्येक कृतीचा परिणाम आपल्या मुलांवर होतो हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मुलांना फक्त अभ्यासात हुशार बनवणं पुरेसं नाही. तर त्यांना चांगलं 'माणूस' बनवणं हे खऱ्या अर्थाने महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपली कृतीच त्यांचं शिक्षण ठरतं.

शेवटी इतकंच सांगावस वाटतं की, मुलं ही मोठ्यांची सावली असतात. आपण जसं वागतो, बोलतो, वागणूक देतो त्यातूनच त्यांचा विचार घडत असतो. म्हणूनच आपल्या वागण्यात सुसंस्कृतपणा, सहनशीलता, समजूतदारपणा आणि आदर असणं अत्यंत गरजेचं आहे.


- वर्धा हरमलकर, भांडोळ