भक्तांच्या मागोमाग जाणारा विठ्ठल

श्रीविठ्ठल भक्तजनप्रिय आहे. जेथे भक्त असतात तेथे श्रीविठ्ठल असतो. तो भक्तांच्या मागोमाग जाणारा देव आहे. परब्रह्म हे एक नाणे आहे. त्याची एक बाजू भक्तजन आहे तर दुसरी बाजू श्रीविठ्ठल आहे. पांडुरंगाच्या, विठ्ठलाच्या नामघोषात भक्त देहभान विसरतात आणि आनंदाने नाचू लागतात. जेथे जेथे भक्त असतात तेथे तेथे त्यांच्या संगती विठ्ठल राहतो. भक्तांची सोबत हे विठ्ठलाचे सुख आहे, तर देवाचे दर्शन हा भक्तांचा संतोष आहे. म्हणूनच वारकरी पंढरपूरची वारी करतात. ही वारी हरिदिनी म्हणजे एकादशीला असते.

Story: वेध |
14th July, 06:42 am
भक्तांच्या मागोमाग जाणारा विठ्ठल

शके १७३४ (इ.स. १८३२) आरफळकर, तासकर आणि खानदेशचे निष्ठवंत वारकरी खंडूजीबुवा आणि शिरवळकर या वारकर्‍यांची. ज्ञानदेव महाराजाच्या आदेशाप्रमाणे, दृष्टांताप्रमाणे आरफळकर आळंदीला ज्ञानदेव मंदिरात आले. चौघांनी माऊलीला साष्टांग नमस्कार घातला. आरफळकरांनी, पुंडलिक वरदे हरी विठ्ठलाचा नामघोष केला. ज्ञानदेव तुकामारामांचा नामघोष केला. माऊलींच्या पादुका शिरावर घेतल्या. प्रदक्षिणा घातली आणि विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल म्हणत चौघांनी पंढरीची वाट धरली. या क्षणापासून पालखीला प्रारंभ झाला. आरफळकर, शिरवळकर, तासकर, खंडोजी बुवा पंढरपूरला निघाले. विठ्ठल पंढरपुरी निघाले. दिंडी दिंडीतून गावोगावीचे, विदर्भाचे आणि कोकणचे, आंध्राचे आणि कर्नाटकाचे वारकरी पंढरपूरला, आषाढी एकादशीला नामसंकीर्तन करीत नामघोष करीत जाऊ लागले. एकादशीव्रतस्थ विठ्ठलभक्त विष्णुशयनोत्सवासाठी पंढरपूरला येऊ लागले. व्यक्तिशः दिंडीदिंडी रुपाने, आपापल्या फडासह वारकरी सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाऊ लागले. वारकर्‍यांचे, विठ्ठलभक्तांचे पंढरपूरला येणे ही एक अखंड प्रक्रिया आहे. या प्रक्रियेला प्रारंभ आहे पण शेवट नाही. वारकर्‍याच्या दिंडीला, वारीला प्रारंभ झाला तो द्वारकेहून. कृष्णदेव हे दिंडीरवनात आहेत. म्हणून रुख्मिणी दिंडीरवनात द्वारकेहून निघाली. तिच्या मागोमाग गोकुळामधून गोपवृंद आले. राधा आली. रूख्मिणी, राधा, गोपवृंद-गोपाल कृष्णदर्शनासाठी पंढरपूरला आले. येेथे कृष्ण विठ्ठलरूपात आहे. ज्या स्थानी कृष्ण विठ्ठलरूपात आला ते स्थान दिंडीश शिवाचे होते. येथे शिव दिंडीश नावाने यति, योगी, जनात प्रसिद्ध होता. दिंडीश हा शब्द, हे नाव कर्नाटकातील शिलालेखातही आढळते. दिडीश, दिंडिरवन आणि दिंडी ही तीन ही नावे वारकरी संप्रदायात, विठ्ठलभक्त वर्गात प्रसिद्ध आहेत. 

हा दिंडीश शिव पांडुरंग नावानेही प्रसिद्ध आहे. पांडुरंग नावावरुन ‘पंडरगे’ हे ग्रामनाम कन्नड भाषेत आणि शिलालेखांत प्रसिद्ध झाले. पंडरगे विठ्ठल असा पंढरपूरच्या विठ्ठलाचा उल्लेख शके ११५९ शिलालेखांत येतो. हा लेख संस्कृत कन्नड भाषेत असून पंढरपूर मंदिरावर कोरण्यात आला आहे. या लेखात कर्नाटकाचा राजा वीर सोमेश्वर पंढरपूरला वारीसाठी आला होता. याच लेखात पुंडलिकाचाही उल्लेख आहे. येथून आपणाला तीन-चार शिलालेख मिळू लागतात. त्यामधून नामदेव-ज्ञानदेव आणि पूर्वकालांतील वारकरी, फड आणि वारकरी संप्रदायाची माहिती मिळते. 

या महितीचा मागोवा घेत घेत आपण गेलो की, शके ४५० पर्यंत येतो. महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य भारत, आंध्र, गुजराथ, कोकण, विदर्भात विठ्ठलाची पूजा होत होती हे ताम्रपटातून व शिलालेखावरुन कळून चुकते आणि ज्ञानदेवपूर्व काळातील विठ्ठलभक्त आपल्याला भेटू लागतात. आपल्याला ज्ञानदेव-तुकाराम आणि तुकारामोत्तर आजपर्यंतचा वारकरी संप्रदाय माहीत आहे पण पुंडलिक, ज्ञानदेव, नामदेव आणि त्यांच्या कालखंडातील वारकरी आणि वारकरी संप्रदायाचे स्वरूप समजण्यासाठी ताम्रपट आणि शिलालेख मदत करतात. तसेच पुराणांचेही साह्य होते. 

स्कंद आणि देवी भागवत पुराणातून पंढरपूरच्या पुंडलिकाचे उल्लेख आलेले आहेत. स्कंदपुराणात १२ अध्यायाचे पंढरी महात्म आहे. तथापि ही तीनही बरीच प्राचीन आहेत.  प्राचीन पुराणात ज्याची गणना होते असेमत्स्यपुराण आहे. या पुराणात पंढरपूरचा उल्लेख लोहदंड तीर्थक्षेत्र पुंडरिकपूर असा येतो. मत्स्यपुराणाचा काल इ. स. ५००-६०० आहे. या पुराणात येणारा पुंडरिकपूर हा पंढरपूरचा आणि भक्तराज पुंडलिकाचा उल्लेख हेच स्पष्ट करतो की, शके ४२२ मध्ये पुंडरिकाची पुराण परंपरा पसरलेली होती. याच पुराणात पांडुरंगपल्लीचा ताम्रपट आहे. हा ताम्रपट आणि मत्सपुराणाच्या अभ्यासावरुन पुंडलिक महाराजांचा कालखंड आणि त्यांची भतराज म्हणून किर्ती शके ३५०-४०० मध्ये सर्वत्र पसरली होती आणि ज्ञानदेव-नामदेवांपूर्वी भक्तराज पुंडलिक १००० वर्षांपूर्वी होऊन गेले. तेव्हापासून विठ्ठल आपल्या भक्तांना भेटण्यासाठी वीटेवर अभा आहे.  

आषाढीला श्रीहरीच्या दर्शनार्थ आलेले वारकरी तासनतास उभे राहून हळूहळू पुढे सरकतात. महाद्वारात आले की, नामदेवाची पायरी लागते. तिला वंदन करुन नामदेवाला वंदन करुन महाद्वारातून गरुड स्तंभाकडे चालू लागतात. याच गरुडस्तंभाचा आश्रय घेऊन तुकाराम महाराजांनी अभंगातून श्रीविठ्ठलाचेस्तुतीस्रोत गायले आहे. 

‘कर कटावरी तुळशीच्या माळा| ऐसे रुप डोळा दावी हरी| 

ठेविले चरण दोन्ही विटेवरी, एसे रुप हरी दावी डोळा| 

कटी पितांबर कास मिरवली, दासवी वाहिली ऐसी मूर्ती॥ 

गरुड पारावरी उभा राहिलासी, आठवे मानसी तेचि रुप॥

 झुरोनी पांजरा होऊ आहे आता| येई पंढरीनाथा भेटावया|

 तुका म्हणे माझी पुरवावी आस| विनंती उदास करु नये॥’

गरुडपार म्हणजे गरुड खांब. याचे उल्लेख वारकरी संत वारंवार करतात. पूर्वी याच स्थळावरुन किर्तनास प्रारंभ होत असे. गरुड हा विठ्ठलाचा- विष्णूचा वाहक आहे. गरुड खांबाजवळून पुढे गेले की ज्याच्या दर्शनासाठी भक्त आसुसलेले असतात ते परब्रह्म श्री विठ्ठलरुपाने साकार होऊन भक्तांना भेट देण्यासाठी उभे राहिलेले दिसून येते. 

‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवूनिया| 

तुळसीहार गळा कासे पितांबर| आवडे निरंतर हेचि ध्यान| 

मकर कुंडिले तळपती श्रवणी| कंठी कौस्तुभ मणि विराजित| 

तुका म्हणे माझे हेचि सर्वसुख| पाहीन श्रीमुख आवडीने|’ 

या रुपातील श्रीहरीचे दर्शन होताच सर्व वारकरी एकमुखाने घोषणा करु लागतात. ‘श्री पुंडलिक वरदा हरी विठ्ठल| जय जय हरी विठ्ठल|’ असा घोष समस्त वारकरी संप्रदायाचा गाभा आहे. एवढेच नव्हे तर वारकरी संप्रदायाचे पूर्ण रुप आहे. श्री हरी हा विठ्ठल आहे व तो पुंडलिकाला वर देणारा आहे. श्रीहरी हा परमात्मा कृष्ण आहे. तो विष्णू आहे. श्रीकृष्ण ‘तच्च संमृत्य संमृत्य रुपम् अव्यद्भूतम हरेः’ असा श्रीकृष्णाचा उल्लेख गोपी करतात. हरी हे श्रीकृष्णाचेच नाव आहे व ही दोन्ही नावे विष्णुचीच आहेत. 

भक्तराज पुंडलिकाच्या भेटीसाठी साक्षात परब्रह्म विठ्ठल रुपाने भीमातीरावर पंढरपुरी प्रकट झाले त्यावेळी श्रीविठ्ठलाची शोभा दिव्य होती. समवेत रुख्मिणी देवी व राधा होत्या. प्रगट झालेले भगवंत वीटेवर उभे होते. दोन्ही हात कंबरेवर ठेवले होते. समचरण होते व दृष्टी नासाग्रावर होती. भगवान विठ्ठल हे श्रीकांत होते. त्यांचे नेत्र कमलाप्रमाणे सुंदर होते. वर्ण मेघाप्रमाणे नील होता. त्यांचे स्तवन देव आपल्या मधुरवाणीने करत होते. तसेच सर्व भक्त अष्टसात्विक भाव जागृत झाल्याने पुलकित होऊन श्री विठ्ठलाच्या संकिर्तनात मग्न झाले होते. तर सर्व श्रुती त्याच्या अखंड स्तवनात तन्मय झाल्या असतानाच सर्वसिद्ध पुढे सरसावले व तेही त्यात सामील झाले. तेव्हा ब्रह्मसाक्षात्कारी ज्ञानी मागे कसे राहतील? तेही मोठ्या संतोषाने भगवंताचे श्रीविठ्ठलाचे स्तुतीस्तोत्र गाऊ लागले. असा हा भक्तजनप्रिय श्रीविठ्ठल आहे. जेथे भक्त असतात तेथे श्रीविठ्ठल असतो. तो भक्तांच्या मागोमाग जाणारा देव आहे. परब्रह्म हे एक नाणे आहे. त्याची एक बाजू भक्तजन आहे तर दुसरी बाजू श्रीविठ्ठल आहे. पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या नामघोषात भक्त देहभान विसरतात आणि आनंदाने नाचू लागतात. जेथे जेथे भक्त असतात तेथे तेथे त्यांच्या संगती विठ्ठल राहतो. भक्तांची सोबत हे विठ्ठलाचे सुख आहे, तर देवाचे दर्शन हा भक्तांचा संतोष आहे. म्हणूनच  वारकरी पंढरपूरची वारी करतात. ही वारी हरिदिनी म्हणजे एकादशीला असते. 


प्रा. म. रा. जोशी, संत वाङ्मय संशोधक