प्रत्येक महिलेचा मासिक पाळीदरम्यानचा अनुभव वेगवेगळा असू शकतो. काहींना मासिक पाळीच्या वेळी ओटीपोटात दुखणे, पाठ दुखणे या लक्षणांचा सामना करणे अगदी सामान्य वाटू शकते; तर काहींना सहन न होण्याइतपत क्रॅम्प्स येणे, जबरदस्त थकवा जाणवणे, डोके गरगरणे, चक्कर येणे अशी लक्षणे जाणवल्याने हा कालावधी आव्हानात्मक वाटू शकतो. तुम्हालाही कधी पाळीच्या दिवसांत उभे राहिल्यावर चक्कर येणे किंवा अचानक घेरी झाल्यासारखे वाटले आहे का? असे असल्यास हा कमी रक्तदाबाचा त्रास असू शकतो.
पाळी दरम्यान कमी रक्तदाबाची लक्षणे
हृदयाचे ठोके अचानकपणे वाढणे किंवा मंदावणे, डोके गरगरणे, चक्कर येणे किंवा डोके हलके वाटणे, मूर्च्छा येणे, थकवा जाणवणे, दृष्टी धूसर जाणवणे, मळमळणे आणि उलटी येणे, अशक्तपणा, थकवा आणि सुस्त वाटणे यासारखी लक्षणे पाळीदरम्यान हायपोटेन्शन किंवा कमी रक्तदाब झाल्यास दिसून येऊ शकतात.
पाळी दरम्यान कमी रक्तदाब कशामुळे होतो?
हार्मोनल बदल :
मासिक पाळी दरम्यान शरीरातील हार्मोन्सच्या चढ-उतारांमुळे रक्तवाहिन्यांवर लक्षणीय प्रभाव पडतो, ज्यामुळे त्या रुंद होतात आणि परिणामी रक्तदाब कमी होतो. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोनच्या पातळीतील बदल हे रक्तदाब कमी होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या संभाव्य घटकांपैकी एक मानले जाते, ज्यामुळे चक्कर येणे, रक्तदाब कमी होणे आणि मूर्च्छा येणे जाणवू शकते.
अति-रक्तस्त्राव :
मासिक पाळीत गर्भाशयाच्या अस्तराचा स्त्राव होतो, ज्यामुळे दर महिन्याला शरीरातून रक्त कमी होते. काही महिलांना हलका रक्तप्रवाह जाणवतो, तर काहींना यादरम्यान जास्त रक्तप्रवाह जाणवतो. मासिक पाळी चालू असताना अति-रक्तस्त्राव होत असलेल्या स्त्रियांमध्ये, कमी रक्तदाब होऊ शकतो, ज्यामुळे चक्कर आणि मूर्च्छा येऊ शकते. मासिक पाळी दरम्यान महिलांना थकवा आणि अशक्तपणा जाणवण्याचे हे सर्वात सामान्य कारण आहे.
रक्ताल्पता :
रक्तात लाल रक्तपेशी किंवा हिमोग्लोबिनची कमतरता झाल्यामुळे रक्ताल्पतेची स्थिती उद्भवू शकते. यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मासिक पाळीच्या दरम्यान, महिलांमध्ये जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होऊ शकतो, ज्यामुळे लोहाची कमतरता किंवा अॅनिमिया होऊ शकतो. मासिक काळात शरीराला ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी झाल्यामुळे रक्ताचे प्रमाण आणि रक्ताभिसरण पुरेसे राखण्यासाठी धडपड होते. या कारणाने अशक्तपणामुळे होऊ शकतो व रक्तदाब कमी होऊ शकतो.
हायपोग्लाइसेमिया :
मासिक पाळी दरम्यान हार्मोनल असंतुलनामुळे इस्ट्रोजेनच्या पातळीत चढउतार होतो, इंसुलिनवर परिणाम होतो व रक्तातील साखरेची पातळी कमी होणे म्हणजे हायपोग्लाइसेमिया होऊ शकते. मधुमेह नसलेल्या लोकांपेक्षा मधुमेह असलेल्या लोकांना हायपोग्लायसेमिया होण्याची अधिक शक्यता असते. पाळीदरम्यान रक्तातील साखरेच्या कमी पातळीमुळे शारीरिक ऊर्जेचे उत्पादन कमी होऊ शकते व रक्तदाब कमी होतो.
डिहायड्रेशन :
पाळी चालू असताना शरीरातील द्रवाची पातळी कमी झाल्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते. डिहायड्रेशनमुळे रक्तदाब कमी होतो आणि चक्कर येणे आणि अशक्तपणा जाणवू शकतो.
डिसमेनोरिया :
मासिक पाळीत डिसमेनोरिया म्हणजे, अगदी तीव्र प्रमाणात क्रॅम्प्स व वेदना होत असल्यास शरीरात काही रसायने सोडली जाऊ शकतात, ज्यामुळे रक्तदाब कमी होऊ शकतो आणि मूर्च्छा येऊ शकते. वेदनेमुळे व्हॅसोव्हॅगल प्रतिक्रिया येऊ शकतात व वेदना उत्तेजित होण्याच्या प्रतिसादात रक्तदाब अचानक कमी होऊ शकतो.
पाळी दरम्यान कमी रक्तदाबावर उपचार कसे करावेत?
- मासिक पाळी दरम्यान कमी रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी भरपूर पाणी पिऊन हायड्रेटेड राहणे आवश्यक आहे.
- दररोज किमान ३० मिनिटे चालणे, योगासने, ध्यान करणे किंवा दीर्घ श्वासोच्छवासाचे व्यायाम व मध्यम पातळीच्या शारीरिक क्रिया करून सक्रिय राहण्याचा प्रयत्न असावा.
- यादरम्यान मध्यम प्रमाणात मिठाचे सेवन ठेवावे यामुळे रक्तदाब कमी होण्यास आणि नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
- मध्यम लक्षणे असलेल्या महिलांनी कॉम्प्रेशन सॉक्स परिधान केल्याने मासिक पाळीमुळे होणारा कमी रक्तदाब नियंत्रित होण्यात मदत होऊ शकते.
- तणावामुळे रक्तदाबाची पातळी वाढू शकते. तणाव आटोक्यात ठेवण्यासाठी डीप ब्रिथींग व्यायाम, रिलॅक्षेशन व्यायाम, ध्यान, योग, सौम्य स्ट्रेचिंग व्यायाम हे नियमितपणे सरावात आणा.
- दिवसभरात लहान व छोट्या अंतरावर जेवण केल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास आणि रक्तदाब कमी होण्यास मदत होते.
डॉ. श्वेता राऊत मुळगावकर