अधिक परताव्याच्या हव्यासापोटी उद्योजकाला ८० लाखांचा चुना

फोंडा तालुक्यात ॲपद्वारे फसवणूक झालेल्यांची वैयक्तिक तक्रार देण्यास टाळाटाळ

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
26th July, 11:06 pm
अधिक परताव्याच्या हव्यासापोटी उद्योजकाला ८० लाखांचा चुना

फोंडा : पच्या माध्यमातून अधिक परताव्याला भुलून फोंडा परिसरातील हजारो नागरिकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली. मात्र हे प बंद पडल्याने त्यांना गंडा घालण्याचा प्रकार समोर आला. यात एका उद्योजकाने तब्बल ८० लाख रुपये गुंतविल्याची माहिती मिळाली आहे. मात्र सायबर गुन्हे विभागाकडे वैयक्तिक स्तरावर तक्रार देण्यास कोणीच पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. फसवणूक झालेल्या अंदाजे १५ सदस्यांनी सह्या केलेली तक्रार तीन दिवसांपूर्वी सायबर गुन्हा विभागात दाखल करण्यात आली होती. पण सायबर गुन्हा विभागाकडून वैयक्तिक तक्रार दाखल करण्याची विनंती होत असल्याने अनेकांनी काढता पाय घेतल्याचे दिसून येत आहे.
६०० ते ७०० पेक्षा अधिक सुशिक्षित लोकांनी या ॲपमध्ये गुंतवणूक केली आहे. सरकारी कर्मचारी, उद्योजक व अन्य कित्येक लोकांनी एका ॲपच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक केली आहे. सुरुवातीला अनेकांना सदस्य बनल्यानंतर अधिक परतावाही मिळाला. पण काही दिवसांपूर्वी ॲप बंद झाल्याने सदस्य बनलेल्या लोकांची तारांबळ उडाली.

बदनामीच्या भीतीने अनेकांचे तोंडावर बोट!
ॲपमध्ये गुंतवणूक केलेल्या एका सदस्याने नावाची बदनामी होणार असल्याने तक्रार करणार नसल्याची माहिती दिली आहे. सदस्य बनलेले वैयक्तिक स्तरावर तक्रार करण्यात रस दाखवत नसल्याने संबंधितांना हा कोट्यवधींचा गंडा पडल्यात ​जमा आहे.