वादळी वाऱ्याचा फटका बसून सत्तरी तालुक्यात पुन्हा नुकसान

अनेक घरांची हानी : पाडेली येथील ट्रान्सफॉर्मर कोसळला

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
25th July, 12:14 am
वादळी वाऱ्याचा फटका बसून सत्तरी तालुक्यात पुन्हा नुकसान

वाळपई : सोमवारी मध्यरात्री चक्रीवादळाचा फटका बसून सत्तरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात हानी झाली. बुधवारी पुन्हा एकदा तालुक्याच्या अनेक भागांत चक्रीवादळाचा फटका बसला.

पाडेली येथील विजेचा ट्रान्सफॉर्मर कोसळल्याने या भागातील वीजपुरवठा खंडित झाला. अनेक भागातील वीजवाहिन्यांची दुरुस्ती अजूनपर्यंत झालेली नाही. मुरमुणेमध्ये तीन दिवसांपासून वीज पुरवठा खंडित झाला आहे.

सोमवारी मध्यरात्री चक्रीवादळाचा फटका बसल्यानंतर सत्तरी उपजिल्हाधिकारी व मामलेदार कार्यालयाच्या यंत्रणेतर्फे सर्वेक्षण हाती घेण्यात आले. उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांत पडझडीचा अहवाल सरकारला सादर करण्यात येणार अाहे.

भिरोंडा पंचायत क्षेत्रातील पाडेली येथे असलेला ट्रान्सफॉर्मर बुधवारी संध्याकाळी वादळी वाऱ्याचा फटका बसून कोसळला. ट्रान्सफॉर्मरवर नारळाचे झाड पडल्यामुळे त्याचे नुकसान झाले. यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे.

केरी येथील महेश वरंडेकर यांच्या घराला वादळी वाऱ्याचा फटका बसून छपराचे नुकसान झाले. 

मुरमुणे भागातील वीजपुरवठा तीन दिवसांपासून गायब

गेल्या तीन दिवसांपासून गुळेली पंचायत क्षेत्रातील मुरमुणे भागातील वीजपुरवठा गायब झाला आहे. वीज पुरवठा पूर्वपदावर येत नसल्यामुळे नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत अाहे. गुरुवारपर्यंत वीज पुरवठा पूर्वपदावर न आल्यास वाळपई वीज कार्यालयावर मोर्चा नेण्याचा इशारा या भागातील ग्रामस्थांनी दिला आहे. या संदर्भात बैठक बुधवारी संध्याकाळी घेण्यात आली. बैठकीमध्ये वारंवारपणे वीजपुरवठा खंडित होणे व गेल्या तीन दिवसांपासून वीज पुरवठा गायब होण्याच्या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला.