पिसुर्ले येथील रवळनाथ देवस्थानच्या नित्यपूजेला दिरंगाईमुळे तणाव

मामलेदारांच्या मध्यस्थीने निवळला वाद : नवरात्रोत्सवात होणार पूजाअर्चा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd October, 11:54 pm
पिसुर्ले येथील रवळनाथ देवस्थानच्या नित्यपूजेला दिरंगाईमुळे तणाव

वाळपई : पिसुर्ले येथे रवळनाथ देवस्थानच्या नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी पूजा करण्यासाठी फुलांची माळ देण्यासाठी कार्यकारी समितीने दिरंगाई केल्यामुळे दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. सत्तरी तालुक्याच्या मामलेदारांनी मध्यस्थी केल्यानंतर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पूजा करण्यात आली. दरम्यान, दोन्ही गटांच्या इतर विषयांवर लवकरच संयुक्त बैठक घेण्याचे मामलेदारांनी ठरविले आहे.

रवळनाथ देवस्थानच्या कार्यकारी समितीचा ताबा एका गटाकडे आहे. समितीने नवरात्र उत्सवामध्ये दर दिवशी फुले देण्याची परंपरा आहे. त्यानंतर देवस्थानचा पुजारी नऊ दिवस रवळनाथाची पूजा करीत असतो. मात्र, नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी समितीने फुलांची माळ देण्यासाठी दिरंगाई केली. दुपारी बारा वाजेपर्यंत पूजा करणे गरजेचे होते. मात्र, १२ वाजेपर्यंत फुलांची माळ पुजाऱ्यांच्या ताब्यात न आल्यामुळे वादाला तोंड फुटले.

रवळनाथ देवस्थानचे पुजारी हनुमंत परब यांनी सत्तरी तालुक्याचे मामलेदार धीरेंद्र बाणावलीकर, उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर यांच्याशी फोनवरून संपर्क साधत माहिती दिली. फुलांची माळ समितीकडून येत नाही तोपर्यंत रवळनाथ देवस्थानची पूजाअर्चा पूर्ण होणे नसल्याचे स्पष्ट केले. मामलेदारांनी याची दखल घेऊन संबंधित तलाठ्याला घटनास्थळी पाठवून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अयशस्वी ठरला.

मामलेदारांनी कार्यकारी समिती व दुसऱ्या गटाची दुपारी चार वाजता बैठक वाळपई येथील आपल्या कार्यालयात बोलाविली. मात्र, एका गटाने बैठकीमध्ये सहभागी होण्यास नकार दिला. दुपारी चार वाजेपर्यंत रवळनाथ देवस्थानची पूजा न झाल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. यावर नियंत्रण राखण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले होते. शेवटी ४ वा. मामलेदार धीरेंद्र बाणावलीकर यांनी घटनास्थळी भेट देऊन दोन्ही गटांशी चर्चा केली.

समितीने ताबडतोब फुलांची माळ पूजाऱ्याकडे द्यावी, अशी विनंती मामलेदार देवेंद्र बारामतीकर यांनी केली. त्याचप्रमाणे हनुमंत परब व त्यांच्या गटाशी त्यांनी चर्चा केली. शेवटी कार्यकारी समितीने फुलांची माळ देण्यास तयारी दर्शविली. समितीच्या एका पदाधिकाऱ्याने फुलांची माळ दिल्यावर रवळनाथ देवस्थानची पूजाअर्चा पार पडली. या वादामुळे संध्याकाळी पाच वाजता धार्मिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

नऊ दिवस उत्सव शांततेने होणार : मामलेदार

दोन्ही गटांची समजूत काढण्यात आलेली आहे. यामुळे पुढील नऊ दिवस कोणत्याही प्रकारची अडचण व समस्या निर्माण होणार नाही. आजच्या प्रक्रियेप्रमाणेच पुढील आठ दिवस फुलांची माळ देवस्थानच्या पुजाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे, असे मामलेदार धीरेंद्र बाणावलीकर यांनी सांगितले.

हेही वाचा