सरकारी इमारतींसह नऊ बांधकामे लवकरच जमीनदोस्त !

‘पीडब्ल्यूडी’कडून २६ बांधकामांचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
06th July, 11:59 pm
सरकारी इमारतींसह नऊ बांधकामे लवकरच जमीनदोस्त !

पणजी : सार्वजनिक बांधकाम खात्याने (पीडब्ल्यूडी) विविध ठिकाणच्या धोकादायक २७ सरकारी इमारती आणि इतर बांधकामांपैकी २६ बांधकामांचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण केले आहे. त्यातील नऊ बांधकामे जमीनदोस्त करण्याचा निर्णय ‘पीडब्ल्यूडी’ने घेतल्याची माहिती खात्यातील सूत्रांनी शनिवारी ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.

राजधानी पणजीसह इतर भागांत अनेक वर्षांपासून उभ्या असलेल्या इमारती तसेच इतर बांधकामे गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक स्थितीत आहेत. २०२३ मधील विधानसभा अधिवेशनात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाच्या उत्तरात तत्कालीन ‘पीडब्ल्यूडी’ मंत्री नीलेश काब्राल यांनी राज्यातील १६८ सरकारी इमारती धोकादायक स्थितीत असल्याचे स्पष्ट केले होते. मान्सून काळात पावसाचा जोर वाढल्यानंतर या इमारती कोसळून मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होण्याचा धोका आहे. त्यामुळे या इमारतींचे ऑडिट करून अति धोकादायक इमारती पाडण्याचा सल्ला विरोधी आमदारांनी सरकारला दिला होता. त्यानुसार सरकारने धोकादायक स्थितीत असलेल्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सुरुवात केली.


धोकादायक सर्वच इमारतींचे होणार ऑडिट

धोकादायक असलेल्या सरकारी इमारती आणि बांधकामांचे ‘पीडब्ल्यूडी’मार्फत ऑडिट करण्यात येत आहे. ज्या इमारतींपासून धोका आहे, अशा इमारती पाडण्यासंदर्भातील प्रक्रिया खात्याने सुरू केली आहे. डागडुजीची गरज असलेल्या इमारतींचीही लवकरात लवकर डागडुजी करण्यात येईल, अशी माहिती ‘पीडब्ल्यूडी’च्या इमारत विभागाचे प्रमुख अभियंता संतोष म्हापणे यांनी ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.

पहिल्या टप्प्यात सरकारी इमारती आणि इतर मिळून २७ बांधकामे धोकादायक स्थितीत असल्याचे आढळून आले. त्यातील २६ बांधकामांचे ‘पीडब्ल्यूडी’ने गेल्या काही महिन्यांत स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण केले असून, त्यातील नऊ बांधकामे जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील काहीच दिवसांत याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा