तुमच्या मनातही सतत एक 'रेडिओ' सुरू असतो का? या लेखात मन का रेडिओ अर्थात आपल्या आंतरिक टीकाकाराचे स्वरूप, त्याचे नकारात्मक आणि सकारात्मक पैलू आणि त्याला योग्य फ्रीक्वेन्सीवर ट्यून करण्याची कला उलगडली आहे.
“असं वागायची गरज होती का खरंच?”
“हे मी नीट केलं का?”
“दुसरं कोणी असतं तर कदाचित हे जास्त प्रभावी ठरलं असतं...”
या प्रश्नांनी तुमचाही पाठलाग केलाय का? कारण माझ्या मनाच्या दालनात, या प्रश्नांची माळ रोज कुठेतरी गुंफली जाते. आणि विशेष म्हणजे, हा आवाज एकच असतो, पण त्याचे चढ-उतार, फ्रीक्वेन्सी आणि भास सतत बदलत असतात. अहो, घाबरू नका... आवाज ऐकू येतात म्हणून! हे आवाज आपल्याच मनातल्या ‘त्याचे’ आहेत. तो म्हणजे कोण?
आपला रेडिओ! हो! आपल्या डोक्यात एक छोटंसं रेडिओ स्टेशन सतत सुरू असतं. गेल्या आठवड्याच्या लेखातली मौनातून जाणवलेली मनातली खुसपुस आठवते? ती खुसपुस ब्रॉडकास्ट कोण करतं? हाच आपला रेडिओ! एक असंख्य आठवणींनी, निर्णयांनी, चुकांनी आणि स्वप्नांनी बनलेला. हा रेडिओ, सकाळी डोळे उघडायच्या आधीच सुरु होतो. उठल्यावर पहिलं डायलॉग, “कालचं उत्तर ईमेलमध्ये तसं का टाकलंस? त्या शब्दाचा इम्पॅक्ट गेला की गं!” तेव्हा त्याचा आवाज थोडा कडवट, थोडा हुकमी, आणि थोडा अस्वस्थ करणारा वाटतो. तर कधी तोच आवाज एक विचारशील सल्लागार होतो.
परंतु हा आवाज नेमका जन्म घेतो कसा?
मनाच्या हळव्या पटांगणावर लहानपणापासून जे जे काही उमटलेलं असतं, ते सगळं आत कुठे तरी साठत जातं. आणि ज्या क्षणी बाहेरून मिळणारी तुलना, अपेक्षा किंवा अपूर्णतेची जाणीव आपल्या मनाच्या भिंतीवर चिकटते, त्या क्षणी आपण तयार करतो आपलं प्रायव्हेट रेडिओ स्टेशन – Inner Critic 101.1 FM अर्थात आपला पर्सनल टीकाकार!
अरेरे, हा आवाज नेहमीच त्रासदायक असतो का?
नाही. जसं ‘तारक मेहता का उलटा चष्मा’चं ब्रीदवाक्य म्हणतं, “प्रॉब्लेम हैं सबके पास, बस नजरिये की हैं बात!” तसंच आपल्या या रेडिओबाबतीतही आहे. कारण, हा आवाज सुरुवातीला तुम्हाला थांबवतो, गोंधळवतो, पण त्याच्यात एक फार महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपला दृष्टिकोन बदलण्याची क्षमता.
अगदी उदाहरणच द्यायचं झालं, तर एकदा मी एका क्लायंटचे केसवर्क नोट्स लिहून ठेवत होते आणि अचानक तेव्हा वाटलं, “अरे, हे खूपच क्लिनिकल झालंय, थोडं सोपं लिखाण हवं होतं.” माझा आतला रेडिओवर लगेच प्रक्षेपण झालं... "इतकं वर्षांचं अनुभव असूनही ही बेसिक गोष्ट चुकली कशी?"
ऐकून माझ्या मनात प्रचंड खिन्नता दाटून आली. पण मज्जा म्हणजे, थोड्या वेळाने दुसऱ्या आवाजाने हळूच सांगितलं, “यातून शिकायचं आहे तुला... पुढच्या वेळेस लिहिताना ही जाणीव उपयोगी ठरेल.” त्या दिवशी मला जाणवलं की हा ‘टीकाकाराचा’ जर आपण माइंडफूल उपयोग केला, तर तो एक सजग निरीक्षक व आपला पर्सनल गाईड बनू शकतो.
‘मन का रेडिओच्या’ दोन फ्रीक्वेन्सी – AM आणि FM
AM – Autopilot Mode:
हा आवाज साचलेला असतो. जुन्या भीतीवर आधारित. ‘मी चुकले की काय?’ या गृहितकावर चालणारा. हा आवाज निर्णय घेताना मागे ओढतो.
FM – Focused Mind:
हा आवाज सजग असतो. आतल्या आत विचार करणारा. ‘हे मी वेगळ्या पद्धतीने कसं करू शकेन?’ विचारणारा. हा आवाज तुम्हाला मोकळेपणानं पण जबाबदारीनं वागायला शिकवतो ज्यास आम्ही Constructive criticism mode असे म्हणतो.
पण आपल्या ह्या रेडिओरूपी ‘Inner Critic’ ची भूमिका नेमकी काय?
तो आपल्याला सतत ‘आरसा’ दाखवतो. कधी भेसूर, कधी स्पष्ट, पण नकळत सजग करणारा. त्याच्या आवाजात ‘फक्त टीका’ नसते, एक ‘दृष्टी’ देखील असते. कधी कधी, तो आपल्याला असे प्रश्न विचारतो जे आपल्याला अंतर्मुख करतात आणि आपल्या निर्णयांवर पुन्हा प्रकाश टाकतो – की खरंच हे मला हवंय का?
म्हणून एक मानसोपचारतज्ज्ञ म्हणून माझं काम म्हणजे तुमचा हा रेडिओ पुन्हा ट्यून करायला मदत करणं, AM वरून FM कडे... कसा? कधी आपण आवाज कमी करतो, कधी त्यातली भाषा समजावतो, तर कधी रेडिओ थोडा वेळ बंद करून शांतता शिकवतो. एकूण काय तर, आपला अंतर्गत टीकाकार जर आपल्याला सतत नकारात्मकता दाखवत असेल, तर त्याच्या संवादाची शैली आपण बदलू शकतो. मनातल्या त्या रेडिओचं ‘स्क्रिप्ट’ आपण नव्यानं लिहू शकतो.
एका क्लायंटला तर आम्ही एक कोडवर्डच ठरवला!
“अरे, पुन्हा तो ‘आदित्य नारायण’ सुरु झाला बघ!”
आता तिचा हा रेडिओरूपी ‘inner critic’ सुरू झाला, की ती स्वतःहून हसते आणि म्हणते,
“ठीक आहे, आता शांततेनं चर्चा करूया हो.”
“प्लॅन A फसला का? आता काय करायचं?”
तो आवाज म्हणेल, “बघ, सांगितलं होतं मी नाही जमणार म्हणून!” पण मग तीच त्याला विचारते, “हो, सांगितलं होतंस पण मग आता काय करता येईल?” तेव्हा हाच रेडिओरूपी Inner Critic तिचा शत्रू न राहता एक उत्तम Inner Consultant होतो! म्हणजे काय तर टीकाकार आपलाच आहे, पण उपयोगात आणायचा तर हवी एक वेगळी ‘सकारात्मक दृष्टी’
पण तुम्ही म्हणाल, "मला मुळी असा रेडिओ नाहीच पाहिजे! ह्यालाच बंद करता येतं का?” मला विचाराल तर, नाही. हा अंतर्गत टीकाकार तुमचं नुकसान करण्यासाठी जन्माला आलेला नाही. उलट, तो फक्त तुम्हाला तुमचंच एक अधिक सजग आणि शहाणं रूप दाखवतो. त्याचं ऐकणं म्हणजे आत्मचिंतन. आपण जर त्या आवाजाशी जजमेंट न करता संवाद साधायला शिकलो,
तर तोच आवाज आपल्याला योग्य मार्ग दाखवतो एखाद्या जुन्या मित्रासारखा, ज्याला आपलं खरं हित कळतं, पण जो ते खरं सांगताना मात्र कधी कधी कडवट होतो.
फक्त त्याच्या आवाजातला फरक तेवढा ओळखावा – कुठे तो आपल्याला सावध करतोय किंवा कुठे तो केवळ जुन्या अनुभवांवर आधारित एक घासून घासून गुळगुळीत केलेली टेप ऐकवतोय!
तर ऐकत राहा तुमचा ‘मनाचा FM’ हा कार्यक्रम, तुमच्याच “मन का रेडिओ”वर पण योग्य फ्रीक्वेन्सीवर!
तब तक के लिए शुक्रिया, मिलते हैं, ब्रेक के बाद..
- मानसी कोपरे
मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक
डिचोली - गोवा, ७८२१९३४८९४