राज्यातील नेत्यांचे दिल्लीदौरे चर्चेत

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
06th July, 11:53 pm
राज्यातील नेत्यांचे दिल्लीदौरे चर्चेत

हा आठवडा राजकीय नेत्यांंच्या दिल्लीवारीने चर्चेत आला. मंत्रिमंडळात बदल होणार का? कोणाला मिळणार डच्चू? तर कोणाला मिळणार संधी? याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. त्याच बरोबर हिट अॅण्ड रनप्रकरणी तीन पोलिसांचे निलंबन, अॅक्सिस बँकेत खाते उघडण्यावरून वाद, तसेच पोलीस उपनिरीक्षकावरील बूट चाटण्याचा आरोप आदी विषय चर्चेत राहिले.


राज्यातील नेत्यांचे दिल्ली दौरे चर्चेत

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह इतर मंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे मंत्रिमंडळ बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सरकारातील एका मंत्र्याला डिच्चू देण्यासाठी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या एका आमदाराची मंत्रिमंडळात वर्णी लागणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच भाजप प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी मात्र असे काहीच घडणार नसल्याचा खुलासा केला आहे. सरत्या आठवड्यात वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो, वीज मंत्री सुदिन ढवळीकर, आमदार दिगंबर कामत यांनी दिल्लीला भेट दिली. सर्वांच्या भेटी स्वतंत्र होत्या. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह मंत्री, आमदारांच्या स्वतंत्र भेटी मंत्रिमंडळ बदलाच्या हालचालींचे संकेत देणाऱ्या आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांना गोव्यातील भाजप मुख्यालयाच्या पायाभरणी समारंभाचे निमंत्रण दिले. या व्यतिरिक्त मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय खाण मंत्री किशन रेड्डी गंगापुरम यांचीही भेट घेतली. वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी केंद्रीय रस्ते आनी महामार्ग मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली. वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केंद्रीय अक्षय उर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेऊन अक्षय उर्जा निर्मितीवर चर्चा केली. आमदार दिगंबर कामत यांनी दिल्लीत आकस्मिकरीत्या घेतलेली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट ही सुद्धा चर्चेचा विषय ठरली आहे.


शिस्तभंग प्रकरणी तीन पोलीस निलंबित
लोटली येथे लॉरीने उडवलेल्या कन्हैयाकुमार मंडल याला लोटली येथेच सोडल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. पोलिसांचे निलंबन ही शिस्तभंगाची कारवाई आहे. फोंडा पोलीस ठाण्यातील मुख्य हवालदार रवींद्र पी. नाईक, शिपाई आश्विन सावंत आणि रॉबर्ट वाहन चालक प्रितेश प्रभू यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. लोटली येथे मिसिंग लिंक रस्त्यावर कन्हैयाकुमारचा मृतदेह मायणा कुडतरी पोलिसांना सापडला होता. पोलीसांनी हीट अँड रन म्हणून प्रकरण नोंद केले होते. आता लोटली येथील या प्रकरणी मायणा कुडतरी पोलिसानी खूनाचे कलम जोडले आहे.

प्रवाह समिती कडून म्हादई पात्राची पाहणी
म्हादई नदीच्या पात्राची पाहणी प्रवाह समितीने गुरुवार पासून सुरू केली. गुरुवारी व शुक्रवारी गोव्यात पाहणी केली. आमठाणे, पडोशे, हणजूण, ओपा धरणाची पाहणी प्रवाह समितीकडून करण्यात आली. रविवारी कळसा नाल्यासह कणकुंबी येथे प्रस्तावित प्रकल्पाची पाहणी करण्यात येणार आहे. प्रवाह समितीच्या पाहणी नंतर कर्नाटका कडून पाणी वळविण्यासाठी सुरू असलेल्या हरकती उघड होणार आहेत. यामुळे गोव्याची बाजू भक्कम होईल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे.

पणजीत सुरू झाली ई बससेवा
स्मार्ट सीटी योजने अंंतर्गत वाहतूक सेवेत सुधारणा करण्याच्या उद्देशाने पणजीत इलेक्ट्रिक बससेवा सुरू झाली. इलेक्ट्रिक बससेवेच्या धर्तीवर विजेवर चालणाऱ्या रिक्षा आणि पायलटांंसाठी मोटारसायकल आणण्याचा सरकारचा विचार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांंनी स्पष्ट केले. प्रदूषण कमी करण्याच्या हेतूने इलेक्ट्रिक बशींचे प्रमाण वाढविण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंंत यांंनी स्पष्ट केले. इलेक्ट्रिक बससेवा सुरू झाली असली तरी पारंंपरिक बस व्यावसायिकांंच्या व्यवसायावर परिणाम होणार नाही. पारंंप​रिक बस व्यावसायिकांना दुसरे पर्यायी मार्ग देण्यात येणार आहेत. सोमवार पासून ६ इलेक्ट्रिक बसेस सुरू झाल्या असल्या तरी येणाऱ्या काळात ४८ बसेस सुरू होणार आहेत. उद्घाटनानंंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांंनी इलेक्ट्रिक बसमधून प्रवास केला.
अवघ्या २४ तासांत नोकरभरती परीक्षेचा निकाल
प्राथमिक शाळांंमध्ये ३६ प्रशिक्षित इंंग्रजी शिक्षकांंच्या भरतीसाठी घेण्यात आलेल्या सीबीआरटी परीक्षेचा निकाल २४ तासांंत जाहीर झाला. ३६ पदांंसाठी १५४० अर्ज आले होते. परीक्षेला ४०२ जण अनुपस्थित राहिले. सरकारी नोकरभरतीत पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारने कर्मचारी भरती आयोगाची स्थापना केली आहे.
राज्यात तीन नव्या कायद्यांंची कार्यवाही सुरू
देशाच्या इतर भागासह राज्यात भारतीय न्यायसंंहिता, भारतीय नागरी सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम या तीन कायद्यांंची कार्यवाही सोमवारपासून सुरू झाली. १ जुलै रोजी पणजी व मडगाव येथे अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हे नोंद करण्यात आले. नव्या कायद्यांंची जागृती करण्याबाबत पणजी पोलीस मुख्यालयात खास कार्यक्रम झाला. भारतीय दंंड संंहिता (आयपीसी), फौजादारी प्रक्रीया संंहिता (सीआरपीसी) आणि भारतीय पुरावा कायदा हे बिटिश संसदेत संंमत झाले होते. भारतीय दंंड संंहिते ऐवजी भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संंहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे कायदे देशाच्या संंसदेत संंमत झाले आहेत. नवीन कायद्यांंमुळे गुन्ह्यात दोषी होण्याचे प्रमाण वाढणार आहे, असे पोलीस महासंंचालक जसपाल सिंग यांंनी मार्गदर्शन करताना सांंगितले.
बूट चाटण्यास लावल्याचा पोलीस उपनिरीक्षकांवर आरोप
कोलवा पोलीस उपनिरीक्षक विभिनव शिरोडकर यांंनी मारहाण करण्यासह बूट चाटण्यास लावल्याची तक्रार नोंंद झाली आहे. या पोलिस उपनिरीक्षकाची राखीव पोलीस दलात बदली करण्यात आली असून उपअधीक्षक संतोष देसाई तपास करीत आहेत. महिलेच्या वतीने वकीलाने ही तक्रार नोंंद केली . या तक्रारीची दखल घेत दक्षीण गोवा पोलीस अधीक्षकांनी चौकशी करण्याचा आदेश दिला. यामुळे उपनिरीक्षक विभिनव शिरोडकर यांंची राखीव पोलीस दलात बदली करण्यात आली.
अॅक्सिस बँकेत खाते उघडण्याच्या परिपत्रकामुळे वाद
अनुदानित शिक्षण संंस्थांंच्या व्यवस्थापनांंनी अॅक्सिस बँकेत खाती उघडण्याचे परिपत्रक शिक्षण खात्याने जारी केले आहे. काँग्रेससह गोवा फॉरवर्डने याला आक्षेप घेत विरोध दर्शविला आहे. अनुदानित शिक्षण संंस्था शिक्षकांंना वेतन देण्यास विलंंब लावत असल्याच्या तक्रारी होत्या. अनुदानित शिक्षण संंस्थांंतील शिक्षकांना वेळेत वेतन मिळावे, यासाठी अॅक्सीस बँकेत खाते उघडण्याचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. खाते अॅक्सीस बँकेतच का, अन्य बँकेत का नाही, असा प्रश्न उपस्थित करीत विरोधकांंनी आक्षेप घेतला आहे. शाळा नियम ६२ नुसार शिक्षकांंचा पगार राष्ट्रीयकृत बँकेत जमा होणे आवश्यक आहे. शिक्षण खात्याला नोटीस जारी केल्याचे आमदार अॅड. कार्लुस फेरेरा यांनी सांंगितले.


आसगाव प्रकरण
आसगाव येथील प्रदीप आगरवाडेकर घर पाडण्याच्या प्रकरणी पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांच्या बदलीचा आदेश कोणत्याही क्षणी येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी दिल्ली भेटीत केंद्रीय पुढाऱ्यांकडे या विषयावर चर्चा केली आहे. घर पाडण्याचा आरोप असणारी पूजा शर्मा हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे. पूजा शर्माला अटकपूर्व जामीन मिळेल काय, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.
आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शन
आठवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी आभसी पद्धतीने करीयर विषयी मार्गदर्शन केले. दहावीतील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करावी, असा सल्ला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला.

इतर महत्त्वाच्या घडामोडी

- सक्तवसुली संचालनालयाने गोव्यातील एका मोठ्या उद्योग समुहाच्या कार्यालयात तसेच निवासस्थानी गोवा आणि मुंबईत छापे टाकले
- कला गौरव पुरस्कार योजनेत हात आखडता घेताना सरकारने लाभार्थी कलाकारांचा आकडा ३० वरून २० पर्यंत कमी केला
- सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) एका मोठ्या उद्योग समूहाच्या कार्यालयात तसेच संचालकांच्या निवासस्थानी गोवा आणि मुंबईत छापे टाकले
- राज्यातील सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित अशा सर्व शाळांचा डेटा वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे. यासाठी प्राधिकरणाची नियुक्ती होणार आहे
- वेर्णा, मिरामार येथील घरफोडी प्रकरणी पोलिसांनी राझिया टोळीचे सदस्य अरमानन खान व पवन गौड यांना अटक केली.
- भाजपचे ज्येष्ठ नेते आशिष सूद यांची गोवा भाजपाचे प्रभारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
- आषाढी एकादशीनिमित्त गोव्यातून विविध मंडळांच्या पायी पंढरपूर वाऱ्या जाण्यास सुरुवात झाली आहे. आमोणा येथील ओम नमो वारकरी मंडळाच्या वारीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सहभागी झाले
- फोंड्याचे नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.                  

हेही वाचा