बरं का मुलांनो एका परी राज्यात एक गोंडस परी राहत होती. परीच ती दिसायला सुंदर, छान पांढरे शुभ्र पंख, निळे निळे डोळे, चंदेरी सोनेरी लांब केस अशी परी. तिचं नाव होतं ऍना. ऍना आपल्या आई-बाबा, आजी-आजोबा बरोबर राहायची. परीराज्याच्या शाळेत जायची. तुमच्यासारखीच मस्ती मजा करायची. अभ्यास करायची. एके दिवशी काय झालं असंच खेळता खेळता तिचा पंख एका भिंतीला घासला आणि जरासा वाकला. त्यामुळे ती जरा इतर परींपेक्षा वेगळी दिसायला लागली. तिच्या मैत्रिणी तिला त्या वाकड्या पंखामुळे त्यांच्या गटात घेत नसत. त्यामुळे ऍना घरीच राहू लागली. तिच्या घराकडच्या बागेत खेळायची. आई-बाबा बरोबर गप्पा करायची. आजी-आजोबाकडून छान छान गोष्टी ऐकायची आणि शाळेतून दिलेला अभ्यास करायची. अशीच एके दिवशी ऍना घरासमोरच्या बागेत खेळत होती. तिथल्या एका झाडाखाली तिला काहीतरी चमकताना दिसले. तिने खाली वाकून पाहिले. ती वस्तू हातात घेतली तर तो एक आरशाचा तुकडा होता. त्यात तिने स्वतःला पाहिले तर तिचा वाकडा पंख सरळ दिसत होता.
ऍना खूप खूश झाली. तिला तिचा वाकडा पंख सरळ झालेला पाहून तिला त्या आरशाच्या तुकड्यात परत परत पहात रहावे असे वाटू लागले. तिने तो आरशाचा तुकडा घरी आणायचा ठरवला आणि हळूच आपल्या फ्रॉकच्या खिशात पानांमध्ये गुंडाळून ठेवला. नेहमीसारखी बागेत थोडा वेळ फिरली तिच्या घरी परतायची वेळ होताच घरी आली व आई-बाबांना तिने आरशाचा तुकडा दाखवला. त्यांनीही त्या आरशात ऍनाचा पंख सरळ झालेला दिसला असं सांगितलं. ऍनाला खूश बघून तिच्या आई बाबांना खूप आनंद झाला. आता रोज ऍना आरशाच्या तुकड्यात बघायची. आपला वाकडा पंख पूर्वीसारखा झालाय असं बघून आनंदी व्हायची.
ऍनाने त्या आरशाच्या तुकड्याला एका डबीत ठेवले. त्या डबीला नाव दिलं जादुई डबी. हळूहळू ऍनामध्ये खूप सकारात्मक बदल होत गेला. तिला तिच्या पंखावरून कोणी चिडवले तरी ती उदास होत नसे. कारण इतरांना जरी तिचा पंख वाकडा दिसत असला तरी ऍनाला मात्र त्या जादूई डबीतील आरशात सुंदर पूर्वीसारखाच पंख दिसायचा. ऍना त्या जादूला खरं मानायची. म्हणूनच छान हसून त्या सगळ्या लोकांना सामोरे जाई. ऍनामध्ये हा झालेला बदल पाहून तिच्या आई-बाबांनी ऍनाला परत शाळेत पाठवायचे ठरवले. ऍनाही उत्साहाने, दुप्पट आत्मविश्वासानं शाळेत गेली. सर्वांनी तिचे हसत स्वागत केले. मात्र तिच्या वाकड्या पंखाकडे बघून आपापल्या बाकावर बसले. ऍना एकटीच वर्गात बसली होती. असाच रोजचा दिनक्रम सुरू होता. पण आता ऍनाकडे जादुई डबी असल्यामुळे ऍना उदास होत नव्हती. मन लावून अभ्यास केल्यामुळे ती वर्गात पहिली आली. तिच्याबरोबर हुशार असणारी मुलं मात्र रोज शाळेत येत असूनही अभ्यासात थोडी ऍनापेक्षा मागे राहिली. सर्वांना यांना बद्दल कुतूहल वाटले. असं काय घडलं की ऍनाला आम्ही आपल्यात घेतले नाही तरीही वर्गात पहिली कशी आली? सर्व वर्गात प्रत्येक जण एकमेकांना हेच विचारत होता. तेव्हा ऍना म्हणाली माझ्याकडे वाकडा पंख सरळ दाखवणारी एक जादुई डबी आहे. त्यामुळे मला खूप छान वाटत होतं. माझ्या आत्मविश्वास वाढला व मी मन लावून अभ्यास केल्यामुळे वर्गात पहिली आले.
तुम्ही मला आपल्या वर्गात माझ्या वाकड्या पंखांमुळे हसला नसता, आपल्यात सामावून घेतलं असतं तर मला खूप बरं वाटलं असतं. पण राहू दे. परत असं करू नका. तुम्ही माझे मित्र आहात असं म्हणून ऍनाने सर्वांसाठी आणलेला कप केक वाटला. सर्वजण परत ऍनाशी पूर्वीसारखेच वागू लागले.
मंजिरी वाटवे