न्यायालयाने दिलासा द्यावा, मी चौकशीला तयार

पूजा शर्मा यांची विनंती : आसगाव प्रकरण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
07th July, 12:10 am
न्यायालयाने दिलासा द्यावा, मी चौकशीला तयार

म्हापसा : आसगाव येथील घर पाडण्याचे प्रकरण हे राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे. या प्रकरणाशी माझा काहीच संबंध नाही. मी घटनास्थळी नसताना मला या गुन्ह्यात नाहक गुंतवले आहे. मी पोलीस चौकशीला सहकार्य करण्यास तयार असून न्यायालयाने मला अंतरीम दिलासा द्यावा, अशी विनंती पूजा शर्मा यांच्यावतीने ज्येष्ठ वकिल अॅड. सुरेंद्र देसाई यांनी न्यायालयाकडे केली.

शनिवार, दि. ६ रोजी पणजी येथील उत्तर गोवा प्रधान व सत्र न्यायाधीश ईर्शाद आगा यांच्यासमोर पूजा शर्मा यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी झाली. अॅड. सुरेंद्र देसाई यांनी न्यायालयात युक्तीवाद करताना, हे एकंदरीत राजकीय प्रेरित प्रकरण असल्याचा दावा केला. आमदार डिलायला लोबो, आमदार मायकल लोबो व मुख्यमंत्री हे घटनास्थळी कधी गेलेत याचा पुराव्यानिशी तपशील त्यांनी न्यायालयासमोर ठेवला. पोलिसांच्या नोटीसीला मी उत्तर दिले आहे, त्यादिवशी मी हजर राहू शकत नसल्याचे कळविले होते. कारण माझा प्रवास मुंबईच्या बाहेर अमृतसर आणि हिमाचल प्रदेशात होता. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात हजर राहण्याची दुसरी तारीख देण्याची विनंती पोलीस अधिकाऱ्यांकडे केलेली आहे, असे आपल्या अशिलाच्यावतीने अॅड. देसाई यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

मी ही मालमत्ता ख्वाजा यांच्याकडून खरेदी केलेली आहे. या मालमत्तेमध्ये आगरवाडेकर कुटुंबीयांनी अतिक्रमण केलेले आहे. हे घर जमीनदोस्त करण्याच्या प्रकारात आपला कोणताही सहभाग नाही. हा दिवाणी स्वरूपाचा खटला असून आपल्याला त्यात नाहक गुंतवले जात आहे.

आगरवाडेकर कुटुंब हे शापोरामध्ये राहत असून त्यांनी विदेशी नागरिकाकडे पॉवर ऑफ अॅथोरीटी केल्याचे समजते. याचाच अर्थ आगरवाडेकर कुटुंबीय हे तिथे बेकायदेशीररीत्या राहत होते. पण मालमत्ता खरेदी केल्यामुळे त्यांना जमिनीतून बाहेर काढण्याचा आपल्या अशिलाला कायदेशीर अधिकार आहेत.

पोलिसांच्या दाव्यानुसार, वरील घटनेचा मुख्य सूत्रधार अर्शद ख्वाजा हा असून घटनेच्यावेळी तो तिथे उपस्थित होता. पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली आहे, ही गोष्ट युक्तीवादावेळी अॅड. देसाई यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.

केस डायरी सादर करण्याचे निर्देश

या अटकपूर्व जामीन अर्जावरील दोन्ही बाजूच्या युक्तीवादानंतर न्यायाधीशांनी गुन्ह्याशी संदर्भात केस डायरी सादर करण्याचा निर्देश पोलिसांना दिले आहेत. तसेच पुढील सुनावणी सोमवारी ८ रोजी निश्चित केली. 

हेही वाचा