परंपरा मातीशी असलेला संबंध जोपासण्याची

मानव आणि माती यांचा फार जवळचा संबंध आहे. माणसाचे त्याच्या मातेसारखेच मातीशीही अतूट असे नाते आहे. म्हणूनच तर जन्म देणाऱ्या मातेला जननी असे तर संगोपन करणाऱ्या मातेला भू-माता किंवा धरणी माता असे संबोधले जाते. आपल्या पूर्वजांनी निसर्ग व निसर्गाशी निगडित या घटकांच्या संवर्धन व संरक्षणाचे अचूक नियोजन करून ठेवलेले आहे. पंचमहाभूतांचा आदर का व कसा करावा याची शिकवण त्यांनी आपल्याला सण-उत्सवांच्या माध्यमातून आधीच देऊन ठेवलेली आहे.

Story: साद निसर्गाची |
21st July, 04:36 am
परंपरा मातीशी असलेला संबंध जोपासण्याची

अंत्रूज महालातील माशेल गावात साजरा होणारा चिखलकाला हा मृतिका ह्या पंचमहाभूताप्रती आदरभाव व्यक्त करणारा असाच एक उत्सव. मातीप्रती आदरभावना व्यक्त करणे किंवा मातीशी माणसाचे असलेले नाते अधोरेखित करणे हाच बहुधा या सणाचा मुख्य हेतू असावा. चिखलकाल्याच्या माध्यमातून भक्तगण आपली देवाप्रती असलेली श्रद्धा चिखलात लोळून व्यक्त करतात. संपूर्ण गोमंतकात आपल्याला हा उत्सव फक्त माशेलमधील देवकीकृष्ण रवळनाथ मंदिराच्या प्रांगणातच अनुभवायला मिळतो. 

आषाढी शुक्ल द्वादशीला, दुपारी बारा वाजता, आषाढी एकादशीने सुरुवात झालेल्या २४ तासांच्या अखंड भजनी नामस्मरणाची सांगता झाल्यानंतर चिखल काल्याला सुरुवात होते. चिखलात खेळ खेळणाऱ्या भक्तगणांना 'खेळगडे' असे म्हणतात.

चिखलात खेळताना हा चिखल अंगाला चिकटू नये म्हणून की काय याचे नक्की कारण जरी माहीत नसले तरी खेळ खेळण्यासाठी चिखलात उतरण्याअगोदर खेळगडे संपूर्ण अंगाला तेल लावतात. हे तेल गावच्या गोवेकर तेल्याकडून पारंपरिक पद्धतीने अंगाला लावून घेतले जाते. अंगाला तेल लावल्यानंतर खेळगडे दाड सकाळ या देवाच्या मंदिरात जाऊन समईला प्रदक्षिणा घालतात व समईतील थेंबभर तेल काढून अंगाला माखतात. नंतर विठ्ठल नामाचा जयघोष करत 'जय विठ्ठल हरी विठ्ठल' नामाच्या गजरात पखवाज, टाळ, ताशे, तुतारीच्या तालावर नाचत खेळगडे चिखलकाला खेळण्यासाठी विठ्ठलनामाचा जयघोष करत मैदानावर जमतात. खेळांमध्ये लहान-थोर, पुरुष-महिला, बाळगोपाळ, तरुण मंडळी व वयस्क भाविक असे सगळेजण मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने सहभागी होऊन पारंपरिक खेळांचा आनंद लुटतात. 

अंगाला तेल लावल्यानंतर खेळगडे देवकीकृष्ण मैदानावर असलेल्या पिंपळपाराजवळ जमा होतात आणि पहिल्या खेळाची सुरुवात होते. मंदिरासमोर असलेल्या या भल्या मोठ्या मैदानाला लोक 'देवकीकृष्ण मैदान' म्हणूनच संबोधतात.

चिखलकाला खेळायला गोव्यातीलच नव्हे तर गोव्याबाहेरील लोकही मोठ्या संख्येने भाग घेऊन चिखलाचा मनसोक्त आनंद लुटतात. लग्न जुळावे, मूल व्हावे, रोग बरा व्हावा म्हणून कित्येक लोक देवाला नवसही बोलतात. नवस फेडण्यासाठी आलेले भक्तगण पिंपळपारावर उभे राहून पारंपरिक पद्धतीने खोबऱ्यापासून बनवलेले लाडू फेकतात. हा खाद्यपदार्थ जिंकून घेण्यासाठी मोठी झुंबड उडते. लाडू जिंकून घेणे हा पहिला खेळ. त्यानंतर आंधळी-कोशिंबीर, जमीनचक्र, मेंढरांनी, पकडा-पकडी, धनगरांचा खेळ, कबड्डी, चेंडू-फळी, शक्तिप्रदर्शन, बेडूक उड्या, विटी-दांडू, लग्न यासारखे विविध खेळ खेळले जातात. 

चिखलकाल्याच्या निमित्ताने खेळगडे लहानपणी देव श्री गोपाळकृष्ण खेळत असलेले सगळे खेळ खेळतात, असे जाणकार सांगतात. साधारण दोन- अडीच तास चालणाऱ्या चिखलकाल्यातील पारंपरिक खेळांची सांगता दहीहंडीने होते. दहीहंडी फोडल्यानंतर परंपरेप्रमाणे सगळे खेळगडे येथील पारंपरिक धोबी तलावावर जाऊन आंघोळ करतात व परत एकदा देवकीकृष्ण रवळनाथ मंदिरात एकत्र जमतात. सर्व भाविकांच्या उपस्थितीत मंदिरात गाऱ्हाणे घातले जाते. आरती, तीर्थप्रसादानंतर चिखलकाल्याची सांगता होते.


स्त्रिग्धरा नाईक