देशात सॅटेलाइट टोल वसुली यंत्रणेची घोषणा

नितीन गडकरींची राज्यसभेत माहिती : सध्या निवडक टोलनाक्यावर कार्यवाही

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
26th July, 04:18 pm
देशात सॅटेलाइट टोल वसुली यंत्रणेची घोषणा

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोठा निर्णय घेत सध्याची टोल व्यवस्था रद्द केली आहे. यासोबतच सॅटेलाइट टोल वसुली यंत्रणा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. सरकार टोल रद्द करत असून लवकरच उपग्रहावर आधारित टोलवसुली यंत्रणा सुरू केली जाईल. टोलवसुली वाढवणे आणि टोलनाक्यांवरील गर्दी कमी करणे हा या प्रणालीच्या अंमलबजावणीमागचा उद्देश आहे, असे ते म्हणाले.

राज्यसभेत लेखी उत्तर देताना गडकरी यांनी असेही सांगितले होते की, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (जीएनएसएस) लागू करणार आहे. सध्या हे फक्त निवडक टोलनाक्यांवरच होईल. तत्पूर्वी, नितीन गडकरी म्हणाले होते, आता आम्ही टोल रद्द करत आहोत आणि उपग्रहावर आधारित टोल वसुली प्रणाली असेल. तुमच्या बँक खात्यातून पैसे कापले जातील आणि तुमच्या अंतरानुसार शुल्क आकारले जाईल. यामुळे वेळ आणि पैशांची बचत होईल.

करण्यात आले होते कार्यशाळेचे आयोजन 

२५ जून २०२४ रोजी जीएनएसएस आधारित प्रणालींवरील भागधारकांशी सल्लामसलत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर, ७ जून २०२४ रोजी ग्लोबल एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (ईओआय) सादर करण्यात आला, ज्यामध्ये व्यापक औद्योगिक सहभागास आमंत्रित करण्यात आले होते. ईओआय सबमिट करण्याची अंतिम तारीख २२ जुलै २०२४ होती.

डिसेंबर महिन्यात केली होती घोषणा

यापूर्वी डिसेंबरमध्ये नितीन गडकरी यांनी घोषणा केली होती की भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) ने मार्च २०२४ पर्यंत ही नवीन प्रणाली लागू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि टोल प्लाझावर प्रतीक्षा वेळ कमी करण्याच्या प्रयत्नांबद्दल जागतिक बँकेला माहिती देण्यात आली आहे. फास्टॅग लागू झाल्यामुळे, टोल प्लाझावर सरासरी प्रतीक्षा वेळ लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. कर्नाटकातील एनएच-२७५ च्या बंगळुरू-म्हैसूर सेक्शन आणि हरयाणातील एनएच-७०९ च्या पानिपत-हिसार सेक्शनवर याचा प्रयत्न केला गेला आहे.