वैद्यकीय अहवालानुसार कारवाईचे डीजीपींचे आदेश

कन्हैयाकुमार मृत्यू प्रकरण : खुनाचा गुन्हा नोंद होण्याची शक्यता

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
06th July, 12:10 am
वैद्यकीय अहवालानुसार कारवाईचे डीजीपींचे आदेश

मडगाव : लोटलीतील कन्हैयाकुमार मंडल (३२) याच्या मृत्यूप्रकरणी हिट अँड रनप्रकरण नोंदवले गेले होते. यात शिस्तभंगप्रकरणी फोंड्यातील तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले व निष्काळजीपणामुळे मृत्यूचे कलम नोंद करण्यात आले आहे. आता पोलीस महासंचालकांकडून वैद्यकीय अहवालानुसार तपासकाम करण्याच्या सूचना मिळाल्याने याप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंद होण्याची व चौकशीदरम्यान नव्या गोष्टी व काही पोलीस कर्मचाऱ्यांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे.

लोटलीत अज्ञाताचा मृतदेह मिळालेल्या घटनेने आता खुनाचा संशय येण्यापर्यंतचे वळण घेतलेले आहे. रस्त्यावर मृतदेह आढळल्यानंतर मायना कुडतरी पोलिसांनी ‘हिट अँड रन’ प्रकरण नोंद केले. नातेवाईकांनी ओळख पटवताना फोंडा येथे गोंधळ घालणाऱ्या कन्हैयाकुमारला फोंडा पोलिसांनी ताब्यात घेतले व दुसऱ्या दिवशी मृतदेह मिळाल्याची माहिती दिली. त्यामुळे फोंडा पोलिसांच्या ताब्यातील व्यक्ती लोटलीत कसा?, याचा शोध घेत असताना फोंडा पोलिसांच्या रॉबर्ट वाहनाने त्याला आणून सोडल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मायना कुडतरी पोलिसांकडून हवालदाराचा जबाब नोंदवण्यात आला.

मृतदेहाच्या चिकित्सा अहवालानंतर अनेक गोष्टी समोर आल्या. यात वाहन गेल्याने मृतदेहाचे दोन तुकडे झाले असले तरीही त्याचा मृत्यू वाहन अंगावरुन जाण्यापूर्वी झाला होता. याशिवाय मृतदेहाच्या गळा, हात व पोटावर वार केल्याचे समोर आले. फोंडा पोलिसांच्या रॉबर्ट वाहनावरील हवालदार रवींद्र नाईक, कॉ. अश्विन सावंत व वाहन चालक प्रीतेश प्रभू यांचे निलंबन करण्यात आले. याप्रकरणातील वाहनाला धारवाड कर्नाटकातून ताब्यात घेण्यात आले आहे. वाहनचालकालाही पोलिसांकडून बोलावण्यात आले असून त्याचा जबाबही नोंदवण्यात येणार आहे.

नातेवाईक तत्काळ गावी का गेले?

कन्हैयाकुमार याच्या मृतदेहाची ओळख नातेवाईकांकडून पटवण्यात आली. नातेवाईकांनी फोंडा पोलिसांनी कन्हैयाकुमारला ताब्यात घेतल्याची माहिती दिली. त्याचदिवशी सायंकाळी कन्हैयाकुमारचे नातेवाईक गोवा एक्स्प्रेसमधून गावी गेले. या प्रकरणात पोलिसांचा संबंध आल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यापूर्वीच त्यांना कुणी गावी जाण्यास भाग पाडले, असा प्रश्न आहे.

मृतदेहावरील जखमांनुसार गुन्हा नोंद होईल : सिंग

लोटलीतील मृतदेहाचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला आहे. कन्हैयाकुमार याच्या अंगावरुन जी गाडी गेलेली होती, ती गाडी कर्नाटकातून ताब्यात घेतली आहे. त्या गाडीची पाहणी करण्यात आली असून लवकरच अहवाल प्राप्त होईल. मात्र, ज्याप्रकारच्या जखमा शरीरावर आढळून आलेल्या आहेत व वैद्यकीय अहवालात नमूद आहेत, त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात येईल, असे पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी सांगितले. 

हेही वाचा