पर्जन्य ऋतुतल्या गीत सरी

वसंत ऋतुत कोकिळेला जसा कंठ फुटतो, तसा वर्षा ऋतुत कवींच्या काव्याला बहर येतो. त्यातून निर्माण होतात अजरामर अशी ‘वर्षागीते’. जी सर्वांच्या ओठी आणि मनात रुंजी घालू लागतात. कवींच्या कवि मनातल्या भावना आपल्या होऊन जातात. त्या गीतासोबत रिमझिम बरसणाऱ्या पाऊस धारात आपणही चिंब भिजून जातो.

Story: मनातलं |
20th July, 03:49 am
पर्जन्य ऋतुतल्या गीत सरी

अंगणी कोसळणारा पाऊस आणि ओठी गाणं हातातहात घालूनच येतं, हे आपण लहानपणापासून अनुभवत आलो. अशा या धुंदवेळी सगळ्या प्राणिमात्रांच्या चित्तवृत्ती बहरून आलेल्या असतात.  पुलकित झालेल्या.  या मनाला मग शब्द साथ देतात.  ओठातून गीत बाहेर येतं. पाऊस सुरू झाल्यावर एक वेगळाच फिल सगळ्यांच्या मनात असतो. पावसावरच्या कविता आपल्या जीवनाचे अविभाज्य भाग होऊन गेलेल्या असतात.     

लहानपणी दोन्ही हात पसरून स्वत:भोवती गोलगोल गिरक्या घेत म्हटलेले येरे येरे पावसा, तुला देतो पैसा, सर आली धावून, मडके गेले वाहून या बडबड गीताचा कवि कोण ठाऊक नाही पण पिढ्यानपिढ्या पाऊस मात्र हे गीत बरोबर घेऊन येतोच.  मग ओहोळात कागदाच्या बोटी सोडलेल्या, त्याही जाऊ लागतात वाहून, आगोबाई ढगोबाई ढगाला लागली कळ म्हणत मैत्रिणी बरोबरचा फेर धरत केलेला नाच, आईकडे ए आई मला पावसात जाऊ देना म्हणून केलेला हट्ट.  चिंब भिजायची हौस असते पण धाक असतो मनात. टप टप टप काय बाहेर वाजतेय ते पाहू चल गं आई पावसात जाऊ म्हटलं की पाठीत मिळतो आईचा धपाटा. मग नाईलाजाने घरातच बसावं लागतं. नाचरे मोरा आंब्याच्या वनात काळा काळा कापूस पिंजला रे ढगांशी वारा झुंजला रे म्हणत मोराला मात्र मस्त पिसारा पसरवून नाचून दाखव बरं असा त्याला आग्रह करू लागतात मुलं. टप टप टप थेंब वाजती, गाणे गातो वारा, विसरा आता पाटी पुस्तक मजेत झेला गारा, पाऊस आला ,पाऊस आला. मजेत विचारलेला प्रश्न  सांग सांग  भोलानाथ पाऊस पडेल का ? शाळेमध्ये तळे साचून सुट्टी मिळेल का? असा हा बाळपणीचा पाऊस म्हणजे नुसती मज्जा अनुभवायची असते. 

मग तरूणपणीच्या पावसाची गाणी जरा हटके. तिला तो भेटलेला असेल तर भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिवसाची धुंद वादळाची होती रात्र पावसाची. हे गाणं रुंजी घालू लागतं. घन घन माला नभि दाटल्या कोसळती धारा असा पावसाचा जोर वाढू लागतो आषाढातला पाऊस असा धुंवाधार बरसत असतो मग अशावेळी तिला तिच्या प्रिय सख्याची आठवण येते, रिमझिम पाऊस पडे  सारखा  यमुनेला ही पुर चढे पाणीच पाणी चहूकडे गेला मोहन कुणीकडे, किंवा रिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात प्रिया वीण उदास वाटे रात. बरस बरस तू मेघा रिमझिम आज यायचे माझे प्रियतम आतुरलेले डोळे माझे बघती अंधारात. अशी त्याची वाट बघत वेळ संपता संपत नाही. बाहेर डोकावून बघावं तर झुंजुर मुंझुर पाऊस मऱ्याने अंग माझं ओलं गं, करून जातो.  अशा ओल्या सांजवेळी तो जवळ असावा असं वाटत असतं. त्याच्याबरोबर जोडीने पावसाचा अनुभव तिला घ्यायचा असतो. घन आत बरसे चाहूल सुखाची येते असं तिचं मन हळूवार झालेलं असतं. दूरवरून तो येताना दिसला की अंगणी माझ्या मनाचा मोर नाचू लागला अशी मनाची अवस्था थुई थुई नाचणाऱ्या मोरागत होते.  तिचा वर्षा ऋतु आता मिलन ऋतु होऊन बरसणार असतो. पाऊस गाण्यात पूर्वी लहान वयात लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलींना वेध लागायचे ते पावसाचे. कारण त्या दिवसात येणारे सण आणि माहेराची आठवण आला आला वारा संगे पावसाच्या धारा पाठवणी करा सया निघाल्या सासुरा, अशी गाणी करून देतात. आकाशी आलेल्या मेघ मालिकांना पाहून मोर वनी नाचू लागतात, केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर गहिवारला मेघ नभी सोडला गं धीर या गाण्याने बनात नाचणारा मोर नजरेसमोर उभा  राहतो. तर श्रावणात घननिळा बरसला रिमझिम रेशीमधारा, उलगडला  झाडांतून अवचित हिरवा मोरपिसारा, घनाला निळा रंग पण पिसारा मात्र हिरवा फुलला तोही झाडांचा कल्पना किती नयनरम्य आहे. येरे घना येरे घना न्हाऊ घाल माझ्या मना, इथे तनाला नाही मनाला न्हाऊ घालणारा मेघ अपेक्षित आहे. निसर्ग कवींच्या कल्पनेला तोड नाही. तर मन चिंब पावसाळी, झाडात रंग ओले, घनगर्द  सावल्यांनी, आकाश वाकलेले. इथे कवीला रंग ओले वाटतात, जणू हात लावला तर तो हिरवा रंग आपल्या हाताला लागणार आहे असं वाटतं. अशा ओलेत्या  निसर्गाचा परिणाम मनावर नकळत होत असतो. बेसुमार धिंगाणा घालणाऱ्या पावसाला मग कवयित्रीचे  मन सांगत असते, नको नको रे पावसा असा धिंगाणा घालू अवेळी, घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली. माझा प्रियतम घरी येऊन पोचला की घाल हवा तेव्हढा  धिंगाणा असं विनवते. आषाढ संपून श्रावणमास सुरू होतो तसा पावसाचा जोर ओसरू लागलेला असतो. नदी नाले तुडुंब होऊन वाहत असतात. हिरवाईची हिरवी जादू सर्वदूर पसरलेली असते कवीला मग ओळी सुचतात श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे किती तंतोतंत शब्दांची रचना निसर्गाच्या या रुपासाठी बनवली आहे. तर गावाकडं तिथल्या भाषेत नभ उतरू चिंब थरथर वलं, अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात. अशा ओळी ओठी येतात. शेतकरी बिगी बिगी कामाला लागलेला असतो त्याचा मैतर पर्जन्य राजा त्याच्या दारी आलेला असतो. काळ्या मातीत मातीत तिफण चालतं, म्हणत पेरणी सुरू झालेली असते. थोड्याच दिवसात शेतातलं पीक उभं राहिलेलं असतं शेतकरी राजा सुखावलेला असतो थोडा  विश्राम करत नाच गाण्याच्या तालावर दंग होतो. दिवस सुगीचे सुरू जाहले ओला चारा बैल माजले, छन खळ खळ ढुम ढुम पट ढुम. शेतात परिसरात सगळीकडे हिरवाई लेऊन श्रावण सजलेला असतो ऋतु हिरवा ऋतु बरवा पाचुंचा वनी रुजवा. नभी उमटे इंद्रधनू गगन आणि धरणीचा मिलन सोहळा असा रंगत आलेला असतो. पर्जन्य राजा जसा विरहाची व्यथा वाढवतो तसाच मिलनाची गोडी  सुद्धा मधुर करतो. आणि अशा या वर्षाऋतुच्या वेळी टीप टीप पाऊस झोझो वारा, गीत गाऊ पाहतो आसमंत सारा, तशी  चराचरात  पावसाने भरवली बघा ताला सुरांची जत्रा गीतांच्या रूपाने बघायला आणि अनुभवायला मिळते. 


प्रतिभा कारंजकर, फोंडा.