मुंबई :येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल रेल्वे स्थानकाच्या आवारात २९ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २२ सप्टेंबरच्या रात्री दोन अज्ञात लोकांनी पीडितेला जबरदस्तीने एका टॅक्सी स्टँडजवळ नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी पीडित महिलेने रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली आहे.
घटना घडली त्या रात्री, पीडित महिला सीएसएमटी स्थानकाबाहेर एकटीच उभी होती. तेथे दोन अनोळखी व्यक्ती आल्या. त्यातील एकाने महिलेचे तोंड दाबून ठेवले. सीएसएमटी स्थानकाबाहेरील टॅक्सी स्टँडच्या मागे दोघांनी तिला धमकावून तिच्यावर एक एक करून बलात्कार केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी प्रथम सीएसएमटी लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेच प्रकरण आता पुढील तपासासाठी मुंबई पोलिसांच्या माता रमाबाई मार्ग पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे.
त्याचवेळी पुण्यात २१ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत फिरायला गेली होती. रात्री उशिरा तीघांनी त्यांना निर्जनस्थळी पकडून मुलीवर सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी पीडितेच्या मित्रालाही मारहाण केली. पोलिसांनी गुन्हा दाखल तिघांना ताब्यात घेतले आहे.