बार्देश: वेलिंगकरांच्या अटकेसाठी संतप्त जमावाकडून हणजूणमध्ये रास्ता रोको

रास्ता रोका करण्यासह जमावाने रस्त्यावर जाळले टायर व इतर साहित्य

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
06th October, 12:17 am
बार्देश: वेलिंगकरांच्या अटकेसाठी संतप्त जमावाकडून हणजूणमध्ये रास्ता रोको

म्हापसा: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांची डीएनए चाचणी करण्याची मागणी करणार्‍या सुभाष वेलिंगकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे संतप्त पडसाद राज्यात उमटले आहेत. या पार्श्वभूमीवर वेलिंगकरांवर गुन्हा नोंद करून त्यांना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी ख्रिस्ती बांधवांनी हणजूण पोलीस स्थानकावर धडक दिली. 

मात्र पोलिसांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याने या संतप्त जमावाने नंतर पोलीस स्थानकासमोरील वागातोर ते हणजूण दरम्यानचा रस्ता अडविला.
'जोपर्यंत वेलिंगकरांना अटक होत नाही, तोवर रस्ता मोकळा केला जाणार नाही,' असा असा पवित्रा या आंदोलनकत्यांनी घेतला होता. तसेच आंदोलकर्त्यांनी या रस्त्यावरुन मार्गक्रमण करणार्‍यांनाही इतर रस्त्याने जाण्यास भाग पाडले. 

शिवोली मतदारसंघातील लोकांनी वेलिंगकर यांच्या अटकेसाठी शनिवारी सकाळी पोलीस स्थानकावर धडक दिली होती. पोलीस निरीक्षकांना निवेदन दिल्यानंतर पोलीस अधिकार्‍यांनी निवेदनानुसार एफआयआर नोंद करण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे संध्याकाळी पुन्हा संतप्त जमावाने पोलीस स्थानकावर मोर्चा आणला. रास्तारोका करण्यासह या जमावाने रस्त्यावर टायर व इतर साहित्य जाळले. 

हेही वाचा