वेणीफणी

Story: छान छान गोष्ट |
07th July, 04:01 am
वेणीफणी

रेवा आणि सुजा दोघींची छान मैत्री होती. अगदी दप्तराच्या रंगापासनं, डबा, पाण्याची बाटली सारं दोघींच एकाच रंगाच असायचं. ठरवूनच विकत घ्यायच्या तश्या त्या. सुजाचे केस आखूड तर रेवाचे मात्र लांबसडक, मऊमुलायम होते. चापूनचोपून विंचरलेल्या केसांमधून जाणारा सरळ भांग नि पुढे घेतलेल्या तिपेडी वेण्या म्हणजे जणू रेवाची ओळख.

याउलट सुजाचे केस खांद्यावर रुळू लागले की आई तिला केसकर्तनालयात घेऊन जायची नि मानेपर्यंत येईल असा बॉब कट करून आणायची. त्याचं असं होतं, सुजाची आई जायची कचेरीत. सकाळच्या घाईत सुजाच्या वेण्या घालण्याचं वाढीव काम नको म्हणून सुजाच्या आईने तिचे केस बारीक ठेवले होते पण सुजाच्या मनाने यावेळी तिने केस वाढवायचा हट्ट धरला.

आई म्हणाली, “सुजा, केस वाढवणं सोप्पं नाही. कापले नाही की झरझर वाढतील खरे पण त्यांची तेवढी निगाही राखावी लागते. वेळेवर वेणीफणी करायची असते, छान ऊन ऊन तेलाने चंपी करून घ्यायची असते. मी वेळात वेळ काढून करीन हे सगळं पण तू करून घेतलं पाहिजेस माझ्याकडून नाहीतर म्हणतात नं नव्याचे नऊ दिवस तशातली गत.”

सुजा म्हणाली, “नाही गं आई. मी रोजच्यारोज वेणीफणी करून घेईन तुझ्याकडून. तेलही लावून घेईन, बघच तू.”

महिना झाला, दोन महिने झाले, तीन महिने झाले, सुजाचे केस कातर न लावल्याने, व्यवस्थित निगा राखल्याने झरझर वाढू लागले. तिलाही आपले केस असे वाढताना पाहण्यात खूप मज्जा वाटू लागली. सुजाचे केस  बघताबघता कंबरेपर्यंत आले. केस धुवून ती उन्हात उभी राहिली की सोनेरी सुर्यकिरणांत  चमकायचे,  तिपेडी वेण्या, त्यांना रिबिनींची लालचुटूक फुलं कित्ती छान दिसायची रेवा! 

नव्याचे नऊ दिवस..सुजाची आई म्हणाली होती तसंच झालं. जशी शाळेला सुट्टी पडली तशी सुजा खेळण्याच्या नादात केसांच्या निगेकडे दुर्लक्ष करू लागली. 

आई तेलफणी घेऊन बसे, सुजाला हाकारे, “सुजा ये बरं पटकन. वेण्या घालून देते चट्टदिशी.”

सुजा म्हणे, “आई मला कंटाळा आलाय. संध्याकाळी विंचर ना.”

संध्याकाळीही तसंच खेळाचं वगैरे कारण सांगून आईला पाठ दाखवी. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आईने पाठीत धपाटा घालून एका जागेवर बसवावं तिला नि केसात कंगवा घातला की तो केसांत अडकून जावा. गुंताच तेवढा व्हायचा केसांत, मग हिसका बसताच आई गं. हळू ना. दुखतय गं..असं रडगाणं सुरू. धुळमातीत  खेळून झालं की तेच मळकट हात न धुता केसांवर फिरवल्याने केसात उवालिखांच साम्राज्य प्रस्थापित झालं. केसात हुळहुळू लागलं की सुजा दोन्ही हाताच्या बोटांनी कराकरा डोकं खाजवायची, परत खेळायला सुटायची. 

आजी डोळ्यांना चष्मा लावून तिच्या उवा काढायला बसे. थोडा वेळ असं बुड टेकलं की सुजाच्या बुडाला कढ येत. रडूनभोकाड पसरून ती तेथून पळ काढे. आजी म्हणे, “आता पळत्येस, मग उवांनी समुद्रात ओढून न्हेलं मग समजेल.”

सुजा म्हणायची, “खोटं. असं काहीच होत नाही.”

तालुक्याच्या बाजारातनं मसाल्याचं सामान आणायचं म्हणून सुजाची आई निघाली होती. आज्जी म्हणाली, “सुजालाही न्हे. कुठल्याकुठल्या आळीत जाते खेळायला, दहा हाका मारल्या तरी येईल तर शपथ. माझा मेलीचा जीव खालीवर!” सुजाच्या आईला सासूचं म्हणणं पटलं. ती सुजालाही सोबत घेऊन गेली.

बाजारात सुक्या मिरच्या, सुकं खोबरं, खडे मसाले ढिगांनी विक्रीला ठेवले होते. सुजाच्या आईची वस्तुंच्या भावांबाबत बोलणी चालू होती. ऊन मी मी म्हणत होतं. सुजाला कुठून आईसोबत आले असं झालं होतं. आज तिला उंदडायला  मिळालं नव्हतं. ती इथंतिथं पहात असताना तिचे डोळे मागून कुणी इवल्या हातांनी झाकले नि ओळख बरं म्हणू लागलं. “रेवाचेच हात हे.”  सुजाने ओळखलं व आनंदाने डोळे उघडत चित्कारली, “रेवा तू इथे!” पण ..पण रेवाचे केस..ती अचंबित होऊन रेवाच्या चेहऱ्याकडे पहात राहिली.

रेवाचे बाबा सुजाच्या आईला म्हणाले, “रेवाच्या आईची तब्येत बरी नाही. दोन महिने झाले, इस्पितळात आहे. रेवाने सध्या घरची जबाबदारी घेतलीय. वरणभात करते, केरवारा काढते, इतकंच काय पाणीही भरते.”

“अहो पण रेवाचे केस!” सुजाच्या आईने रेवाच्या आखूड केसांत बोटं फिरवत विचारलं.

“ते केस तेवढे विंचरता येईनात तिला नि मलाही वेणीफणी करणं येत नाही म्हणून मग पार्लरमध्ये न्हेऊन कापून टाकले. चार दिवस जेवली नाही पोर, केस कापले म्हणून.”

सुजाच्या आईने रेवाला जवळ घेतलं, “रेवा, आई बरी झाली की पुन्हा वाढव बरं केस. निराश नको होऊस बाळा.” सुजाच्या आईने तिला समजावलं.

घरी येताच सुजाने आपलं डोस्कं नि उवांची फणी आज्जीच्या हवाली केली व म्हणते कशी, “आज्जी, लढाईला सज्ज हो. सगळ्या उवालिखांना पाणी पाज. विजयी भव.” आई, आज्जी दोघी खो-खो हसू लागल्या. तेव्हापासनं  सुजा खरंच सुधारली. रोज आईकडून केस विंचरून घेऊ लागली, वेळोवेळी केस धुवून घेऊ लागली.

केसांची निगा राखल्याने उवालिखांनी तिच्या केसांतून काढता पाय घेतला.


गीता गजानन गरुड