सात भावंडांची रक्षणकर्ती… आई !

Story: सय अंगणाची |
06th July, 05:22 am
सात भावंडांची रक्षणकर्ती… आई !

पृथ्वीतलावर जी प्रत्येक लेकराची सावली बनते, त्याचं पालनपोषण करते ती मायमाऊली आई असते. जी कष्टाळू परिश्रमातून जीवन जगली. माहेर-सासर यांच्यामधलं सुख कधी तिच्या वाट्याला सहसा आले नाही. त्या आईच्या पोटी आम्ही चौघे भावंडे जन्माला आलो अन् काही काळानंतर का असेना, तिच्या जगण्याला एक आधार प्राप्त झाला. ती आमची आई अन् मामा-मावशी अशा सात भावंडांची रक्षणदाती. आठवं मुलं म्हणजे छोटी मावशी जन्माला आल्यानंतर एकविसाव्या दिवशी आजी म्हणजेच आईची आई जग सोडून गेली. 

साट्रे-पारवडच्या कोपऱ्यातील घनदाट जंगलातील तळ्याची‌ राई या ठिकाणी वास्तव्यास असताना अनेक जीवघेण्या प्रसंगांतून तिने आपल्या भावंडांना जीवनदान दिले. काही गोष्टी काल्पनिक वाटतात पण तिच्या मुखातून ते हृदयस्पर्शी प्रसंग ऐकताना खरेपणाची कल्पनाही करवत नाही एवढे चटके हृदय पिळवटून टाकणारे वाटतात. कितीही आडदांड माणसांना आपल्या एका हाताने जमीनदोस्त करणारे बलाढ्य शरीराचे आईचे वडील होते. अन् अगदी साधं राहणीमान असलेली आईची आई. आईच्या स्वभावावरून आजही आम्ही आजीचं वर्णन करू शकतो कारण आजही आईचे वारसदार आईला पाहताक्षणी आजींची आठवण‌ हमखासपणे काढतात. आईची आई ज्यादिवशी जग सोडून गेली त्या दिवशी आई धरून आठही भावंडं त्या घनदाट जंगलात मृत‌ शरीराला कशी काय कवटाळून बसली असतील? याची कल्पना केल्यावर आईला घट्ट मिठी माराविशी वाटते. एकवीस दिवसाच्या बालकाला आपली आई जगात नाही आहे याची जाणीवही नव्हती अन् ते मृत शरीराच्या कवेत कसं काय रडत बसलं असेल त्यावेळी? मृत्यूनंतरही जिची अंगाई‌ कातरवेळेला कौलारू घराच्या कुडातून ऐकू यायची आणि आईच्या मांडीवर असलेल्या मावशीचं रडणं सहजपणे बंद व्हायचं. हे सत्य स्वीकारण्यासाठी धाडस अंगी बाळगावं लागतंय आजही. 

आपली मुलं वडिलधाऱ्या माणसांविना घरी आहेत याचं भान आजोबांना कधीच नसायचे. आजीच्या आठवणी सांगताना आजही आईचे ओठ कापतात. घरासमोर असलेल्या औदुंबराच्या, लवकीच्या झाडावर बसलेली अस्वले आणि घरात एकापाठोपाठ असलेली लहान भावंडं एकमेकांच्या छायेत राहून भीतीला सामोरी जायची. अस्वले लवकीचं फळे, औदुंबराची फळे खाण्यासाठी दारासमोर असायची. ती घरात घुसू नयेत यासाठी चौवीस तास गाताडीबाहेर आग पेटवलेली असायची. कधी अस्वलाच्या तोंडून सरकलेली औदुंबराची फळे विस्तवाशेजारी यायची. छोट्या मावशीला मांडीवर आणि इतर सहा भावंडे कातरवेळ झाली की वडील येईपर्यंत आईच्या अवतीभोवती असायची. 

काही‌ काळानंतर मावशीला रिवे सत्तरीत आईच्या आजीकडे ठेवण्यात आले. नंतर गुरे-ढोरे आणि भावंडे यामध्ये आईचं जीवन गुंतले. दही-भात, भाकरी, शेंडवाल, कुंभार, नाली या रानभाज्या नुसत्या पाण्यात नाहीतर ताकात शिजवल्या जायच्या हेच त्यांचं जेवण असायचं. ढाण्या वाघाच्या तोंडून हिसकावून घेतलेली म्हैस, वाघ दिसला की जळीमळी चरणाऱ्या म्हशी एकत्र झाल्या की आई-मामाच्या लक्षात यायचं नंतर म्हशींना आवाज देत म्हशी घराच्या दिशेने वळवल्या जायच्या. मामाला पुढे, मधे म्हशी आणि मागे आई असा त्यांचा प्रवास असायचा. वाघ माणसांना खातो असं म्हटल्यावर आई नेहमी म्हणते. वाघ माणसांना खात नाही आम्ही भल्या मोठ्या वाघांना सामोरे गेलोयं. या कलियुगात कोण कुणाला खाईल याचा पत्ता लागणार नाही. आम्ही प्राण्यांनी भरलेली जंगलं पाहिली. पण कधी त्यांना पकडण्यासाठी पिंजरे लावण्याची वेळ आली नाही. त्यांच्या मुखी सहसा आम्ही आमच्या गुरा-ढोरांनाही दिले नाही. मामांना चरणीला घेऊन गेलेल्या गुरांना यायला उशीर झाला की त्यांना शोधण्यासाठी काळोखी वाटांवरून उजेडाविना आई जायची. 

सगळ्या म्हशींची नावे घेत ती त्यांना गाठायची. जळू लागून लालभडक झालेल्या पायांना चुना लावून पडलेल्या जळूंना आगीत काढून टाकले जायचे. रक्तबंबाळ झालेल्या भावांच्या पायांची काळजी आई घ्यायची. दिवसभर जंगलात गुरा-ढोरांच्या मागे फिरून रानटी श्वापदापासून त्यांचे रक्षण करून संध्याकाळी पुन्हा भावंडांसाठी चुलीवर काहीतरी शिजवून त्यांच्या पोटाची भूक भागवणं यातच तिचं सर्वस्व होतं. कितीतरी सरपटणारे जीव घरात शिरायचे मग रात्रपाळी ही तिच्याच नशीबी असायची. वडिलांच्या क्लेशामुळे मोठ्या मामाने एकदिवस घर सोडले ते कायमचेच. तळ्याच्या राईतून तो सरळ गोव्यातील फोंडा तालुक्यात पोहचला. एका भावाची काळजी आईला होतीच परंतु या सगळ्या जीवघेण्या परिस्थितीतून तो एखाद्या चांगल्या ठिकाणी राहावा एवढंच तिला वाटायचे. शिक्षणाचं एकही अक्षर त्यावेळी त्यांच्या नशिबी नव्हते. त्यांच्या जगण्यातला वनवास त्यांच्या व्यतिरिक्त आणखी कुणाला ही जमणारा नव्हता. साट्रेच्या गडाविषयी सांगताना तर माझी आई सुध्दा एक हिरकणीच होती असे म्हणणे नाकारता येणार नाही. पाठीवर ओझे घेऊन आम्ही डोंगर चढलो त्यावेळी कधी ती थकली नाही. आपल्या बहिणींना कधी कामाचा भार तिने दिला नाही अन् कधी वडिलांकडून मार खाल्ला नाही. आपल्या सातही भावंडांसाठी तिने जिवाचे रान केले. आईविना‌ पोरकी आम्ही यांची जाणीव ही आईने आपल्या भावंडांना होऊ दिली नाही. कारण मोठ्या बहिणीपेक्षा तिने भावंडांप्रती आईचे स्थान निर्माण केले. तिच्या आयुष्यात अनेक प्रसंग आले. मी लहान असताना आई सतत रात्री गुणगुणायची. तिचे ते शब्द आजीला साथ घालणारे असायचे, एखादेवेळी त्या शब्दांतून तिचं दु:ख मला जाणवायचं. मी तिच्या कुशीत शिरल्यावर ती डोक्यावरून नुसते हात फिरवत गुणगुणत रहायची. आज कितीतरी वर्षे उलटली. आईचं गुणगुणणारे शब्द बंद झाले. कदाचित आपल्या भावंडांचे आनंदी जगणं, आपल्या मुलांचं सुख याच्यात ती आता कुठेतरी जगताना दिसत आहेत. गतकाळाच्या जखमा आज तिच्यापासून अलिप्त झालेल्या आहेत. आज तिच्या  नातवंडांच्या बालपणात ती रमताना दिसत आहे. यातच ती आनंदी आहे.      


ओनिता रामा वरक, पाल-ठाणे‌, सत्तरी.