प्रवाहित आयुष्य...

Story: सय अंगणाची |
27th July, 04:12 am
प्रवाहित आयुष्य...

१०-१५ वर्षे मागे वळून पाहिले की, आपण न मिळणाऱ्या गोष्टीतही किती आनंदी होतो आणि आज स्वतः भविष्याची स्वप्ने साकार करण्याच्या प्रयत्नात आपण खचून जातोय. आपल्यातील आत्मविश्वास गमावतोय या विचाराने मन तुटू लागते. आयुष्यातील खडतर प्रवासात आनंद प्राप्त केला तो आज सुखी प्रवासात लाभत नसल्याचे कटू सत्य अंगिकारावे लागत आहे.

युष्याचा प्रवास वेळेनुसार बदलत जातो तशा भूतकाळात घडलेल्या गोष्टी ही नकळत वजा होत जातात आणि एखाद्या प्रसंगी त्या हुबेहूब नजरेसमोर तरळू लागतात. मग त्या गोष्टी, ते प्रसंग घरातले असू देत की शाळेविषयीचे. प्राथमिक शिक्षण ते बी.एड. पर्यंतचा प्रवास कौलारू घरात वीजेविना यशस्वी ठरला. अनेक प्रसंग ‌पावलोपावली घडले परंतु भीतीच्या सावटाचे पांघरूण कधी घेताच आले नाही. जून महिना सुरू झाला की गणवेश, दप्तर, वह्या मिळाल्या की एक वेगळाच आनंद प्राप्त व्हायचा. जगातलं सर्व सुख प्राप्त झाल्यासारखं वाटायचं. माध्यमिक शाळेत असताना सहा वर्षांसाठी दोन गणवेशांची सोबत. एक अजूनही तसाच पुस्तकांच्या  कपाटात आपलं अस्तित्व मांडून बसलेला सतत नजरेसमोर असतो. एखादवेळी त्याला स्पर्श केला तर न सुकलेला, ओलसरपणा असलेला गणवेश परिधान करण्याचे प्रसंगही आठवतात. शाळेचे दिवस आणि पाऊस यांच्या एकत्रितपणाच्या गोड आठवणी कधी साठवताच आल्या नाहीत कारण बेभान पावसाची सुरुवात सकाळीच सुरू झाली की पावणे आठच्या शाळेला साडेआठ नक्कीच वाजायचे. सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी येणारी दिपसंदेश बस ही सहा वर्षांच्या प्रवासातील आणखीन एक सोबती. सकाळी जाताना बसमध्ये उभे राहणे सोडूनच द्या. एखाद्याला लटकत ठेवावं अशा तऱ्हेने नेहमी दारावर लोंबकळत शाळेपर्यंत पोहचायचो. पाठीवरची बॅग बसलेल्यांपैकी कुणाकडे देणे शक्यच नसायचे कारण पहिल्या सीटवरच्या दोन्हींपैकी एकाचेही तोंड दिसत नसायचे एवढ्या दप्तरांचे ओझे त्यांच्याजवळ असायचे. एक दप्तर पाठीला लावून बसमध्ये चढणं फार अवघड असायचे. सहा वर्षांत दिपसंदेश बसचं दार सकाळच्या पेसेंजरना घेऊन जाताना बंद असे कधी घडलेच नाही. पावसात तर बसमधून अर्धं डोकं बाहेर असाच प्रवास असायचा. मग वह्या-पुस्तकांना प्लास्टिक पिशवीत घालून ती पिशवी बॅगमध्ये घातली जायची कारण बॅग सतत‌ भिजून ओलीचिंब झालेले असायची. गणवेश ही थोडाफार भिजलेला. बसचं दार पूर्णपणे उघडं असलं की मग कंडक्टर काका आम्हाला ड्रायव्हरच्या बाजूला असलेल्या दरवाजाने चढायला लावायचे. वीस मिनिटे ड्रायव्हर काकांच्या सीटच्या मागे सरळ न थांबता डोकं खाली घालून उभ राहणं असह्य व्हायचं त्यावेळी. परंतु शाळेत वेळेवर पोहोचणं ही गरजेचं होतं. उशीर झाला तर शारीरिक शिक्षक पाटील सरांकडून कधी शिक्षा मिळाली नाही कारण सरांशी कधी खोटं बोलता आलंच नाही. तसे सर्वच शिक्षक काळजी घेणारे. ज्यांना सगळीच मुलं घाबरायची त्या म्हणजे संध्या टीचर ज्यांचा सहवास मला एकच वर्ष लाभला. स्वत:च्या रुमालाने त्या डोकं पुसायच्या आणि नंतर कठोर शब्दात म्हणायच्या, बेगीन चल क्लासीन टाईम जालो'. त्यांचा सहवास आम्हा विद्यार्थ्यांना आणि शाळेला आणखीन काही वर्ष लाभला असता तर कदाचित आजच्यापेक्षा आणखीन वेगळ्या पध्दतीने संस्कार माझ्यावर झाले असते. ओला झालेला गणवेश घरी आल्यावर चोवीस तास गोठ्यात पेटणाऱ्या परशावर सुकवला जायचा पावसाचा जोर जास्त असला की मग घरातील चुलीच्या वरती बांबूपासून बांधलेली तडकी म्हणजेच उतवावर सुकत घालायचे. वह्या-पुस्तकं भानोशीवर सुकत घालायची. आग पेटणारी असली की गणवेश चांगला सुकायचा पण एखादवेळी चुलीतून धूर निघाला की त्या ओलसर गणवेशाला धूराचा वास सुटायचा. आज परफ्यूमची बाॅटल हातात घेतली की दादाचा आणि माझा वेडेपणा आठवू लागतो. गणवेशच्या आतील बाजूस सुगंधित पावडर लावायचो जेणेकरून धुराचा वास त्यांच्यात मिसळल्यासारखा वाटायचा. आज पंख्याखाली कपडे सुकताना पाहिले की काळाच्या ओघात गोठ्यातील हरवलेला परसा आठवू लागतो. पावसात भिजले की  घरातील चुलीसमोर नाहीतर परशाच्या आगीकडे बसून सुकवलेले कपडे  आज भिजल्यानंतर दुसरे कपडे परिधान करताना हे सगळे क्षण आठवू लागतात. १०-१५ वर्षे मागे वळून पाहिले की, आपण न मिळणाऱ्या गोष्टीतही किती आनंदी होतो आणि आज स्वतः भविष्याची स्वप्ने साकार करण्याच्या प्रयत्नात आपण खचून जातोय. आपल्यातील आत्मविश्वास गमावतोय या विचाराने मन तुटू लागते. आयुष्यातील खडतर प्रवासात आनंद प्राप्त केला तो आज सुखी प्रवासात लाभत नसल्याचे कटू सत्य अंगिकारावे लागत आहे. एखाद्या गोष्टीची जिद्द असली की मग अवतीभोवतीचा परिसर, समाज, त्यात वावरणारी माणसं काय म्हणतील याचा कधी विचारही न करता खंबीरपणे आम्ही जगलो आणि आज समाज काय म्हणेल या भावनेनेचं हळवं व्हायला होतं. कारण काळ, प्रवास बदलला भूतकाळाचा संदर्भ वर्तमानाशी जोडण्याचा संपर्क तुटलेला आहे. त्यांची एकमेकांशी गाठ घालून आदर्शही नाही आपण निर्माण करु शकत कारण जग बदललं आता बदल फक्त आपल्याला करायचा आहे. गतकाळाच्या आयुष्यातील उणिवांची जाणीव आता करून घ्यायची आहे.

तसं सगळचं बदललंय...

मी, माझे, आमचे असे सगळेच...

मी भूतकाळाच्या जखमांना 

पुन्हा मलमपट्टी करतेय...

आणि तोच वर्तमान 

हुबेहूब उभा राहतोय 

नवीन जखमा घेऊन...

पुन्हा तीच मलमपट्टी 

नव्या जखमांवरती करताना

बदल जाणावतो...

न जाणवणारी वेदना आता

खऱ्या अर्थाने जाणवू लागते...

तसं सगळंच बदललं...

मी,माझे...असे सगळेच


ओनिता रामा वरक, पाल-ठाणे‌, सत्तरी.