पुणे येथे एका अल्पवयीन मुलाने पोर्शे कारने दिलेल्या धडकेने दोघांचा बळी घेतला होता. त्यानंतर अशा प्रकारची अनेक प्रकरणे घडली. नुकताच कानपूर येथेही असाच एक अपघात घडला. त्यात एका अल्पवयीन मुलाने अतिवेगातील कारला अचानक ब्रेक लावल्याने कारची धडक एका दुचाकीला बसली. यात दुचाकीवरील आईचा मृत्यू झाला, तर मुलीला जबर मार बसला. अपघातांची भीषणता पाहिली असता, चालक अल्पवयीन असला तरी त्याला कठोर शिक्षा होण्याची गरज आहे. तरच अशा अपघातांवर नियंत्रण येईल.
कानपूरमध्ये २ ऑगस्ट रोजी दुपारी भावना आणि त्यांची मुलगी मेधावी स्कूटरवरून औषध आणण्यासाठी जात होत्या. साकेतनगर येथे एका भरधाव कारने त्यांच्या स्कूटरला जोरदार धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या भावना यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. १३ वर्षीय मेधावीचे हात, पायांचे हाड मोडले आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. भावना मिश्रा यांचे पोस्टमॉर्टेम करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, त्यांच्या डोक्यातील हाड फ्रॅक्चर झाल्यामुळे ब्रेन हॅमरेज झाले. त्यांच्या छातीच्या फासळ्या तुटून फुफ्फुसात अडकल्या होत्या. मांडीचे व गुडघ्याचे हाड मोडले होते. अशाप्रकारे सहा ठिकाणी हाडे तुटल्याने मृत्यू झाला. त्यांच्या वैद्यकीय अहवालात १२० किमी प्रतितास वेगाने झालेल्या धडकेमुळे त्या सुमारे २० मीटर दूर पडल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे, कार चालवणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थ्याला इटावा येथील बालसुधारगृहात पाठवण्यात आले. त्याचे वडील अशोक कुमार मौर्य यांना पोलीस ठाण्यातून जामीन मंजूर करण्यात आला.
अपघाताबाबत पोलीस अधिकारी म्हणाले की, अल्पवयीन विद्यार्थ्याने जबाबात ब्रेक लावल्याचे म्हटले आहे. त्यानंतर गाडी एका बाजूला वळली. कारने स्कूटरला बाजूने जोरदार धडक दिली. पोलिसांच्या तपासात समोर आले आहे की, अपघाताच्या दिवशी आरोपी विद्यार्थ्याने शाळेला दांडी मारली होती. तो मित्र आणि मैत्रिणींसोबत गंगा धरणावर पिकनिकसाठी गेला होता. मुलींनी शाळेचे कपडे बदलून इतर कपडे घातले होते. कारमध्ये मुलींच्या कपड्यांच्या दोन जोड्या सापडल्या. मुली घटनास्थळावरून पळून गेल्या, मात्र लोकांनी चालक विद्यार्थ्याला आणि त्याच्या साथीदाराला मारहाण करून पोलिसांच्या स्वाधीन केले. वडिलांनी आपल्या १६ वर्षांच्या इंटरमिजिएट-शिकणाऱ्या मुलाला इतके स्वातंत्र्य दिले होते की, तो अनेकदा कारने शाळेत जात असे. तो कोयलानगर येथील मदर तेरेसा उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी आहे. कुटुंबासह शाळेने कधीही आक्षेप घेतला नाही. त्यामुळे एवढा भीषण अपघात घडल्याने एका कुटुंबाच्या आनंदावर शोककळा पसरली.
बहुतेक प्रकरणांत अल्पवयीन मुलगा चालक आणि अतिवेगामुळे अपघात झाला आहे. अशा अपघातांत बळी गेलेल्या लोकांचे कुटुंब मात्र उद्ध्वस्त होते. अल्पवयीन मुलाने कार चालवू नये आणि त्याला कार चालवण्यासाठी देऊ नये, असे कायद्यात असले तरी त्याबाबत कोणीच गंभीर नसल्याचे दिसून येते. अपघातानंतरही चालक अल्पवयीन असल्याने त्याला शिक्षा म्हणून केवळ बाल सुधारगृहात पाठवले जाते. अशा अपघातांना चाप लावण्यासाठी प्रसंगी कायद्यात बदल करून चालक अल्पवयीन असला तरी त्याला कठोर शिक्षेची तरतूद केली पाहिजे.
प्रदीप जोशी,
(लेखक दै. ‘गाेवन वार्ता’चे उप वृत्तसंपादक आहेत)