भारतामध्ये क्रीडाक्षेत्रावर पुरुषांचा पगडा अधिक राहिल्यामुळे महिलांचा सहभाग कमीच राहिला. आजही पुरुषांच्या तुलनेत महिला खेळाडूंचे प्रमाण कमी आहे. त्यातही क्रिकेटवेडात बुडालेल्या भारतीयांनी नेमबाजीसारख्या क्रीडाप्रकाराला कधीच डोक्यावर घेतले नाही. परंतु या क्रीडाप्रकारात ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये दोन पदके मिळवून मनू भाकर या नेमबाज महिलेने भारताचे नाव जागतिक पटलावर उंचावले आहे. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकण्याचा मान मिळवणारी ती स्वतंत्र भारतातील पहिलीच खेळाडू ठरली आहे.
फ्रान्सची राजधानी पॅरीसमध्ये सुरू असलेली यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा जागतिक पटलावर भारताचा सन्मान वाढवणारी ठरली आहे. विशेषतः शुटिंगच्या नेमबाजीच्या क्षेत्रात महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळे याने तिसरे कांस्य पदक जिंकल्यामुळे समस्त राज्यभरात उत्साहाचे वातावरण आहे. तत्पूर्वी महिला नेमबाज मनू भाकरने यंदाच्या स्पर्धेतील पदकांचा श्रीगणेशा केला. इतकेच नव्हे तर एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकण्याचा मान मिळवणारी ती स्वतंत्र भारतातील पहिलीच खेळाडू ठरली आहे. मनूने प्रथम महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदकावर निशाणा साधला आणि त्यानंतर सरबजोतसह मिश्र प्रकारात कांस्यपदक जिंकले. नेमबाजी हा एक असा खेळ आहे ज्यामध्ये २०१६ मध्ये रिओ आणि २०२१ मध्ये टोकियो या शेवटच्या दोन ऑलिम्पिक गेम्समधून भारत रिकाम्या हाताने परतला होता. मात्र यावेळी सुरुवातीलाच जिंकलेल्या दोन पदकांमुळे केवळ भारतीय नेमबाजीचेच नव्हे तर संपूर्ण भारतीय संघाचे मनोबल उंचावले आहे. आजपर्यंत एकही महिला नेमबाज १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचली नव्हती.
कोणत्याही खेळाडूच्या यशात केवळ त्याची मेहनत आणि कौशल्य महत्त्वाची भूमिका बजावत नाही, तर अन्यही अनेकांची भूमिका महत्त्वाची असते. मनू भाकर टोकियो ऑलिम्पिकमधून निराश होऊन परतल्यावर तिने खेळ सोडण्याचा विचार सुरू केला होता. अशा स्थितीत तिला निराशेतून बाहेर काढण्यात कुटुंबीयांनी विशेषत: आई सुमेधा यांनी जी भूमिका बजावली, ती दोन पदके जिंकण्यापेक्षा कमी नाही. आई सांगते की मनू घरी आल्यावर शूटिंगबद्दल तिच्याशी बोलून आम्ही ताण आणत नव्हतो. ती आनंदी राहावी म्हणून आम्ही घरात हलकेफुलके वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करायचो. तसेच भाऊही सतत भेटवस्तू आणत राहिल्याने बहिणीचा मूड चांगला राहायचा. टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिच्या पिस्तुलमध्ये बिघाड झाल्याने ती बाहेर पडली. बराच काळ तांत्रिक कारणांमुळे येणार्या अपयशाशी ती झुंजत होती. टोकियोमधील निराशाजनक कामगिरीमुळे २०१४ पासून तिच्याशी जोडलेले प्रशिक्षक जसपाल राणा यांच्याशीही संबंध बिघडवले होते. दोघेही एकमेकांसमोर येणे टाळायचे आणि समोरासमोर आले तर एकमेकांकडे दुर्लक्ष करायचे. आपल्या देशात गुरु-शिष्य परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे आणि मनूच्या सध्याच्या यशात या परंपरेचाही मोठा वाटा आहे. टोकियो ऑलिम्पिकनंतर मनू भाकरने प्रशिक्षक जसपाल राणा यांच्याशी संबंध तोडले होते. शूटिंग रेंजवर परतल्यानंतर मनूने वेगळ्या प्रशिक्षकासोबत सराव सुरू केला, पण अपेक्षित परिणाम न मिळाल्याने तिने एकूण चार प्रशिक्षकांसोबत काम केले. अखेरीस जसपाल राणा प्रशिक्षक असतानाच ती आपल्यातील सर्वोत्तम देऊ शकते हे तिला लवकरच समजले. यावर तिने जसपाल राणा यांच्याशी संपर्क साधला; मात्र त्यांच्या निकटवर्तीयांनी त्यांना तसे न करण्यास सांगितले. जसपाल तिच्यासाठी किती महत्त्वाचे प्रशिक्षक आहेत हे मनूला माहीत होते. त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकच्या एक वर्षे आधी जसपालना फोन केला. त्यांनी मनूला पुन्हा प्रशिक्षक होण्यास होकार दिला आणि खर्या अर्थाने गुरु म्हणून जबाबदारी पार पाडली. मनूची कारकीर्द सुधारण्यासाठी मरीन इंजिनिअर म्हणून आपली कारकीर्द सोडणारे वडील रामकिशन भाकर यांनी आपल्या मुलीची स्वप्ने पूर्ण करण्यात कोणतीही कसर सोडली नाही.
जसपाल राणा म्हणतात की, मनूसाठी शूटिंग हे सर्वस्व आहे. ती या क्षेत्रातील एका अजिंक्य योद्ध्यासारखी आहे. टोकियोच्या निराशेनंतर नेमबाजी रेंजवर परतल्यावर तिने आपला आत्मविश्वास डळमळीत होऊ दिला नाही. जिंकण्याची ही असीम जिद्दच तिला इथपर्यंत घेऊन गेली असे त्यांचे म्हणणे आहे. मनूच्या मेहनतीचे हे फळ आहे. कितीही उशीर झाला तरी अचूक शॉट मिळेपर्यंत ती शूटिंग रेंजवर सराव करत राहायची. जर भारतीय ऑलिम्पिक इतिहास पाहिल्यास, दीर्घकाळ आपल्याकडे हॉकीमध्ये मिळालेल्या यशाशिवाय दुसरे काहीही नव्हते. २००८ मध्ये बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून अभिनव बिंद्राने खर्या अर्थाने भारतीयांना आत्मविश्वास दिला की तेही ऑलिम्पिक स्पर्धा जिंकू शकतात. त्यानंतर सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकून सुशील कुमार या कुस्तीपटूने ही यशाची मशाल पुढे नेली. सुशीलच्या कामगिरीची पुनरावृत्ती नंतर पीव्ही सिंधूने सलग दोन वेळा पदके जिंकून केली. आता एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकता येतात हे मनू भाकरने देशवासीयांना शिकवले आहे. इतिहासाचा नवा अध्याय लिहिण्याची क्षमता मनूमध्ये आहे हे प्रशिक्षक जसपालना माहीत होते. त्यांचा विश्वास सार्थ ठरवून मनूने त्यांना गुरुदक्षिणा दिली आहे.
मनूच्या या यशांमुळे भारतीय संघाला आणखी चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळाली आहे. मनूप्रमाणेच टेबल टेनिसच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये पोहोचणारी मनिका बत्रा ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. सात्विक साईराज आणि चिराग या जोडीने गटात अव्वल स्थानी राहून उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पीव्ही सिंधूची सलग तिसर्या पदकाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे, तर लक्ष्य सेनही पदकाच्या शर्यतीत आहे. निखत जरीननेही बॉसिंगमध्ये पदकाच्या आशा कायम ठेवल्या आहेत. मनूच्या चमकदार कामगिरीतून मिळालेल्या प्रेरणेने भारतीय संघाच्या पदकांची संख्या वाढली, तर देशात क्रीडा क्रांतीचा मार्ग खुला होईल.
देशात खेळाडूंची कमतरता नाही. त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल असे वातावरण त्यांना देण्याची गरज आहे. केंद्रीय क्रीडामंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, खेलो इंडिया कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारने मनू भाकरच्या प्रशिक्षणासाठी २ कोटी रुपये खर्च केले. या आर्थिक मदतीमुळे तिला आपल्या आवडीचे प्रशिक्षक नेमणे शक्य झाले. मनूला प्रशिक्षणासाठी जर्मनी आणि स्वित्झर्लंडला पाठवले.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनू ही केवळ एक खेळाडू नाही. ती तरुण खेळाडूंच्या संपूर्ण समुदायाचे प्रतिनिधित्व करते जे देशाला गौरव मिळवून देण्याच्या मोहिमेत गुंतलेले आहेत. नीरज चोप्रा असो की पीव्ही सिंधू किंवा विनेश फोगट आणि मीराबाई चानू ही अशा डझनभर नावांपैकी आहेत जी प्रचंड कष्ट करुन आणि घाम गाळून देशाची प्रतिष्ठा वाढवण्यात मग्न आहेत. येत्या काही दिवसांत यातील अनेक नावे देशाला सुवर्णपदकांपर्यंत पोहोचवतील यात शंका नाही.
नितीन कुलकर्णी