प्रेमाची भाषा

कधी तरी तिला तिच्या कामात थोडी मदत केली की त्याचे प्रेम दिसून येते. हे बोलून दाखवायची गरज नसते. प्रेमाची भाषा ही कमी बोलणारी असली तरी जास्त परिणामकारक असते.

Story: मनातलं |
13th July, 12:34 am
प्रेमाची भाषा

कधीकधी आपल्याला कुणाला काहीतरी सांगायचं असतं पण ते आपण शब्दात नाही सांगू शकत. बळे बळे शब्दात बसवायचा प्रयत्न केला तरीही त्यात तेवढी ताकद येत नाही. आपल्या मनातल्या भावना मनातच थिजून जातात. “प्रेम तुझ्यावर करते मी रे, सांगितल्यावीण ओळख तू रे” अशी मनाची अपेक्षा असते. पण दरवेळीच अशी अपेक्षा दुसऱ्याकडून ठेवणं बरोबर नाही. त्यात तुम्हाला  काहीतरी खाणाखुणा, काही इशारे, नयनांचे बाण याचीही मदत घ्यावी लागते. प्रत्येकाची प्रेम व्यक्त करायची पद्धत वेगळी असते. कधीकधी काही गोष्टी कृतीतून व्यक्त केल्या की प्रेमाची भाषा लवकर समजते समोरच्याला. आपल्या मनातल्या भावना नीट पद्धतीने व्यक्त करता आल्या पाहिजेत. आपल्याकडे परदेशासारखी पद्धत नाही उठ सूट की आलिंगन देत, गळाभेट घेत, ‘आय लव्ह यू’ म्हणायचं. कीस द्यायचं किंवा हग द्यायचं आणि आपलं प्रेम व्यक्त करायचं. ती त्यांची बॉडी लँग्वेज हीच त्यांची प्रेमाची लँग्वेज असते. आजकालच्या पिढीला त्यात काही गैर वाटत नाही. पण मनात प्रेम असलं तरी ते बोलून दाखवलं नाही तर कधी कधी “मेरी बात रही मेरे मनमे,  कुछ कह ना सकी उलजन मे.” अशी स्थिति होते. प्रेम व्यक्त करायचं राहूनच जातं. आवडत्या व्यक्तिपर्यंत ते पोहचतच नाही. प्रेम आणि आदर हे बोलता येत नाही ते कृतीतून दाखवावं लागतं. नवीन पिढी त्या बाबतीत पुढारलेली आहे ती पटकन सांगून टाकते ‘आय लव्ह यू’ म्हणत. नुसतं प्रेम आहे सांगून चालत नाही, तर ते दाखवूनही द्यायचं असतं. त्यासाठी एकमेकांच्या सहवासात राहणं गरजेचं असतं. एकमेकांसाठी वेळ दिला पाहिजे, कुठे तरी कॉफी शॉपला बागेत, फिरायला लोंग ड्राइव्हला जाणं यामुळे एकमेकांच्या जवळ यायला सवड मिळते, बोलणं होतं. मनातल्या भावना सांगायची संधी मिळते. मनमोकळेपणे गप्पा मारल्या की समोरच्या व्यक्तीला जाणून घ्यायची संधी मिळते. तिला काय आवडतं, काय आवडत नाही याचा अंदाज येतो. त्याचं तिने किंवा त्याने तिचं कौतुक करणं म्हणजे एकमेकांच्या आवडीची पावती देणं असतं, तू आज खूप छान दिसतेस किंवा तिने आज तू घातलेला शर्ट तुला खूप छान दिसतोय म्हटलं की त्याला बरं वाटतं. कौतुक करताना ही अतिशयोक्ति टाळली पाहिजे नाहीतर ते खोटं खोटं वाटू शकतं. आजकाल दोघांमध्ये जे काही बोलणं, संभाषण होतं ते मोबाईल मधूनच होत असतं. इथे पण कितीही बिझी असलं तरी त्याने तिचा फोन उचलला तिच्याशी बोलला की तिला बरं वाटतं किंवा तिने ही त्याचा फोन आधी उचलला पाहिजे तर तिच्या मनात आपल्या विषयी किती प्रेम आहे, काळजी आहे हे दिसून येतं.  जणू ती आपल्या फोनची वाटच पाहत होती हे बघून त्याला बरं वाटतं. कधीकधी अशा छोट्या-छोट्या गोष्टीतून आपलं प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळते. त्याला हवा त्या रंगाचा शर्ट त्याला गिफ्ट दिला किंवा त्याच्या आवडीच्या रंगाची साडी नेसून त्याला भेटायला गेली. आपल्या जोडीदाराला खूश ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहिलं तर त्याच्याही लक्षात येतं प्रेम. जेव्हा गरज असेल तेव्हा हात हातात घेऊन दिलेला सपोर्ट खूप महत्त्वाचा ठरतो त्यातून प्रेमच व्यक्त होत असतं. मग ते शब्दात नाही सांगितलं तरी चालतं. संकटाच्या वेळी पाठीवर ठेवलेला आधाराचा हात बरंच काही सांगून जातो. मी आहे तुझ्यासोबत असा धीर मिळतो. या स्पर्शात प्रेमभावना लपलेली असते. 

आजकालची तरुणाई सगळ्या गोष्टी फास्ट करू पाहते. आज आय लव्ह यू म्हणत प्रेम व्यक्त केलं उद्या कदाचित नाही जुळलं तर लगेच  वेगळंही होतात. कधीकधी त्यांच्या दृष्टीने प्रेम म्हणजे शारीरिक आकर्षण पण असू शकतं. त्यांची प्रेम भाषा शारीरिक असेल तर ती स्पर्श, चुंबन, आलिंगन अशा शारीरिक पातळीवरची असू शकते. पण कधी कधी शारीरिक स्पर्श हा आश्वासक असतो. हातांचा नाजूक स्पर्श हा जवळीक निर्माण करणारा असतो. जिथे शारीरिक स्पर्श ही प्रेमाची भाषा असते तिथे संमतीला खूप महत्त्व असते. संमतीने केलेला स्पर्श एकमेकांचा आदर वाढवतो. प्रेमाची प्रत्येक अभिव्यक्ति ही नातेसंबंधला बळकटी आणणारी असली पाहिजे. त्यातून त्रास होणार असेल तर ते गैर ठरते. केला जाणारा स्पर्श कोणत्या भावनेने केला जातोय हे लक्षात येतं.  

  प्रेम या भावनेचे अनेक पैलू आहेत आणि प्रेमाची भाषा त्या त्या प्रमाणे ठरत असते. माणसाची प्रेमाची भावना प्राण्यांनापण कळते. कोण आपल्यावर प्रेम करते हे त्यांना उमजत असते. आणि त्याप्रमाणे ते जवळ येऊन चाटतात, शेपटी हलवतात, अंगावर उड्या मारतात, अंग घासतात, आपली वाट बघतात न बोलता बरच काही त्यांच्या कृतीतून ते दाखवून देत असतात. आपल्याशी प्रेमाने कोण वागतं हे त्यांना बरोबर समजतं. आपल्या कृतीतून ते दाखवून देतात. आजीची,  आईची माया मुलं तिच्या  स्पर्श भावनेतून ओळखतात. तिने केलेले कौतुक, दिलेलं प्रोत्साहन ही त्याच्या दृष्टीने अनमोल अशी प्रेम भाषा असते. कामावरून वैतागलेला नवरा घरी आल्यावर त्याचं हसत मुखाने केलेलं स्वागत या कृतीने त्याचा मूड ती चांगला करू शकते. त्याचा किंवा तिचा वाढदिवस आठवणीत ठेवून छोटसं का होईना आणलेलं गिफ्ट प्रेमाची ग्वाही देणारं ठरतं. कधीतरी तिला खूश करायला आणलेली चाफ्याची फुले बरंच काही सांगून जातात. तर त्याच्या आवडीचे बटाटे वडे करून गरम गरम सर्व्ह केले की, त्याच्या तोंडातून स्तुति सुमानांचा वर्षाव होतो हे तिने आपल्यावरच्या प्रेमापोटी केले ही त्याला खात्री असते. तिची तब्येत बरी नसेल तर सुट्टी घेऊन तिला डॉक्टरकडे घेऊन गेला तर नवऱ्यावरचे प्रेम अधिकच वृद्धिंगत होते. कधी तरी तिला तिच्या  कामात थोडी मदत केली की त्याचे प्रेम दिसून येते. हे बोलून दाखवायची गरज नसते. प्रेमाची भाषा ही कमी बोलणारी असली तरी जास्त परिणामकारक असते. घर म्हटलं की वादावादी भांडाभांडी होणारच तेव्हा एकमेकांना समजून घेत केलेला समझौता म्हणजे प्रेमाची खरी परीक्षा असते. त्यात पास झाले की, प्रेमाच्या भाषेत पैकीच्या पैकी मार्क्स मिळालेच म्हणून समजा. 


प्रतिभा कारंजकर, फोंडा.