आश्वे मांद्रे येथील श्री भूमिका मंदिराला दोन गटांतील वादातून अज्ञाताने ठोकले टाळे

नवरात्रीतील विधी पुरोहिताच्या मार्गदर्शनाखाली करण्याची उपजिल्हाधिकाऱ्यांची सूचना

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd October, 11:46 pm
आश्वे मांद्रे येथील श्री भूमिका मंदिराला दोन गटांतील वादातून अज्ञाताने ठोकले टाळे

पेडणे : आश्वे मांद्रे येथील श्री भूमिका मंदिराला नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला अज्ञात नागरिकांनी गर्भकुडीला टाळे ठोकल्यामुळे या मंदिरामधील दोन गटांमध्ये वाद निर्माण झाले. टाळे कोणी ठोकले? याचा शोध पोलीस, पेडणे मामलेदार, पेडणे उपजिल्हाधिकारी घेत आहेत. यावेळी नवरात्रीतील विधी अन्य पुरोहिताच्या मार्गदर्शनाखाली करण्याची उपजिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केली.

नवरात्र उत्सवाच्या पूर्वसंध्येला एका गटाने श्री देवी भूमिका मंदिराला टाळे ठोकल्यामुळे वाद निर्माण झाला होता. एक गट पाच मानकरी यांचा तर दुसरा गट इतर महाजन आहेत त्यांचा अाहे. महाजन यांच्या बाजूने एक पुरोहित देव कार्य करत असतो. परंतु मानकरी स्वतः कार्य करत असतात.

या घटनेची माहिती श्री सप्तेश्वर भगवती पंचायतन देवस्थान याने मांद्रे पोलिसांना दिली, असता मांद्रे पोलीस निरीक्षक घटनास्थळी आले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. यावेळी दोन्ही गटांमध्ये वाद सुरू होता. परंतु पेडणे उपजिल्हाधिकारी यांनी दोन्ही गटाला सूचना केल्या. नवरात्रीचे नऊ दिवसही मंदिरात कार्यक्रम तिसऱ्याच पुरोहितामार्फत साजरे केले जाणार आहे. तोपर्यंत दोन्ही गटाने यात हस्तक्षेप करून अडथळे आणण्याचा प्रयत्न करू नये, अशी सूचना पेडणे उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

दोन गटांमध्ये असणारा वाद दि. ४ रोजी पेडणे उपजिल्हाधिकारी कार्यालयात दोन्ही गटांना आमंत्रित करून सोडविला जाईल, अशी ग्वाही पेडणे उपजिल्हाधिकारी शिवप्रसाद नाईक यांनी देवस्थान परिसरात दोन्ही गटांमध्ये समझोता घडवण्याचे काम करत असताना दिली.

मंदिरात महिलेचा झाला होता विनयभंग

याच मंदिरात मागच्या महिन्यात एका महिलेचा विनयभंग करण्याची घटना घडली होती. त्या महिलेने मांद्रे पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी या संदर्भात चौकशी करून पाच जणांवर गुन्हे नोंदवले होते. या मंदिरामध्ये वेगवेगळ्या कारणाने वाद होत असल्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. 

हेही वाचा