जादूचा दगड

Story: छान छान गोष्ट |
21st July, 03:45 am
जादूचा दगड

श्रीरामपूर गावात खंडू नावाचा एक छोटा मुलगा राहात होता. सगळी मुलं त्याची थट्टा करायची, त्याला चिडवायची. ‘‘देवा, मला उंच कर मग मला कुणी म्हणून नाही बघ!” खंडू देवबाप्पासमोर हात जोडून रोज सांगायचा.

खंडूही वाढत्या वयाबरोबर हळूहळू वाढत होता पण त्याची उंची काही वाढत नव्हती. मुलं चिडवायची, “हेss दिडफुट्या तो दिडफुट्या... नि वरून म्हणतो, मी काहीतरी करून दाखविन, मी मोठा होईन... तोंड बघा मोठा होणाऱ्याचं!” खंडूला फार वाईट वाटायचे. आपल्या बरोबरच्या मुलांशी खेळावे, फिरावे, बागडावे असे त्याला सारखे वाटायचे. पण कोणी त्याला जवळ करत नव्हतं. त्याच्या आईलाही दुःख व्हायचे या गोष्टीचे, पण काय करणार! नशिब आपले म्हणून गप्प रहायची बिचारी...

लहानगा कुरळ केसाचा खंडू दिसायला फार गोडस राजस होता. एखाद्या फुलासारखे त्याच हसणे होते. बोलणे तर फारच गोड वाटायचे कानाला. बिचारा रोज एकटा शाळेत जायचा नि घरी यायचा. असं वय ते कितीसं होत त्याचं.. पहिलीतच तर होता खंडू हा! पण अभ्यासात आपला हा खंडू फार हुशार होता बरं का... पहीला नंबर कधी सोडला नाही. कुठल्याही स्पर्धेत याचाच नंबर पहीला असायचा.

एकदा असाच वाटेत फिरता फिरला त्याला एक स्वच्छ पांढरा गुळगुळीत दगड मिळाला. खंडू एकदम खुश झाला. त्याला त्याच्या आजीचं बोलणं आठवलं की, “दगडाला अंग घासलं ना आंघोळीच्या वेळी, तर हात-पाय गुळगुळीत होतात.” मग काय विचरता! तो दगड घेऊन

 खंडू घरी आला. 

उकाड्याचे दिवस होते. संध्याकाळच्या वेळी खंडू रोज गार पाण्यानं पुन्हा आंघोळ करायचा. आंघोळ करता करता रस्त्यातून आणलेला गुळगुळीत पांढरा दगड हातापायावरून फिरवू लागला. त्याला काय माहीत तो दगड जादूचा होता ते! आणि काय आश्चर्य!!! त्याची उंची हळूहळू वाटु लागली. सामान्य मुलांसारखा तो दिसायला लागला. आंघोळ करून बाहेर आल्यावर आईने त्याला ओळखलं नाही. “कोण तू खंडूचा मित्र का?” आई त्याला पाहुन विचारू लाग‌ली. “आई गं, मी तर तुझ खंडू..! आई मी उंच झालोय.” असं म्हणत खंडू आनंदाने टाळ्या पिटुन नाचू लागला.

त्यानं दगड आणल्यापासून कसा घासला वगैरे आईला सांगितलं. आईही खूश झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी तो शाळेत गेल्यावर त्याला कुणी ओळखेचना. “अरे, असं काय करता!” मुलांना कमाल वाटली. खरंच वाटेना हा खंडू आहे म्हणून! मुलं आपसात बोलू लागली. “हे कसं काय घडलं?” सारेजण त्याच्या भोवती घोळका करून त्याला काैतुकाने विचारू लागले. “सारी त्या देवबाप्पाची जादू...” असं म्हणत खंडू गप्प राहीला.

आता सारी मुलं खंडूला खेळायला घेत होती. त्याच्याबरोबर फिरत होती. आता तो फार खुश होता. देवबापाच्या पुढ्यात उभा राहून दगड दाखवल्याबद्दल त्याला मनापासून हात जोडत होता. “ही सारी देवबाप्पाने केलेली जादूच्या दगडाची करामत!” असं म्हणतंच आईने खंडूला जवळ घेतलं. तो ही आनंदाने तिच्या कुशीत शिरला...


गौरी भालचंद्र