पर्वरीः चोरी प्रकरणात दागिने कारागिरासह आणखी एकाला अटक

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
04th October, 09:56 am
पर्वरीः चोरी प्रकरणात दागिने कारागिरासह आणखी एकाला अटक

म्हापसा : पर्वरी पोलिसांनी अटक केलेल्या मास्कधारी मारीयो बाप्तिस्ता या चोराच्या टोळीतील संशयित समर पाल (रा. दवर्ली- मडगाव व मूळ पश्चिम बंगाल) या दागिन्यांच्या कारागिरासह फिलिप राटो (रा. बाणावली) या दोघांना पर्वरी पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघेही चोरीच्या मालाची विल्हेवाट लावण्यासाठी संशयित मारीयोला मदत करत होते.

पर्वरी पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या सराईत मुखवटाधारी संघटित (ऑर्गनाईज्ड) टोळीचा पर्दाफाश केला होता. याप्रकरणी मारिया उर्फ मारिओ सांताना बाप्तिस्ता उर्फ सांतान (४४, रा. ग्रॅण्ड पेडे, बाणावली) व मोहम्मद सुफियान शेखमिया (२०, रा.  कालकोंडा-मडगाव) यांना अटक करण्यात आली. 

ऐशारामात जीवन जगण्यासाठी संशयित या चोऱ्या करत होते. या टोळीचा मुख्य सूत्रधार हा संशयित मारियो बाप्तिस्ता आहे. तर संशयित मोहम्मद हा महाविद्यालयीन विद्यार्थी असून तो वाणिज्य शाखेत पहिल्या वर्षाला शिक्षण घेत आहे. पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी पत्रकार परिषदेत या कामगिरीविषयी माहिती दिली. यावेळी पोलीस निरीक्षक राहूल परब व सहकारी पथक उपस्थित होते.       

गेल्या काही महिन्यांपासून उत्तर गोव्यात विशेषत: तिसवाडी व बार्देश तालुक्यात घरफोडीचे सत्र सुरू झाले होते. लोक गाढ झोपेत असताना उत्तररात्रीच्या वेळी घराच्या खिडक्या दरवाजा फोडून हे चोरटे आत शिरत व पैसा आणि मौल्यवान ऐवज लंपास करीत होते. 

 पाडेली बनला अट्टल चोर                  

संशयित मारियो बाप्तिस्त हा व्यवसायाने पाडेली आहे. नारळ पाडण्याचा व्यवसाय करताना त्याला चोऱ्या करण्याचा छंद लागला. त्याच्याविरुद्ध २०१५-१६ या दोन वर्षांत कोलवा, मायणा कुडतरी व मडगाव पोलिसांत एकूण १४ चोरीचे गुन्हे नोंद आहेत. यातील १२ चोऱ्या त्याने एकाच वर्षी २०१५ मध्ये कोलवा मध्ये केलेल्या आहेत.      

मारियोचा शहाळे विकण्याचा व्यवसाय                  

 २०१६ मध्ये जामिनावर सुटल्यानंतर  संशयित मारियो बाप्तिस्त याने चोरी करण्याच्या आपल्या कारवायांमध्ये खंड पाडला व तो सासष्टीमध्ये शहाळे विकण्याचा व्यवसाय करू लागला. ७-८ वर्षे चोऱ्यांपासून अलिप्त राहिल्यानंतर संशयित यंदा २०२४ मध्ये पुन्हा सक्रिय झाला व त्याला घरफोडीमध्ये संशयित मोहम्मद शेखमिया या विद्यार्थ्याची साथ मिळाली.





हेही वाचा