मडगाव, पणजीसह राज्यभरातील भाविक रस्त्यावर; आज अटक न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
वेलिंगकरांवर कारवाईच्या मागणीसाठी मडगाव येथे रस्त्यावर उतरलेले आंदोलक. (संतोष मिरजकर)
मडगाव/पणजी : सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी नेते सुभाष वेलिंगकर यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाल्यानंतरही शनिवारी मडगाव, पणजीसह राज्यभरातील भाविक वेलिंगकर यांच्याविरोधात आक्रमक झाले. त्यांनी तीव्र आंदोलनेही छेडली. पोलीस वेलिंगकर यांच्या शोधात असून, वेलिंगकर यांनी अटकेच्या भीतीने सत्र न्यायालयात जामीनअर्ज दाखल केला होता. परंतु, न्यायालयाने त्यांना दिलासा दिलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार डिचोली पोलीस सुभाष वेलिंगकर यांच्यावर अटकेची कारवाई करू शकतात. दरम्यान, आंदोलकांनी मडगावातील आंदोलन शनिवारी रात्री स्थगित केले. परंतु, रविवारी अटक न झाल्यास पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.
फातोर्डा, मायना कुडतरीत तक्रार दाखल
सुभाष वेलिंगकर यांनी धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी फातोर्डा परिसरातील नागरिकांनी सकाळी पोलीस स्थानक गाठले. पोलिसांना निवेदन देत वेलिंगकर यांच्यावर अटकेच्या कारवाईची मागणी त्यांनी केली. याशिवाय राशोल, लोटली, कामुर्ली येथील नागरिकांनी एकत्र येत मायना कुडतरी पोलिसांत तक्रार नोंद केली.
वाहतूक कोंडीचा फटका
मडगावातील कोलवा सर्कलकडे आंदोलकांनी रस्ता बंद केल्यानंतर शक्य असेल, त्या मार्गाने पोलिसांनी वाहतूक वळवली. वाहतूक वळवण्यात येत असल्याचे दिसताच आंदोलकांनी सर्कलकडून मडगाव कदंब बसस्थानकापर्यंत येत त्याठिकाणी रास्ता रोको केला. काही नागरिकांनी वाहने हटवत रस्ता मोकळा करण्याचा प्रकार होताच वादावादीचे व मारहाणीचे प्रसंगही ओढवले. पण, पोलिसांनी शांतपणे परिस्थिती हाताळण्याचे प्रयत्न केले.
पोलीस, मामलेदारांचे समजावण्याचे प्रयत्न फोल!
- आंदोलकांनी मडगावातील बहुतांशी रस्ते बंद केल्यानंतर नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला. पोलीस अधीक्षक सुनीता सावंत यांनी आंदोलकांची भेट घेत त्यांची समजूत काढताना वेलिंगकरांचा शोध सुरू असून, त्यांच्यावर कारवाई होईल, असे सांगितले. पण आंदोलकांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही.
- मामलेदार प्रताप गावकर यांनीही आंदोलकांशी चर्चा केली. नागरिकांना त्रास होत असून रस्ते खुले करण्याची मागणी त्यांनी केली. त्यावेळी आंदोलकांनी राज्य सरकारला वेलिंगकरांना अटक करायला सांगा, दोन मिनिटांत रस्ते खुले करू, असे स्पष्ट केले..
वाहतूक ठप्प; पर्यटक, विद्यार्थ्यांचा पायी प्रवास
- मडगाव ओल्ड मार्केटजवळ रास्ता रोको केल्यानंतर आंदोलकांनी कदंब बसस्थानकाकडे धाव घेतली. तसेच काहींनी रवींद्र भवन सर्कलकडील रस्ते बंद केले.
- सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा कुतिन्हो व वॉरेन आलेमाव यांनी कदंबच्या तिकीट खिडकीवरील कर्मचाऱ्याला काम बंद करण्यास लावत प्रवाशांना जाण्यास सांगितले. तसेच लाकडाचे ओंडके टाकून बसेस अडवण्यात आल्या.
- आंदोलनामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्याने पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना बसमधून उतरून पायी प्रवास करत पुढे जावे लागले. याशिवाय शाळा, महाविद्यालये सुटल्यानंतर मुलांनाही पालकांच्या गाड्या पुढे येत नसल्याने पालकांपर्यंत पायी चालत जावे लागले. खासगी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही गाडी अडवून खाली उतरवण्याचे प्रकार घडले.
फादर बोल्मेक्स परेरांनी दिलेले सल्ले
१. गोमंतकीय जनता जागी झाली ही चांगली गोष्ट आहे. पण, जागृत होतानाच आपणाकडून दुसऱ्यासारखेच कृत्य घडणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे.
२. गोव्याला सध्या शांततेची गरज आहे. धार्मिक वाद नको आहेत. त्यामुळे कुणी काही म्हटले तरीही आपल्यातील शांती कायम ठेवा. लोकांना त्रास होणार नाही याचीही काळजी घ्या.
३. भावना दुखावल्यामुळे आंदोलन करून त्याची जाणीव करून देणेही गरजेचे होते. दुसरा कुणीही आपल्या भावना दुखावू शकत नाही, हा माझा भावार्थ आहे. सेंट फ्रान्सिस झेविअर यांनाही याचा काही फरक पडेल असे वाटत नाही. त्यामुळे शांतता सांभाळूया.
४. ते करतात तसेच आम्हीही केल्यास त्यांच्यात व आमच्यात काहीच फरक उरणार नाही. त्यामुळे कुणी काय म्हटले, कुणाला अटक झाली किंवा नाही झाली हे विषय सोडून द्या. काहीजणांना धार्मिक दंगा हवा आहे, धर्माधर्मात फूट पाडण्याचा त्यांचा डाव आहे. हा डाव ओळखा.
५. गोव्यातील जमिनी लाटण्याची जी प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे, त्यावरून दुसरीकडे लक्ष हटवण्याचा हा प्रयत्न आहे. आतापर्यंत झालेल्या आंदोलनाने सरकारचे लक्ष वेधून घेतलेले आहे. त्यामुळे लोकांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचलेल्या आहेत, ते खूप आहे. जमिनी राखण्यासाठी सर्वांनी एकत्र राहूया.
बोल्मेक्सप्रमाणेच वेलिंगकरांवर कारवाई : मुख्यमंत्री
शिवाजी महाराज प्रकरणात फादर बोल्मेक्स परेरा यांच्यावर ज्या पद्धतीने कारवाई झाली होती, तशीच कारवाई सुभाष वेलिंगकर यांच्यावरही होईल. सर्वांना समान न्याय दिला जाईल. त्यामुळे रस्ते अडवून कुणीही कायदा हाती घेऊ नये. राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
पुढील सुनावणी सोमवारी
अटकेच्या भीतीने सुभाष वेलिंगकर यांनी पणजी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनअर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जावर न्यायालयाने सुनावणी घेतली. पण, त्यांना अंतरिम दिलासा दिला नाही. याप्रकरणी न्यायालयाने पोलिसांना म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले असून, पुढील सुनावणी येत्या सोमवारी ठेवली आहे.
उपजिल्हाधिकारी, मामलेदारांना निर्देश
राज्यात जातीय विषयावरून संवेदनशील स्थिती निर्माण झाल्यामुळे तसेच विविध संघटनांकडून आंदोलने सुरू असल्यामुळे कायदा व सुव्यवस्था हाताळण्यासाठी आपापल्या कार्यकक्षेत हजर रहावे, असे निर्देश उपजिल्हाधिकारी, मामलेदारांना सरकारकडून देण्यात आले आहेत.