रडूबाई झाली हसूबाई

Story: छान छान गोष्ट |
04th August 2024, 07:30 am
रडूबाई झाली हसूबाई

आज दुपारी जाई मोठमोठयाने रडतच शाळेतून घरी आली. ती एकसारखी रडत होती. हुंदके देत होती. आईनं कितीही समजावलं तरी ती रडायची काही थांबत नव्हती. रडता रडता संध्याकाळ व्हायला आली तरी तिचं रडणं आणि आसवं गाळण चालूच होतं. 

ती रडत रडत आईला एकच प्रश्न विचारत होती, “आई, मी काळी का गं? मी गोरी का नाही?” 

आईनं जाईला खूप समजावलं, “बाळा, काळं-गोरं, सुंदर-कुरूप... हे सगळं निसर्गाने माणसाला दिलेलं देणं आहे. ती त्याची किमया आहे. पण काळ्या रंगांत सुध्दा सौंदर्य आहे. बघ, तू किती सुंदर दिसतेस! गोऱ्या मुलीपेक्षाही तू उजवी दिसतेस. तू आमच्या सगळ्यांची लाडकी आहेस.. तुझे बाबा, आजी-आजोबा... आम्ही सगळी तुझ्यावर कित्ती कित्ती माया करतो! तू काळी म्हणून तुझा तिरस्कार करतो का?” 

आईनं लाख समजावलं परंतु जाई काही रडायची थांबेना. तिनं दुपारचं जेवण पण घेतलं नाही. एरवी तीन-साडेतीनच्या दरम्यान ती एक अर्धा तास कॉलनीतल्या मुलांबरोबर खेळायला जाते, मग येऊन होमवर्क करायला बसते. परंतु आज तिनं दोन्हीही कामं केलेली नव्हती. फक्त “आई, मी काळी का गं?” हे एकच पालुपद तिनं लावलेलं होतं. 

झालं असं, की जाई लिटल एजंल स्कुलमध्ये तिसरीच्या वर्गात शिकत होती. याच वर्षी तिचे बाबा बदली होऊन पणजी शहरात आल्यामुळे तिचं ह्या शाळेत एडमिशन केलं होतं. नाहीतर एरवी तिचं शिक्षणं गावातल्या शाळेत झालं होतं. जाई खेळात तशीच अभ्यासात पण खूप हुशार होती. प्रत्येक गोष्टीत ती पहिली यायची. वक्तृत्व, गायन, नृत्य, कथाकथन, चित्रकला, क्राप्ट इत्यादी कोणतीही स्पर्धा असूं दे तिचा क्रमांक प्रथम. परंतु तिचा रंग मात्र खूपच काळा होता. तिच्या घरात पण कोण तिच्या एवढा काळा नव्हता आणि शाळेत पण. तिला स्वत:ला त्याचं वाईट वाटत होतं आणि त्यात भर म्हणून, तिच्या हुशारीसाठी तिची असुया करणारी काही मुलं तिला काळी म्हणून चिडवत होती. मुलं चिडवायला लागली की तिला खूप रडायला यायचं. तिच्या गावातील शाळेत तिला कोण असं चिडवत नव्हतं. 

मग ती जाऊन वर्गशिक्षिकेकडे त्या मुलांची तक्रार करायची, शिक्षिकेनं दम दिला म्हणजे एक-दोन दिवस कोण तिच्या वाटेला जायचे नाहीत, मग त्याचं चिडवणं परत सुरू व्हायचं. असं रोजच होऊ लागलं, म्हणून एके दिवशी तिनं घरी येऊन ही गोष्ट आई-बाबांना सांगितली. आई-बाबांनी तिला खूप समजावलं, अशा गोष्टीकडे दुर्लक्ष कर म्हणून सांगितलं. तसचं त्यांच्या चिडवण्याकडे ती जितकं लक्ष देईल, तितकं ते जास्त चिडवीत रहतील हे पण सांगितलं. आई-बाबाचं सांगण तिला तेवढंसं पटलं नव्हतं तरी ती गप्प राहायची. परंतु आज मात्र तिचा संयम सुटला आणि तिच्या रडण्याचा पूर काही थांबेनासा झाला. 

आज मधल्या सुट्टीत खेळताना, तिचा धक्का लागून बॉबी खाली पडला आणि त्याच्या पायाला लहानशी जखम झाली. तसा बॉबीला एकदम राग आला. तिला चिडवणाऱ्या थोराड मुलांपैकी तो एक होता. त्याने रागाने तिला म्हटलं, “ए काळ्या कावळिणी... मला धक्का का दिलास?” बॉबीने तिला कावळीण म्हटलेलं ऐकून बाकीची मुलं मोठमोठ्याने हसायली लागली आणि टाळ्या पिटत गाऊ लागली, “जाई काऴी... काळी काळी कावळीण...!” 

मुलं चिडवायला लागली तसं जाईनं भोकांड पसरलं. हा एवढा गोंगाट ऐकून वर्गशिक्षिका धावून आली. तिनं चिडवणाऱ्या मुलांना दम देऊन वर्गात पाठवलं आणि जाईला कुशीत घेऊन तिला मायेनं समजावलं. तिच्या डोळ्यांतील आसवं पुसून तिला वर्गात नेऊन बसवलं. परंतु तिची आसवं आणि हुंदके काही थांबले नाहीत. शाळेच्या बसमधूनही ती रडतच घरी आली. दारांतच असताना तिने मोठ्याने हुंदका देत आईला झालेली  सगळी गोष्ट सांगितली. 

रोजच्या प्रमाणे आईने तिला आजही समजावलं, “बाळा, म्हणूं दे ग त्यांना... ते म्हणतील आणि तेच ऐकतील...आणि तू काळी म्हणजे काही कुरूप नाहीस. श्रीकृष्ण देव सुध्दा काळा होता. तुला आजीनं सांगितली नाही का गं त्याची कथा? आणि तुझं नाव जाई. तिला कित्ती कित्ती सुगंध असतो माहीत आहे ना? आणि तुझा सुगंध म्हणजे तुझ्या अंगातले गुण! ते तू जोपासयाला हवेत!”

आईने परोपरीने समजावलं परंतु, रडूबाईचं रडणं काही थांबलं नाही. दुपार ओसरली. रडू रडून जाई मंद पडत चालली होती. बेशुध्द वगैरे पडली तर? आईला भीती वाटली. आता काय करावं? ती विचार करू लागली. एवढ्यात तिची नजर खिडकीतून बाहेर गेली. समोरच्या रस्त्यावरून एक बाई जाईच्याच वयाच्या एका मुलीचा हात पकडून चालत होती. आई काही वेळ त्यांना बारकाईने बघत राहिली, नंतर तिने एकदम जाईला म्हटलं, “जाई बाळा, इथे ये जरा. मी तुला काही तरी दाखवते.” एवढं बोलून ती थांबली नाही, पट्टदिशी येऊन तिनं जाईचा हात पकडला आणि तिला बिल्डींगच्या मेन गेटपाशी घेऊन गेली. 

जाई त्या बाईला आणि तिच्या मुलीला आळीपाळीने बघू लागली. तिच्या डोळ्यात कितीतरी प्रश्न उभे राहिले. ती रडायचं विसरली. एकदम किंचाळत तिनं आईला म्हटलं, “आई, बघ ना गं, कित्ती कित्ती गोरीपान आहे ही मुलगी... जशी काही राजकन्याच! पण... पण तिचे डोळे? तिला दिसत नाही आई...!”

आईनं म्हटलं, “हो जाई... ह्या मुलीला दिसत नाही. कुणाच्या आधाराशिवाय ती काही करू शकत नाही. हिचा रंग गोरा आहे, पण काय फायदा? दिसत नसल्यामुळे तिच्यासाठी अख्खं जगच काळं आहे. तू देवाचे आभार मान. तू काळी आहेस, परंतु तुला दोन्ही डोळ्यांनी लख्ख दिसतं आहे. तू कुणाच्या आधाराशिवाय चालू-फिरू शकतेस, तुझी कामं करू शकतेस!”  जाईला आता सत्य पटलं. ती म्हणाली, “आई गं, आजपासून मला कुणी काळी म्हटलं, कावळीण म्हटलं तर मी जरा सुध्दा वाईट वाटून घेणार नाही! मी काळी असले, तरी माझे डोळे, हात-पाय... सगळे अवयव ठीक आहेत आणि हीच माझी सुंदरता आहे !” जाईच्या तोंडावर आता निश्चयाचं हसू फुटलं होतं.


जयंती नायक