केरोसीनचा दिवा आणि मी

विद्युत रोषणाईने उजळणाऱ्या चौफेरी नजर फिरवली की आपण उघड्या डोळ्यांनी वास्तवाचे स्वप्न पाहत असल्याचे जाणवायचे. चहूबाजूची मातीची घरं असू देत, की विटांनी बांधलेली घरं; ती सुध्दा पाहताना आपलंही घर असावं असंच एखादं ही बालपणीची स्वप्ने सतत डोळ्यासमोर तरंगत राहायची. एक बटन दाबले की खोलीभर बल्बचा उजेड पाहिला, की तो उजेड आमच्याही घरात असावा ही बालमनातील खंत सतत हैराण करायची. परंतु त्याच स्मृती आज कित्येक आठवणींना उजाळा देण्याऱ्या ठरल्या..

Story: सय अंगणाची |
10th August, 04:25 am
केरोसीनचा दिवा आणि मी

माझ्या संपूर्ण शालेय प्रवासात जो प्रकाश निर्माण झाला तो त्या अलगद छोट्याशा पेटणाऱ्या वातीमुळे. मग ती पत्र्यापासून बनलेल्या गोल चिमणीत रॉकेलच्या आधारे पेटणाऱ्या सड्याची (सुतळी) वात असू दे, किंवा कडू तेलाचा वापर करून पेटविण्यात येणारी समईतील कापसाची वात. दोन्ही वातींनी आठवणी वेगळ्या दिल्या असल्या, तरी प्रकाश एकसारखाच दिला. एक चिमणी घरात, तर दुसरी गाताडी शेजारी ठेवली जायची. 

आई कधी कामातून किंवा संध्याकाळी चारा घेऊन घरी आली, की पहिल्यांदा चिमणीत केरोसीन घालून ठेवायची. मग संध्याकाळी अभ्यास करण्यासाठी चटई अंथरुन पुढ्यात पेटवलेली चिमणी घेऊन बसायचे. केरोसीनचा वास परफ्यूमसारखाच वाटायचा मला. हळूच आईची नजर चुकवून मी चिमणीचं झाकणं उघडून तो वास घ्यायचे. एखादवेळी बाबांची नजर पडली, तर ते रागात म्हणायचे “पोरा मरशीन कसलाबसला वास घेऊ नकोस!” आईकडून तर कित्येकवेळा पाठीतून धपाट्यांची ऊब यायची. पेटणाऱ्या त्या सुतळीतून काळी काजळी पडायची. मग हळूच पेन वहीत घालून वही बाजूला सरकून पडलेल्या काजळीवरून बोट फिरवत शेणाने सारवलेल्या जमीनीवर एखादं चित्र, अक्षर काढायचे. माझ्या या गोष्टीचा आईला भयंकर राग यायचा. त्यावेळी क्षणाचा ही विचार न करता चिमणीवर फुंकर घालून आई चिमणी पालवायची आणि मग “गप सप जा!” म्हणून झोपायला सांगायची. अखेर आईला विनवून पुन्हा मी चिमणी पेटवायचे.

माध्यमिक शाळेत शिकताना पाठांतराची वेळ आली, की पूर्ण रात्र मी जागवायचे. भरलेल्या चिमणीतील केरोसीन संपले, की पुन्हा हळूच कॅनमधले केरोसीन चिमणीत घालायचे. एखादवेळी ते बाहेर ओतले, की घमघमीत वास सुटायचा. मग उपाय म्हणून त्यावर चूलीतील राख मी घालायचे आणि काडेपेटीतल्या काडीने पेटवायचे. माझे हे पराक्रम बाबांना माहीत असायचे. सकाळी उठल्यानंतर बाबा आईना म्हणायचे, “ही धाकटी प्योर एकदिस तरी सगळं जाळून टाकीन.” बाबांच्या या शब्दांनी आईचा राग मस्तकी जायचा. केरोसीनचा वापर जास्त माझ्याकडूनच व्हायचा. 

पावसाच्या दिवसांत चारा घेऊन येताना आई भिजून ओलीचिंब होऊन माघारी परतायची. त्यावेळी नारळाची सोडणं, सुकं गवत, सुकलेल्या लाकडांच्या साली, लाकडं फोडून केलेली छोटी छोटी चाप्रं आईने आग पेटवण्यासाठी गोठ्यात पिशवीत भरून ठेवलेली असायची. पावसाच्या दिवसांत या गोष्टींचा वापर करून चुलीत आग पेटवायला कंटाळा आला, की आजूबाजूला कुणी आहे की नाही याची शाश्वती करुन घेतल्यावर हळूच केरोसीनचा वापर करायचे. परंतु आई-बाबांना कळले नाही असे कधी घडलेच नाही. 

आयुष्यात असे दोन प्रसंग घडले तेव्हापासून केरोसीनच्या चिमणीच्या सोबतीत रात्र-रात्र जागणं कायमचे बंद झालं. चुलीसमोर आई आपल्यासाठी अंथरूण घालायची. त्याच्यावरच मीही झोपायचे. आई झोपल्यावरही माझा अभ्यास सुरू असायचा. एखादवेळी डुलकी जायची, पण पुन्हा ध्यानावर यायचे. एकदिवस तर चिमणी तशीच पेटलेली आणि माझा नकळत डोळा लागला. चिमणीला हात लागून चिमणी अंथरूणावर पडली आणि गोधडीने पेट घेतला. माझ्या पराक्रमांची जाणीव बाबांना नेहमी असायची. उजेड दिसताच बाबांनी जोरात आईला हाक दिली. आई झटदिशी उठून मला बाजूला सरकावले आणि आग विझवली. त्यादिवशी माझ्या पायाखालची जमीन मात्र सरकली. तो प्रसंग आणखीन व्यक्त न करण्या सारखाच! 

अशाच काही दिवसांनी बेरात्र जागरणात डोक्यात पेनं घालून केसांशी खेळताना केसांनी घेतलेला पेट, दादाने जोरात डोक्यात हात मारल्याने केसांचे झालेले रक्षण असे काही भयानक प्रसंग सोडले, तर या केरोसीनच्या दिव्यांनी माझे अंधारमय आयुष्य उजळून प्रकाशमय केले. काही काळाने या केरोसीनच्या दिव्यांची साथ सुटली आणि मग समईच्या वाती आयुष्यात आल्या.

तो सुगंध दरवळतो आजही

चुलीतल्या लाकडांवरती,

अंथरूणावरच्या गोधडीवरती

अन् नव्या करकरीत

वही पुस्तकांच्या त्या सुगंधातही...


ओनिता रामा वरक, पाल-ठाणे‌, सत्तरी