सत्तरी: सुभाष वेलिंगकरांना अटक करा!

फादर रॉबर्ट फर्नांडिस: वाळपई पोलिसांना निवेदन सादर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
सत्तरी:  सुभाष वेलिंगकरांना अटक करा!

वाळपई : सुभाष वेलिंगकर यांनी जुने गोवा येथील फादर झेवियर यांच्या संदर्भात अनुद्गार काढले असून यामुळे ख्रिस्ती बांधवांच्या भावना दुखावलेल्या आहेत. यामुळे त्यांच्यावर कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी अशा प्रकारची मागणी करत सत्तरी तालुक्यातील ख्रिश्चन बांधवांनी सत्तरी तालुक्याचे पोलीस निरीक्षक विदेश शिरोडकर यांना निवेदन दिले. संध्याकाळी सुमारे १०० पेक्षा जास्त ख्रिस्ती बांधवांनी पोलीस स्थानकावर जाऊन या संदर्भात आपला तीव्र संताप व्यक्त केला. 

सध्या सुभाष वेलिंगकर यांच्या विरोधात गोव्यामध्ये संतप्त भावना उमटत आहेत. गोव्यातील अनेक भागांमधून सुभाष वेलींगकर यांच्या अटकेची मागणी करणारी निवेदने सादर करण्यात येत आहेत. अशाच प्रकारचे निवेदन आज सत्तरी तालुक्यातील ख्रिश्चन बांधवांनी वाळपई पोलीस स्थानकावर सादर करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. 

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना वाळपई चर्चे फादर रॉबर्ट फर्नांडिस म्हणाले की, गोवा शांततेसाठी प्रसिद्ध आहे. अशा अवस्थेत सुभाष वेलिंगकर यांनी ख्रिस्ती बांधवांच्या भावना दुखावणारे वक्तव्य केल्यामुळे गोव्याची शांतता बिघडू लागलेली आहे. सरकारने त्यांच्यावर अटकेची त्वरित कारवाई करावी अशा प्रकारची मागणी यावेळी फादर रॉबर्ट फर्नांडिस यांनी केली. 

सरकारने कसल्याही प्रकारचा पक्षपातीपणा करू नये. गोव्यामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन व इतर धर्मीय गुण्यागोविंदाने नांदत आहेत. अशावेळी कोणत्याही देव देवतावर व त्यांच्या धार्मिक सलोख्यावर विकृत स्वरुपाचे वक्तव्य करणे ही खरोखरच दुर्दैवाची बाब आहे. सरकारने गोवेकरांच्या आदराचा मान राखून त्यांना त्वरित अटक करावी अशा प्रकारची मागणी रॉबर्ट फर्नांडिस यांनी केली. 

यावेळी शिष्टमंडाने निरीक्षक विदेश शिरोडकर यांना निवेदन सादर करून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये निरीक्षक विदेश शिरोडकर यांनी या संदर्भाची कायदेशीर चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात विचार विनीमय करण्यात येईल असे शिष्टमंडळाला सांगितले.

सुभाष वेलींगकर यांनी गोवा मुक्ती नंतर अनेक वेळा वादग्रस्त विधाने करून जनतेच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले आहे. गोयचो साहेब अशा नावाने ओळख असलेल्यांच्या संदर्भात अपमानास्पद उद्गार काढले आहेत. जोपर्यंत त्यांच्यावर गोवा सरकार कारवाई करत नाही तोपर्यंत आंदोलन समाप्त होणार नाही. सरकारने आता गांभीर्याने विचार करून सुभाष वेलींगकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अश्ली पिन्हो यांनी केली. 

हेही वाचा