आपण चांगले पालक कसे बनू शकतो ?

Story: पालकत्व |
06th July, 03:18 am
आपण चांगले पालक कसे बनू शकतो ?

पेरेंटिंग म्हणजेच पालकत्व ऐकायला शब्द जेवढा सोपा आहे तेवढाच प्रत्यक्षात साकारणं अवघड आहे. दोन जुळ्या मुलांची आई असल्याने मी हे सांगू शकते की जगातील सर्वात कठीण काम हे पालकत्व आहे. पालकत्व म्हणजे काय तर देवाने बाळाच्या स्वरूपात दिलेला मातीचा गोळा. त्याला कसे बनवायचे, किती पाणी घालायचे, त्याच्यावर किती जोर द्यायचा, काय आकार द्यायचा आणि काय घडवायचे ही सगळी जबाबदारी पालकांची असते. ज्या पालकांची मुले डॉक्टर, इंजिनियर झाली ते चांगले पालक आणि ज्यांची मुले शिकली नाहीत, कामाला नाहीत ते वाईट असे कधीच नसते. जे चांगला माणूस घडवतात ते चांगले पालक. जो मातीचा गोळा मळताना त्याच्यात चांगली मूल्ये जसे की आदर, प्रेम, मानवता, परोपकार ही सगळी मूल्ये रुजवतात ते चांगले पालक. आपल्याला देवाने आशीर्वाद स्वरूपी दिलेला मातीचा गोळा कोणता आकार घेतो हे मुख्यत: पालकांच्या हाती असते, तसेच घरातल्या आणि आसपासच्या परिस्थितीवरही अवलंबून असते. त्यामुळे आपली मुले ज्या वातावरणात वाढतात ते त्यांच्यासाठी चांगले आहे की नाही हे सुद्धा लक्षात घ्यायला हवे.

चांगले पालक होण्यासाठी काही खास प्रशिक्षण घेण्याची गरज नसते आपण आपल्या किंवा इतरांच्या अनुभवातून ते शिकत जातो. आपण काही गोष्टी समजून घेतल्या तर निश्चितच तुम्ही एक चांगले पालक बनून एक जबाबदार नागरिक तयार करणार याची खात्री आहे.

१) मुलांसमोर भांडण नको 

 मुलं जशी आपली मातृभाषा बोलायला स्वतःहून आपल्या आई-बाबांकडून शिकतात तसेच वागायला पण आई-बाबांकडूनच शिकतात. त्यामुळे मुलांसमोर भांडण पूर्णपणे टाळावे. आपल्या जोडीदाराला काही वाईट शब्द तर देत नाही ना याचे नेहमी आपण भान ठेवले पाहिजे. मुलांसमोर भांडल्याने मुलेही भांडखोर बनतात.

२) बोलताना भान ठेवावे 

आपल्याला आपल्या मुलांनी सर्वांसोबत चांगले बोलावे असे नेहमी वाटत असते. मग आपणही आधी चांगले बोलले पाहिजे. हे खूपदा दिसून येते की पालक जे शब्द रागाच्या भरात बोलून जातात तेच शब्द मुलं सहजच खेळताना किंवा रागात दुसऱ्यांना म्हणतात. 

३) ऐकून घ्यावे 

 काहीही वाद झाला किंवा मुलांकडून काही चूक झाल्यास त्यांना त्यांची बाजू मांडण्यास वेळ द्यावा. शाळेत काय केले, नवीन काय शिकलो हे आवर्जून त्यांच्याकडून जाणून घेणे खूप आवश्यक आहे. त्यातूनच मुलांना मन मोकळेपणाने आई-बाबांना काहीही सांगायची सवय लागते. अशी मुले कोणताही कठोर निर्णय घेताना आई-बाबांचा सल्ला घेतात.

४) आपल्या इच्छा त्यांच्यावर लादू नका  

 जे विचार बदलत्या काळात अर्थहीन ठरतात ते मुलांवर लादू नका. त्या ऐवजी त्यांना नवीन काहीतरी शिकायला प्रोत्साहित करा त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना शिकू द्या. आपल्याला डॉक्टर होता आले नाही म्हणून मुलांवर त्या इच्छा लादू नका.

५) पौष्टिक अन्न खाण्याची सवय 

 पोषक तत्व असलेले पदार्थ खाण्याची सवय मुलांना लहानपणापासूनच लावली पाहिजे. चिप्स, थंड पेय, चॉकलेट्स या सगळ्यांचे वाईट परिणाम त्यांना समजावून सांगण्याची गरज असते. नातेवाईकांना असे काही न आणण्यासाठी आधीच सांगून ठेवा. किंवा मुलांना त्या गोष्टींसाठी नकार द्यायला शिकवा. मुलांना समजावून सांगा फळे, भाज्या यासारख्या पौष्टिक आहारामुळे काय काय होते त्याचप्रमाणे त्यांना चिप्स, बिस्किट, चॉकलेट यासारख्या पदार्थांमुळे आपल्या शरीराला कोणकोणते त्रास होतात हेही सांगा. 

६) मोबाईल कशासाठी वापरावा आणि किती वेळ वापरावा 

 मुलांना मोबाईल फक्त काही महत्त्वाच्या गोष्टी पहायलाच देणं व तो काही वेळासाठीच देणं गरजेचं आहे. मुलं जेवत नाहीत किंवा रडतात म्हणून मोबाईल देणे टाळायला पाहिजे. कित्येक पालकांना स्वतः मोबाईल सर्रास वापरायची सवय असते. काही बायका तर लवकर काम आटोपून मोबाईलवर रिल्स पाहत बसतात. काही पुरुष कामावरून आले की मुलांची चौकशी करायची सोडून मोबाईलमध्ये घुसतात. काही बायका मुलांचा अभ्यास घेताना स्वतः कुणा ना कुणाशी तरी मोबाईलवर बोलत बसतात. हे सगळं चुकीचं आहे. आपण पालक जसे मोबाईलशिवाय वाढलो आम्हाला जसा बालपणात आई-बाबांचा वेळ मिळाला तसाच आपल्या मुलांना पण कॉलिटी टाईम आपण दिला पाहिजे.

 ७) मुलांना स्वावलंबी बनवा 

 मुलांना स्वावलंबी बनायला मदत करा. छोट्या मुलांना काही छोट्या छोट्या गोष्टी करायला सांगा म्हणजे कपडे घडी करून व्यवस्थित ठेवणे, स्वतःचे ताट स्वतः स्वच्छ करून घासून धुवून ठेवणे, घरातला कचरा गोळा करणे ह्या कामापासून सुरुवात करावी कामे सांगताना मुलगी मुलगा हा भेद ठेवू नये.


सोनिया परब, साळ, गोवा.