काहींच्या दबावामुळे सोनारांकडून चोरीचा ऐवज जप्त करण्यास अडचण
म्हापसा : राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात घरफोडीच्या घटना घडत होत्या. याप्रकरणातील अट्टल चोरटा मारियो बाप्तिस्ता उर्फ सांतान याच्या गुन्हेगारी कारवाया तपासण्यात कोलवा पोलिसांचा हलगर्जीपणा झाला. याच कारणामुळे संशयित मारीयोला या चोऱ्या करण्यास प्रोत्साहन मिळाल्याची माहिती पोलीस चौकशीतून उघडकीस आली आहे.
संशयित मारियो बाप्तिस्ता हा सराईत गुन्हेगार आहे. पोलिसांकडून अशा अट्टल गुन्हेगाराच्या कारवायांवर नजर ठेवली जाते. संबंधित गुन्हेगार कोणता व्यवसाय करतो. त्याच्या कुटुंबात किती सदस्य आहेत. त्याचा मित्रपरिवार तसेच त्याचा वावर कुठे असतो. याची वेळोवेळी बित्तंबातमी संबंधिताच्या घरी भेट देऊन तसेच विश्वसनीय सूत्रांकडून पोलीस मिळवतात.
मात्र, सात वर्षांनंतर पुन्हा घरफोडीमध्ये सक्रिय झालेला अट्टल चोरटा मारियो याच्या बाबतीत वरील माहिती नोंद करणे कोलवाळ पोलिसांना शक्य झाले नाही. या हलगर्जीपणामुळेच मारियोला रान मोकळे मिळाले व त्याने राज्यात घरफोडीचा सपाटा सुरू केला होता, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
दरम्यान, पर्वरी पोलिसांनी संशयित आरोपी मारियो सांताना बाप्तिस्ता उर्फ सांतान (४४, रा. ग्रॅण्ड पेडे, बाणावली) व मोहम्मद सुफियान शेखमिया (२०, रा. कालकोंडा-मडगाव) या दोघांकडून या घरफोडीसाठी वापरलेले मास्क आणि इतर साहित्य जप्त केले आहे. तसेच संशयित समर पाल (रा. दवर्ली व मूळ पश्चिम बंगाल) आणि फिलिप राटो (रा. बाणावली) या दोघांनी चोरीतील दागिन्यांची विल्हेवाट लावण्यास मारियोला मदत केली होती.
हे दागिने जप्त करण्याचे काम पोलिसांनी होती घेतले आहे. चोरीचे विकत घेतलेले हे दागिने सोनारांनी वितळले आहेत. त्यामुळे ते जप्त करण्यात अडचण निर्माण झाली आहे.
संशयितांनी पर्वरी, म्हापसा, शिवोली, साळगाव, नागाळी, दोनापावला, मेरशी, बांबोळी, फोंडा, वेळसांव-पाळी या भागातील आलिशान घरांना आपले लक्ष्य बनवून चोरीच्या कारवायांचा सपाटा लावला होती.
कॅसिनो जुगारात उडवले लाखो रुपये...
संशयित आरोपी मारियो बाप्तिस्ता हा अट्टल चोरटा ७-८ वर्षांनी पुन्हा सक्रिय झाला होता. फेब्रुवारी ते सप्टेंबर २०२४ या सात महिन्यांच्या कालावधीत त्याने संशयित साथीदार मोहम्मद शेखमिया याच्या सहाय्याने ७० पेक्षा जास्त घरे फोडून कोट्यवधी रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारला. याच कालावधीत त्याला कॅसिनो जुगाराचा नाद लागला. चोरीतील दागिने विकून मिळालेले लाखो रूपये मारियोने कॅसिनो जुगारात उडवले.
अधिकाऱ्यांवर दबावतंत्र
संशयितांनी चोरीतून लोकांचे दागिने चोरले होते. हे चोरीचे दागिने नंतर मडगावातील काही सोनारांनी खरेदी केले होते. या चोऱ्यांचा छडा लावण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच राजकारण्यांनी पोलिसांना पळताभुई थोडी केली होती. मात्र आता काही लोक दागिने विकत घेऊन चोरट्यांना प्रोत्साहन देणाऱ्या सोनारांची अटक होऊ नये तसेच चोरीचे दागिने जप्त करू नयेत यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर दबावतंत्र वापरत आहेत.