कुंकळ्ळी प्रकरणात मडगाव महिला पोलिसांनी नव्याने नोंदवले जबाब

सीसीटीव्ही फुटेजही घेतले ताब्यात : आयजीपी बिश्नोई यांच्याकडून पालकांची भेट

Story: प्रतिनिधी गोवन वार्ता |
04th October, 12:02 am
कुंकळ्ळी प्रकरणात मडगाव महिला पोलिसांनी नव्याने नोंदवले जबाब

मडगाव : वेरोडा कुंकळ्ळीतील सेंट अँथनी शाळेतील तिसरीच्या मुलीच्या बिघडलेल्या तब्बेतीकडे शाळा व्यवस्थापन व शिक्षकांचे दुर्लक्ष झाले का याची शहानिशा केली जात आहे. त्यासाठी मडगाव महिला पोलीस ठाण्याकडून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले. सर्वांचे जबाबही नव्याने नोंदवण्यात आलेले आहेत. आयजीपी ओमवीरसिंग बिश्नोई यांनी शाळा व्यवस्थापन व पालकांची भेट घेत योग्यरितीने तपास करण्याचे आश्वासन दिले.

सेंट अँथनी शाळेतील तिसरीमध्ये शिकणार्‍या मुलीला शाळेतच मुलांमधील बाचाबाचीत दुखापत झाली. वर्गशिक्षिका व शाळा व्यवस्थापनाने वेळेत उपचारासाठी नेले नाही, गाडी उपलब्ध करुन दिली नाही, असा दावा पालकांनी करत शिक्षिका लझिमा फर्नांडिस व शाळा व्यवस्थापनाविरोधात तक्रार २६ सप्टेंबर रोजी केली होती. या प्रकरणी पोलिसांनी योग्य तपास न करत गुन्हा नोंद न केल्याने बुधवारी कुंकळ्ळीवासीयांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. काहीकाळ रास्तारोको केला. पोलिसांनी गुन्हा नोंद केल्याचे सांगत समजावण्याचा प्रयत्न केला. शिक्षकांना शोधण्यासाठी गेलेल्या पोलिसांना ते सापडले नाहीत. याप्रकरणी स्वेच्छा दखल घेत शिक्षण खात्याने शाळा व्यवस्थापनाकडून घटनेचा अहवाल मागवला होता. आता त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सीसीटीव्ही फुटेजची पुन्हा होणार तपासणी

दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक सुनीता सावंत यांनी सांगितले की, पालकांच्या तक्रारीनुसार गुन्हा नोंद केला जात आहे. कुंकळ्ळी पोलिसांकडून योग्य तपास होत नसल्याची तक्रार असल्याने तपासकाम मडगाव महिला पोलिसांकडे दिले आहे. सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत पुन्हा तपासणी करुन शहानिशा केली जाईल. तसेच संबंधितांचे जबाब पुन्हा नोंदवून घेतलेले आहेत.

पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई

मोर्चावेळी शाळेकडून निष्काळजीपणा झाल्याप्रकरणात कुंकळ्ळी पोलिसांनी योग्यप्रकारे तपास केलेला नसल्याची तक्रार पोलीस अधीक्षक सावंत यांच्याकडे करण्यात आली. याप्रकरणात पोलीस उपनिरीक्षक कविता रावत संवेदनशील नसल्याची तक्रार झाली होती, त्यानुसार रावत यांची कुंकळ्ळी पोलीस ठाण्यातून राखीव दलात बदली करण्यात आली आहे, अशी माहिती अधीक्षक सावंत यांनी दिली.

पोलीस महानिरीक्षकांकडून चौकशी

कुंकळ्ळीतील मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलेल्या आश्वासनानुसार पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिश्नोई यांनी सेंट अँथनी शाळेला भेट दिली. त्याठिकाणी नागरिकही जमा झाले होते. जखमी मुलीच्या पालकांची बिश्नोई यांनी विचारपूस केली. तसेच शाळा व्यवस्थापनाचे म्हणणेही ऐकून घेतले. शाळेच्या आवारातही पोलीस तैनात करण्यात आलेले होते. 

हेही वाचा