विजयानंतर पदक चावण्याचा स्पर्धांमधील अनोखा इतिहास !

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
26th July, 10:26 pm
विजयानंतर पदक चावण्याचा स्पर्धांमधील अनोखा इतिहास !

पॅरिस : ऑलिम्पिक २०२४ चे आयोजन पॅरिसमध्ये करण्यात आले आहे. ऑलिम्पिक खेळाबद्दल चाहत्यांमध्ये असलेली उत्सुकता वाढली आहे. हा क्रीडा महाकुंभ ११ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहेत. कधी ऑलिम्पिक खेळ पाहिला असेल तर एक गोष्ट लक्षात आली असेल की पदक जिंकल्यानंतर खेळाडू दातांनी ते पदक चावतात. पण असे का घडते?

केवळ ऑलिम्पिकच नाही, आशियाई क्रीडा स्पर्धा असो, राष्ट्रकुल क्रीडा प्रकार असोत, खेळाडू पदक जिंकल्यानंतर ते पदक चावताना दिसतात. खेळाडूंनी त्यांची पदके दातांनी चावण्याचा कोणताही नियम नाही.


सोन्याचा दर्जा तपासण्याची पद्धत

पूर्वी सोन्याची नाणी चलन म्हणून वापरली जात होती. सोने हा एक मऊ धातू आहे आणि पूर्वीचे व्यापारी अनेकदा दातांनी सोन्याची नाणी चावून त्यांची गुणवत्ता तपासत असत. मात्र, सध्या पदक चावणे म्हणजे त्याची गुणवत्ता तपासणे नव्हे.

१९१२ पूर्वी ऑलिम्पिकमध्ये शुद्ध सुवर्णपदके दिली जात होती. मात्र त्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने शुद्ध सुवर्णपदके देणे बंद केले होते. १९१२ पूर्वी असे मानले जात होते की खेळाडू पदक दाताने चावून त्याची गुणवत्ता तपासत असत, परंतु १९१२ नंतर हे सर्व बदलले. शुद्ध सुवर्णपदके देणे बंद झाल्यानंतर सर्वजण मानू लागले की, खेळाडू आपली मेहनत आणि उत्साह दाखवण्यासाठी पदके दातांनी चावतात.

ऑलिम्पिकच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार खेळाडू फोटो काढण्यासाठी दातांनी पदक दाबून पोझ देतात. छायाचित्रकार व्यासपीठावर उभ्या असलेल्या खेळाडूंना दातांमध्ये पदक धरून पोझ देण्यास सांगतात.

आता देण्यात येणाऱ्या सुवर्णपदकांमध्ये ४९४ ग्रॅम चांदी आणि फक्त ६ ग्रॅम सोने आहे. तरीही प्रदीर्घ परंपरेनुसार खेळाडू दातांनी पदके चावत असतात. एक प्रकारे हे जुन्या परंपरेचे लक्षण आहे.

पदक चावणे केवळ सुवर्णपदक विजेत्यांसाठीच नाही. या उत्सवात रौप्य आणि कांस्यपदक विजेते देखील सहभागी होतात. या सर्वसमावेशकतेवरून असे सूचित होते की पदक चावणे हे पदकाच्या मूल्याच्या पलीकडे जाते, जे सर्वोत्कृष्ट क्रीडा मंचावर उपलब्धी आणि एकात्मतेचे सार्वत्रिक प्रतीक बनते.