गडकरींनी सूचवलेला 'बिकट मार्ग'

गडकरींनी पुढील दोन वर्षांत चुका सुधारण्याची संधी असल्याचे म्हटले आहे. सुधारण्यासाठी आधी चुका मान्य करायला हव्यात. सरकार आणि भाजपसमोर त्या स्वीकारण्याचे पहिले आव्हान आहे. महामार्ग मंत्री गडकरी यांनी सूचवलेले सगळेच मार्ग कठीण आहेत. त्यावर चालण्याचे धाडस गोवा सरकार करेल का हे पुढील काळात कळेल.

Story: उतारा |
14th July, 04:44 am
गडकरींनी सूचवलेला 'बिकट मार्ग'

भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी हे गोव्यातील भाजपसाठी नेहमीच सर्जनशीलपणे शस्रक्रिया करणाऱ्या निष्णात डॉक्टराच्या भूमिकेत पावतात. गोव्यात जेव्हा उलथापालथी झाल्या, भाजपला तत्वांना मुरड घालून असो किंवा बहुमतातील असो सरकार स्थापन करतानाही इतरांची मदत घ्यायची झाली तरीही गडकरीच हवे असतात. केंद्रातील नेत्यांनीही गडकरी यांच्याकडेच गोव्याची सूत्रे दिलेली असतात. गेली पंचवीस-तीस वर्षे गडकरी गोव्यात येतात त्यामुळे गोव्यातील भाजपची स्थिती त्यांना चांगलीच माहीत आहे. सुरुवातीला प्रमोद महाजन, राजनाथ सिंग, व्यंकय्या नायडू असे नेते गोव्यात यायचे. पण सरकार स्थापनेच्या काळात गडकरींनाच पाचारण केले जायचे. आता सलग तिसऱ्यांदा गोव्यात भाजप सत्तेत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी गेल्या पाच वर्षात सगळ्याच निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळवून दिले. पण लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यातील पराभव भाजपला खचून जाण्याइतका त्रासदायक ठरला. लोकसभा निवडणुकीत गोव्यातील एकूण २७ विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपला जास्त मते मिळाली. त्या २७ मतदारसंघांच्या भरवशावर २०२७ मध्ये भाजपला २७ पेक्षा जास्त जागा मिळतील असे गोव्यातील भाजप नेत्यांना वाटत आहे. किंवा तसे भासवले जात आहे. दक्षिण गोव्यातील यशामुळे काँग्रेस आणि इंडी आघाडीच्या इतर पक्षांनाही बळ मिळाले आहे त्यामुळे त्यांची मोर्चेबांधणी भाजपला त्रासदायक ठरू शकते याची जाणीव भाजपला नसावी. सलग पंधरा वर्षे सत्तेत राहिल्यामुळे भाजपविषयी जो असंतोष निर्माण होणार आहे त्यात अनेकांच्या नौका बुडू शकतात. गुजरात वगळता अन्य कुठेच भाजपला एवढी दीर्घकाळ सत्ता टिकवणे जमलेले नाही. नितीन गडकरी यांना गोव्यातील स्थितीची जाणीव झाली असावी त्यामुळेच त्यांनी गोव्यातील भाजपला जनतेची मते जाणून घेण्याचा आणि त्या प्रमाणे सुधारणा करण्याचा सल्ला दिला आहे. गोव्यात विधानसभेच्या निवडणुका दोन वर्षांनी होणार आहेत त्यामुळे त्याच्या तयारीला लागायचे असेल तर पूर्वतयारी म्हणून लोकांची मते जाणून घ्या, सर्वे करा, कामाचे ऑडिट करा आणि ज्या त्रुटी आहेत, जे दुखावले गेले आहेत त्यांना जवळ करा असा सल्ला गडकरींनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांनीही तत्काळ गडकरींच्या सूचना स्वीकारून त्याची कार्यवाही करण्यात येईल असे स्पष्टही केले. पुढील दोन वर्षांचा काळ हा परीक्षेचा काळ आहे त्यामुळे या दोन वर्षांमध्ये भाजपने जर सगळ्या गोष्टी सुरळीत केल्या तर २०२७ मध्ये भाजपचेच पुन्हा सरकार येईल असे गडकरींना वाटते. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री असलेले नितीन गडकरी यांनी सूचवलेला मार्ग हा सरकारला आरसा दाखवणारा आहे. कामाचे ऑडिट, गोव्याला काय हवे त्याचा सर्वे, विकास कामांचा फेरआढावा या सगळ्या गोष्टी करताना सरकारवर पुन्हा पुन्हा आरश्यात पाहण्याची वेळ येणार आहे त्यामुळे गडकरींनी सूचवलेला मार्ग तसा बिकट आहे. शिवाय त्या मार्गावर चालूनही २०२७ ची हमी देता येणार नाही. आता गडकरींचा आदेश मान्य करून गोव्यातील भाजप आणि भाजपचे सरकार लोकांपर्यंत जाऊन निराशा दूर करण्याचा प्रयत्न करते का ते पहावे लागेल.

ताळगावच्या कम्युनिटी हॉलमध्ये झालेल्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत नितीन गडकरी यांनी केलेले भाषण हे भाजपसाठी फार महत्त्वाचे आहे. विशेष म्हणजे त्यांच्या भाषणानंतर मुख्यमंत्र्यांनी गडकरींनी सांगितलेल्या गोष्टींची अंमलबजावणी करण्याचेही मान्य केले. दोन दिवसांपूर्वीच दिगंबर कामत यांनी २०२७ मध्ये डॉ. प्रमोद सावंतच मुख्यमंत्री होणार असल्याचे भाकीत केले होते. त्यानंतर लगेच गडकरींनी २०२७ मध्ये जिंकायचे असेल तर काय करायला हवे त्याचे धडे भाजपला दिले आहेत. 

भाजप कसा उभा राहिला त्याची काही उदाहरणे देत दोनच खासदार निवडून आले होते त्यावेळचा गंमतीशीर किस्सा गडकरींनी सांगितला. एका ठिकाणी पक्षाच्या कार्यक्रमासाठी गेलो असता तिथे भिंतीवर 'पर्याय पर्याय म्हणून ओरडतात कोण..ज्यांचे लोकसभेत निवडून आले दोन' असे लिहिलेले दिसले. ही त्यावेळची भाजपची स्थिती होती. ‘हम दो हमारे दो’ असे लोक थट्टेने म्हणत. भाजप संपला अशी चर्चा देशभर सुरू झाली. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी मेहनत केली आणि प्रवाहाच्या विरुद्ध संघर्ष करून कार्यकर्त्यांनी भाजपला वैभव प्राप्त करून दिले ही आठवण करून देताना पक्षाच्या प्रतिकूल परिस्थितीतल्या संघर्षाची जाणीवही त्यांनी उपस्थितांना करून दिली. भाजप उभी राहताना एका सभेत महम्मद करीम छगला यांनी अटलबिहारी वाजपेयी एक दिवस पंतप्रधान होतील असे भाकीत केले होते त्यावर बोलताना पंतप्रधान कोण होईल हे महत्त्वाचे नाही पण देश कसा असेल ते महत्त्वाचे आहे असे म्हणत देश कसा असेल त्याचा विचार वाजपेयींनी केला. म्हणजे स्तुतीने हुरळून न जाता भाजपचे भवितव्य उज्ज्वल करण्यावर त्यांनी त्यावेळी भर दिला. तेवढी परिपक्वता राजकारण्यांमध्ये असायही हवी असे गडकरींना सूचित करायचे आहे. 

गडकरींच्या मते गोव्यासाठी गेल्या पंधरा वीस वर्षांपासून जो विकासाचा कार्यक्रम आखला गेला, जे व्हिजन आहे त्याचा एकदा शांतपणे अभ्यास करण्याची गरज आहे. आणि व्हिजन पूर्ण करण्यासाठी देशाला इमानदारीने काम करणाऱ्या, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या नेत्यांची गरज आहे. गोव्यातील नेत्यांना गडकरींचे हे सल्ले किती प्रमाणात पचतात आणि पटतात तो विषय वेगळा आहे. 

गडकरी म्हणतात, जगातील पाच सुंदर शहरांमध्ये गोवा असायला हवा असे मुख्यमंत्री आणि पक्ष अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने ठरवले तर ते असंभव नाही. त्यासाठी नैतिकता, अर्थव्यवस्था आणि पर्यावरण यांचा समतोल लागेल. गडकरींनी सल्ले दिले असले तरी गोव्यातील बहुतांश राजकारण्यांसाठी या तिन्ही गोष्टींचा समतोल राखणे शक्य आहे का हा आज राज्यात सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे. 

राजकीय नेत्यांच्या कामाचे, आमदार, खासदारांच्या कामांचे ऑडिट करण्याचे आवाहन गडकरींनी केले आहे. पंधरा वर्षांत गोव्यात विकास झाला, कामे झाली पण अजूनही काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. महत्त्वाचे म्हणजे जनतेची सुख-दुःखं काय आहेत ती शोधण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सरकारने आतापर्यंत काय केले? पुढे काय करण्याची गरज आहे त्याचा शोध घेण्यासाठी पुढील दोन वर्षे आहेत. या दोन वर्षांमध्ये राज्यात सर्वे करून सरकारने काय चांगले केले जे जनतेला आवडले आणि काय चुकीचे केले किंवा जनतेत कशाविषयी नाराजी आहे ते शोधून काढा असे गडकरींनी सूचवले आहे. नाराजी दूर करा, सरकारच्या, पक्षाच्या समर्थनात असलेल्यांचा विश्वास मजबूत करा, जे रागावलेत त्यांची नाराजी दूर करुन त्यांचा विश्वास पुन्हा संपादन करा. या गोष्टीच २०२७ च्या निवडणुकीत भाजपला पुन्हा सत्तेत आणण्याचा मार्ग आहेत असे गडकरी यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे. 

पक्षांतरामुळे दुखावलेला कार्यकर्ता हे भाजपचे सर्वात मोठे दुखणे आहे. आयात केलेल्या आमदारांमुळे भाजपला उभारी देणारे कार्यकर्ते दूर झाले. जे आमदार भाजपात आले त्यांनी भाजपच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना आपल्या जवळही घेतले नाही. अशा नेत्यांना महत्त्वाची पदे देऊन भाजपने कार्यकर्त्यांना कायमची दारे बंद केली. जनतेत असलेला असंतोष, दुखावलेले कार्यकर्ते, मंत्र्यांचे कारनामे या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर भाजपला २०२७ मध्ये जिंकण्याचा जो आत्मविश्वास आहे त्याला सुरुंग लागू शकतो. गडकरींनी पुढील दोन वर्षांत चुका सुधारण्याची संधी असल्याचे म्हटले आहे. सुधारण्यासाठी आधी चुका मान्य करायला हव्यात. सरकार आणि भाजपसमोर त्या स्वीकारण्याचे पहिले आव्हान आहे. महामार्ग मंत्री गडकरी यांनी सूचवलेले सगळेच मार्ग कठीण आहेत. त्यावर चालण्याचे धाडस गोवा सरकार करेल का हे पुढील काळात कळेल.


पांडुरंग गांवकर, दै. गोवन वार्ताचे संपादक आहेत. मो. ९७६३१०६३००