खराब हवामानामुळे दोहा-गोवा विमान बंगळुरुत उतरवले

‘एटीसी’ने परिस्थिती पाहून घेतला निर्णय ; प्रवाशांत नाराजी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10th July, 12:27 am
खराब हवामानामुळे दोहा-गोवा विमान बंगळुरुत उतरवले

पणजी : दोहा येथून मोपा विमानतळावर येत असलेले विमान गोव्यातील खराब हवामानामुळे सोमवारी रात्री बंगळुरू येथे उतरवण्यात आले. एअर ट्रॅफिक कंट्रोलने (एटीसी) घेतलेल्या निर्णयानुसार हे विमान बंगळुरुत उतरवण्यात आले, अशी माहिती मोपा विमानतळावरील सूत्रांनी दिली.
गेल्या चार-पाच दिवसांपासून राज्यात पावसाची संततधार कायम आहे. रविवार आणि सोमवार असे दोन दिवस मुसळधार पावसाने राज्याला झोपडून काढले. त्यामुळे राज्यातील वातावरण खराब झाले आहे. त्याचा फटका राज्यातील विमानसेवेला बसण्यास सुरुवात झाली आहे. दोहाहून गोव्याला येणाऱ्या प्रवाशी विमानालाही सोमवारी रात्री या खराब हवामानाचा फटका बसला. गोव्यात येण्यापूर्वी ‘एटीसी’ने दाबोळी, सिंधुदुर्गमधील चिपी तसेच कोल्हापूर येथील विमानतळांचीही विमान उतरवण्यासाठी चाचपणी केलेली होती. परंतु, गोव्याप्रमाणेच सिंधुदुर्ग आणि कोल्हापुरातील वातावरणही खराब असल्याचे लक्षात घेऊन ‘एटीसी’ आणि पायलटनी हे विमान बंगळुरुत उतरवण्याचा निर्णय घेतला. विमान बंगळुरुत उतरवण्याच्या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये नाराजी पसरली. पण, सत्यस्थिती समजल्यानंतर त्यांच्यातील नाराजी दूर झाल्याचेही सूत्रांनी सांगितले.
मुसळधार पावसामुळे मुंबई, दिल्ली येथे येणारी विमाने हवामानाचा अंदाज घेऊन इतर ठिकाणी वळवण्यात येत आहेत. गोव्यात मात्र यंदाच्या मान्सून हंगामात प्रथमच दोहा-गोवा विमान वळवण्यात आले. दाबोळीवर ये-जा करणारे एकही विमान आतापर्यंत वळवण्यात आलेले नाही, असेही सूत्रांनी नमूद केले.