लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार; आरोपपत्राची पोक्सो न्यायालयाकडून दखल

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th October, 12:22 am
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार; आरोपपत्राची पोक्सो न्यायालयाकडून दखल

पणजी : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी संशयित लखन कापशेकर याच्याविरोधात पणजी महिला पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्राची पणजी येथील जलदगती व पोक्सो न्यायालयाने दखल घेतली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ५ रोजी होणार आहे.

याप्रकरणी दिल्ली येथील पीडित महिलेने पणजी महिला पोलीस स्थानकात ११ जानेवारी २०२४ रोजी संशयित लखन कापशेकर याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यात संशयिताने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले. त्यानुसार, पणजी महिला पोलीस स्थानक निरीक्षक रीमा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रुपाली गोवेकर यांनी संशयित कापशेकर याच्याविरोधात भादंसंच्या कलम ४२० आणि ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल केला. याच दरम्यान संशयिताने उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन दाखल केला. तो नंतर फेटाळण्यात आल्यानंतर संशयिताने गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन दाखल केला. या प्रकरणी न्यायालयाने संशयित कापशेकर याला सशर्त अटकपूर्व मंजूर केला. त्याला अटक करण्याची आवश्यकता भासल्यास २५ हजार रुपयांची हमी व इतर अटींवर सुटका करण्याचा आदेश जारी केला. त्यानंतर महिला पोलिसांनी तपासपूर्ण करून म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात ३१६ पानी आरोपपत्र दाखल केले. त्यात १९ साक्षीदारांची साक्ष नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, लैंगिक अत्याचार प्रकरण सत्र न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत असल्यामुळे तिथे वर्ग करण्यात आले. या प्रकरणी पणजी येथील जलदगती व पोक्सो न्यायालयाने दखल घेतली असून पुढील सुनावणी ५ रोजी होणार आहे. 

हेही वाचा