जुने गोवा येथे कमी वजनाचे १८ एलपीजी सिलिंडर जप्त

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
22 hours ago
जुने गोवा येथे कमी वजनाचे १८ एलपीजी सिलिंडर जप्त

पणजी : वजन व माप खात्याने जुने गोवा येथील परिसरात शुक्रवार दि. ४ रोजी पहाटे छापा टाकून तीन ट्रकांची झडती घेतली. त्यावेळी पथकाने एचपीसीएल कंपनीचे कमी वजन असलेले १८ घरगुती गॅस सिलिंडर जप्त केले.

वजन व माप खात्याने दिलेल्या माहितीनुसार, जुने गोवा परिसरात एका ठिकाणी घरगुती गॅस सिलिंडर साठवत असल्याची माहिती खात्याला गुप्तहेरांकडून प्राप्त झाली होती. त्यानुसार, खात्याचे नियंत्रक अरुण पंचवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सेंट्रल गोवा सहाय्यक नियंत्रक देमू मापारी, दक्षिण गोवा सहाय्यक नियंत्रक नितीन पुरुषन, उत्तर गोवा सहाय्यक नियंत्रक गुलाम गुलबर्ग यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक विकास खांडोळकर, भुपेंद्र देसाई, एझोन राॅड्रिग्ज, रजत कारापूरकर आणि इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने शुक्रवारी पहाटे ६ वा. जुने गोवा येथे छापा टाकला. त्यावेळी पथकाने तिथे पार्क केलेल्या एचपीसीएल कंपनीचे घरगुती गॅस असलेल्या तीन ट्रकांची झडती घेतली. त्यावेळी पथकाला १८ घरगुती गॅस सिलिंडर कमी वजनाचे असल्याचे समोर आले. त्यातील एक गॅस सिलिंडर १.४ किलो कमी वजनाचा असल्याचे आढळून आहे. त्यानंतर पथकाने ते जप्त करून कारवाई केली.

दरम्यान, खात्याने अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी ग्राहकांना सूचना करून सतर्क राहण्यास सांगितले आहे. त्यासाठी घरगुती गॅस सिलिंडरची घरपोच डिलिव्हरी घेण्यापूर्वी, वाहनात असलेल्या वजन आणि माप खात्याने पडताळणी केलेल्या वजन काट्यावर घरगुती गॅस सिलिंडरचे वजन तपासण्यास सांगितले आहे. यात कोणतीही तफावत आढळल्यास, ९४०३३०१९७७ या क्रमांकावर तक्रार नोंदवण्याची सूचना केली आहे. 

हेही वाचा