आराडी सुकूरमधील फिनाईल पिलेल्या मुलांना डिस्चार्ज

संशयित आईच्या मानसिक स्थितीची चाचणी करा; डॉक्टरांचा सल्ला

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
05th July, 11:57 pm
आराडी सुकूरमधील फिनाईल पिलेल्या मुलांना डिस्चार्ज

म्हापसा : आराडी सुकूर येथील फिनाईल प्राशन केलेल्या त्या दोन्ही लहान मुलांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. तर, मुलांच्या आईवर उपचार सुरू असून डिस्चार्ज दिल्यानंतर तिची मानसिक चाचणी करण्याचा सल्ला खासगी इस्पितळाकडून देण्यात आला आहे.

सोमवार, दि. १ जुलै रोजी रात्री ११.३० वा. अगोदर संशयित महिलेने स्वत: फिनाईल प्राशन करत ते आपल्या ३ आणि ५ वर्षे वयाच्या दोन मुलांना सेवन करण्यास दिले होते. या घटनेनंतर तिघांचीही प्रकृती खालावली असता तिला आपल्या हातून गंभीर चूक घडल्याची जाणीव झाली. तिने पती व नातेवाईकांना घरी बोलावून घेतले. या तिघांनाही पर्वरीतील खासगी इस्पितळात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तिथून दोन्ही मुलांना गोमेकॉत पाठवले होते.

गुरुवारी गोमेकॉतून उपचारानंतर या दोन्ही मुलांना घरी पाठवण्यात आले. तर संशयित २६ वर्षीय आईवर खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत. या महिलेची मानसिक स्थिती ठीक नसल्याने तिला डिस्चार्ज दिल्यानंतर तिच्या मानसिक स्थितीविषयी चाचणी करावी, असा सल्ला इस्पितळाच्या डॉक्टरांनी तिच्या कुटुंबियांना दिला आहे.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार या महिलेच्या मानसिक स्थितीची बांबोळी येथील मनोरुग्णालयामार्फत चाचणी करण्याची तयारी पर्वरी पोलिसांनी चालवली आहे.

दरम्यान, पोलिसांनी संशयित महिलेविरुद्ध आपल्या दोन अल्पवयीन मुलांना फिनाईल पाजून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली भारतीय न्याय संहिता कलम १०९ व गोवा बाल कायदा कलम ८(२) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. 

हेही वाचा