मोल अवयवदानाचे

अवयवदानाबद्दल आपण अनेकदा ऐकत असतो. मृत्यूनंतर अवयवदान केले अशा बातम्याही आपण वाचत असतो. अशा वेळी आपल्या मनात कित्येक प्रश्न येऊ शकतात. जसे की, कोणकोणते अवयव आपण दान करू शकतो?, कोणतीही व्यक्ती आपले अवयवदान करू शकते का?, अवयवदानाची प्रक्रिया काय असते? या प्रश्नाची उत्तरे अजून मिळाली नसतील तर आज आपण ती या भागातून जाणून घेऊ

Story: आरोग्य |
27th July, 05:06 am
मोल अवयवदानाचे

वैद्यकीय तंत्रज्ञान प्रगत झाल्यामुळे एका व्यक्तीचे अवयव दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहचवून अवयव प्रत्यारोपण करणे सोपे झाले आहे. एक व्यक्ती आपले अवयवदान करून एकाच वेळी ८ लोकांना जीवनदान देऊ शकते. पण भारतात अवयवदान व प्रत्यारोपणाचे प्रमाण बाकीच्या देशांपेक्षा खूप कमी असल्यामुळे व अवयवांची उपलब्धता न झाल्यामुळे भारतात दरवर्षी सुमारे ५ लाख लोक आपला जीव गमावतात. हळूहळू आता आधीपेक्षा लोकांमध्ये अवयवदानाबद्दल जागरुकता वाढताना दिसून येत आहे. ही जागरुकता वाढवण्यासाठी दरवर्षी १३ ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय अवयवदान दिन साजरा केला जातो. 

अवयवदान कोण, कधी व कसे करू शकतो? 

मागे कधीतरी ‘मरावे परी अवयवरूपी उरावे’ असे काहीतरी एका लेखात वाचलेले. अन् खरंच अवयवदानाद्वारे हे गरीब-श्रीमंत सर्वांनाच शक्य होण्यासारखे आहे. तरी जिवंतपणी अवयव देण्याच्या प्रक्रियेत महिलांचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक असल्याचे दिसून येते. कोणीही निरोगी असलेली व्यक्ती जीवनाच्या तीन टप्प्यांत आपले अवयवदान करू शकते.

१. जिवंतपणी - बोन मॅरो, एक मूत्रपिंड आणि यकृत/ फुप्फुस/ स्वादुपिंड या तीन अवयवांच्या काही भागाचे दान करता येते. हे फक्त रक्ताचे नाते असलेल्या व जवळच्या नातेवाइकांमध्येच होऊ शकते. सुदृढ व निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकते.

२. मेंदू मृत घोषित झाला असल्यास - हृदय, मूत्रपिंड, यकृत, फुप्फुस, स्वादुपिंड, छोटे व मोठे आतडे, स्वरयंत्र, कंठनाळ, गर्भाशय, कानाचा मध्यभाग, त्वचा, हाडे, रक्त धमन्या, रक्त वाहिन्या, मज्जातंतूची शीर, बीजकोष किंवा अंडाशय, हातापायाची बोटे असे अनेक अवयवांचे दान करता येते.

३. नैसर्गिक मृत्यू झाल्यास -  डोळे, त्वचा, हृदय, रक्त धमन्या, रक्त वाहिन्या इत्यादी अवयव दान करता येतात. नैसर्गिक मृत्यू आधुनिक रुग्णालयात झाला तरच हे अवयव दान शक्य होते. मृत्यू घरीच झाल्यास डोळे आणि त्वचा हे दोन अवयव दान करू शकतो. यानंतर देहदानही करता येते, ज्याचा उपयोग वैद्यकीय शिक्षणासाठी आणि संशोधनासाठी केला जाऊ शकतो. 

कोणतीही निरोगी व्यक्ती अवयव दान करू शकते.

 एचआयव्ही, कँसर, मधुमेह, किडनी, हृदयाचे आजार किंवा इतर जलद पसरणाऱ्या आजाराने ग्रस्त असलेली व्यक्ती अवयवदान करू शकत नाही.

 ब्रेन डेड झाल्यावर हृदयाची धडधड चालू असेपर्यंत अवयवदान करता येते.

 डोक्याला दुखापत, स्ट्रोक, ब्रेन ट्यूमर, मेंदूला हानी पोहचवणारा कोणताही आजार असलेली व्यक्ती अवयवदान करू शकत नाही.

 जन्मापासून वयाच्या ६५ वर्षापर्यंत अवयवदान केले जाऊ शकते.

अवयवदानाची प्रक्रिया 

आपण ऑनलाईन फॉर्म भरून किंवा संबंधित हॉस्पिटलशी संपर्क साधून अवयवदानासाठी नोंदणी करू शकतो. या नोंदणीवेळी दोन साक्षीदार सोबत असणे गरजेचे असते. त्यापैकी एक आपल्या कुटुंबातील व्यक्ती असावा लागतो. नोंदणी झाल्यावर एक डोनर कार्ड दिले जाते. संबंधित व्यक्ती मृत पावल्यास त्याच्या कुटुंबाने हॉस्पिटलशी संपर्क केल्यावर हॉस्पिटल मार्फत व्यक्ती ब्रेन डेड असेल तरच त्याचे अवयव काढून घेतले जातात. 

शरीरातील चेतना व श्वासोच्छ्वास या दोन्हींचे केंद्र मेंदूत ज्या भागात असते त्या ब्रेनस्टेम या भागाला कायमस्वरूपी इजा झाल्यास व्यक्ती ‘ब्रेन डेड’ होते. अशा व्यक्तीचे हृदय कृत्रिमरित्या वेंटीलेटरवर काही काळ चालू ठेवता येते. सर्व अवयवांना या काळात कृत्रिमरित्या प्राणवायू पुरवला गेल्यामुळे, मेंदू सोडून सर्व अवयव सुरक्षित व कार्यरत असतात. याच वेळी अवयवदानाचा निर्णय घेता येतो. ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन राष्ट्रीय व राज्य स्तरावर काम करतात. अवयवदान सुरळीतपणे पार पाडण्यासोबत प्रशिक्षण, प्रचार आणि जागृतीसाठी या संस्था कार्यरत आहेत. जास्तीतजास्त रूग्णांना अवयव मिळावे यासाठी व सध्या असलेली पोकळी भरून काढण्यासाठी अधिक अवयव दात्यांची गरज आहे. तसेच अवयवदानाविषयी आपल्या सभोवतालचे गैरसमज दूर करण्याची गरज आहे.


डॉ. श्वेता राऊत मुळगावकर