मडगावातील दिवसभराच्या आंदोलनाला अल्पविराम
मडगाव : येथे शनिवारी दिवसभर सुरू असलेल्या आंदोलनामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. रस्ते बंद करण्यात आले होते व पोलिसांच्या म्हणण्यालाही आंदोलकांनी जुमानले नाही. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पोलीस फौजफाटा तैनात केल्यानंतर आंदोलकांनी माघार घेतली. मात्र, वेलिंगकरांना अटक न झाल्यास रविवारी सकाळी पुन्हा एकत्र येण्याचा इशाराही दिला.
सुभाष वेलिंगकर यांनी सेंट फ्रान्सिस झेविअर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळपासून आंदोलनाला सुरुवात झाली. पोलिसांनी केवळ तक्रार घेत गुन्हा नोंद न केल्याने नागरिकांनी मडगावातील रस्ते अडवले. नागरिकांच्या आंदोलनानंतर डिचोली पोलिसांनी वेलिंगकर यांच्यावर गुन्हा नोंद केला होता. त्यानंतरही त्यांच्या अटकेसाठी रात्री एक वाजेपर्यंत रस्त्यावर आंदोलक बसून होते.
सायंकाळीही आंदोलकांनी सुभाष वेलिंगकर यांना अटक न केल्यास दक्षिण गोवा बंद करण्याची तसेच जुवारी पुलावर रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता. मडगावातील आंदोलनकर्त्यांनी पोलिसांच्या सांगण्यावरुनही माघार न घेतल्याने पोलिसांनी ओल्ड मार्केट सर्कलनजीक मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. त्यावेळीही आंदोलकांना माघारी जाण्याचे आवाहन पोलिसांनी केले.
रात्री ९ वा.च्या सुमारास आंदोलक प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या, आतापर्यंत सर्वांनी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानेच गुन्हा नोंद झाला आहे. वेलिंगकर यांना न्यायालयाकडून अंतरिम दिलासा मिळालेला नाही. पोलिसांकडून त्यांना अटक करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले आहे. त्याशिवाय एखादी अनुचित घटना घडल्यास या शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला गालबोट लागू शकते, त्यामुळे सध्या आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानुसार उपस्थित नागरिकांनी आंदोलन मागे घेत माघारी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, रविवारी सकाळपर्यंत सुभाष वेलिंगकर यांना अटक न झाल्यास सकाळी साडेदहा वाजता ओल्ड मार्केट परिसरात एकत्र येण्याचे आवाहनही आंदोलकांना करण्यात आले आहे.
वेलिंगकरांच्या अटकेसाठी रास्ता रोको
शनिवारी सकाळी पुन्हा मडगाव पोलीस ठाण्यावर आलेल्या आंदोलकांनी वेलिंगकरांच्या अटकेसाठी रास्ता रोकोचा मार्ग अवलंबला. त्यांनी ओल्ड मार्केट सर्कलनजीक जात त्याठिकाणी चौकातील चारही बाजूला जाणारे रस्ते अडवले. दुपारपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार्या रस्त्यावरील वाहतूक बंद केली. याचा नागरिक, विद्यार्थी, प्रवासी व पर्यटकांनाही मोठा त्रास झाला.
आंदोलकांवर लाठीचार्ज, काहीजणांना घेतले ताब्यात
मडगावात शनिवारी सकाळपासून सुरू असलेले आंदोलन संपल्याचे घोषित करण्यात आले होते. त्यानंतरही काही आंदोलक रस्त्यावर उभे होते. पोलिसांनी जाण्यास सांगूनही ते न हटल्याने पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. फिडॉल परेरा, अॅंडू सिक्वेरा यांच्यासह सहा ते सातजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
प्रसारमाध्यमांनाही पोलिसांची दमदाटी
पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला त्यावेळी त्यांचे छायाचित्रण करणार्या एका व्हिडिओग्राफरला अडवून पोलिसांनी फुटेज डिलीट करायला लावले. त्याठिकाणी असलेल्या छायाचित्रकार संतोष मिरजकर यांनाही मीडिया असलात तर काय झाले? अशी विचारणा करत मारहाण करण्यात आली.