जादू रात चांदवाची

Story: मनातलं |
06th July, 03:38 am
जादू रात चांदवाची

प्रत्येक प्रवासाची एक वेगळीच मजा असते. दरवेळी एक नवीन अनुभूती मिळत असते त्यातून आणि जर तो प्रवास रात्रीच्या वेळी केलेला असेल, तर वेगळाच भासत असतो. शिवाय तो कुठल्या वाहनाने केलाय यावर पण अनुभवांची स्थिति अवलंबून असते. कधी कधी रंगांच्या भडकपणापेक्षा काळ्या पांढऱ्याची जादू जास्त परिणामकारक वाटते, डोळ्यांना सुखकारक वाटते. वाऱ्याच्या झोकाने पानांच्या सळसळीतून स्तब्ध निसर्ग काही सांगत असतो आणि ती ऐकण्यासाठी नीरव शांतता हवी. 

वरचेवर पुण्या-मुंबईला अशा रात्रीच्या प्रवासाचा योग येतो. आता तर ते सवयीचं होऊन गेलंय. दिवसभराच्या तळपत्या उन्हात अगदी एसीतून प्रवास केला तरी थकवा जाणवतो. त्यापेक्षा रात्रीचा गारवाच बरा वाटतो. दिवसा दिसणारी बरीच निसर्ग चित्रे आपण डोळ्यात साठवत जातो ती लख्ख उजेडची असतात पण रात्रीच्या प्रवासात ती गूढ रहस्यमय अशी अंधाराची होतात. त्यात पण एक वेगळीच नशा असते. संध्याकाळच्या सातच्या सुमारास धरतीवर मिट्ट काळोखाचं साम्राज्य आपलं राज्य करण्यासाठी सज्ज झालेलं असतं. चंद्र कुठल्या तिथीचा आहे यावर मग चंद्रप्रकाशाचं प्रमाण ठरलं जातं. पौर्णिमेचा चंद्र असेल, तर मग सगळं चित्रच रुपेरी झळाळी पसरलेलं दिसतं. जणू चांदीचा मुलामा चढवलेला असतो. झाडा-झुडपांवर वेलींनी घातलेली पांघरुणे वेगवेगळा आकार धारण केलेली दिसतात आणि मग मन त्याचे संदर्भ लावू पहातं. अरे हा तर उभा घोडा दिसतोय, हे तर बसलेलं कुत्रंच वाटतंय. कधी झोपलेल्या माणसाचा भास होतो, त्यात कधी मडका, कधी पाण्याची झारी असे अनेक आकार बघायला मिळतात. दिवसा जसे आपण कापूस पिंजल्या ढगांचे अर्थ शोधत असतो तसेच या रात्रीच्या काळोखात अंधारलेल्या आकृत्या उभ्या ठाकत जातात. मला हयात छान वेळ घालवता येतो. बस पुढे जात असते. माझं अंदाज लावणं चालू असतं काहीतरी कल्पना सूचत असतात. 

एकदा तर मला कर कटीवरी हात ठेवून उभा असलेला पांडुरंगच दिसला. खरं तर हे सगळे आपल्या मनाचेच खेळ असतात आणि मला हा खेळ खेळण्यात मजा येते. त्यातून वेळ ही जातो. प्रवासाचा शीण जाणवत नाही. मनोरंजनही होते. दूरवर खोल दरीत कुठेतरी दोनचार मिणमिणते दिवे जागे असतात बाकी सारं गाव चिडी चूप होऊन निजलेलं असतं. जणू आकाशातल्या थोड्या तारका खाली येऊन लुकलुक करत आहेत असं वाटतं. कारण अंधारामुळे जमीन आणि आकाश यांची सीमारेषा लुप्त झालेली असते. दोन्हीही एक रंग होऊन गेलेले असतात. दिवसा हिरव्या रंगांच्या छटा दाखवणारा हा निसर्ग रात्री काळ्या रंगांच्या छटांमध्ये अवतरू लागतो. काळा कुट्ट, गडद काळा, राखाडी काळा, काळसर आणि या पार्श्वभूमीवर चमचम करणारे तारे म्हणजे काळ्या चंद्रकळेवरच्या नाजूक चांदण्यांच्या बुट्टया यांनी केलेली कशिदाकारी. असे हे वस्त्र लेवून धरती माता नटलेली असते. 

रात्रभर पाऊस पडत असतो तेव्हा त्याला रातवा असं म्हटलं जातं. मग रात्रभर अशा प्रकाशाने बरसणाऱ्या चांदण्यांची रात्र ही रात चांदवा म्हटली पाहिजे. चंद्र चांदण्यांच्या प्रकाशाच्या वर्षावाला रात चांदवा हे नाव सार्थ ठरेल. 

जेव्हा हा रात्रीचा प्रवास रेल्वेचा असेल तेव्हा दिसणारा नजारा हा खिडकीतून दूरवर सरळरेषेत एखाद्या फोटो फ्रेमसारखा समोर बराच वेळ रेंगाळत नजरे समोर तरळत असतो. पण गोलाकार घाट वळणाच्या माथ्यावरून जाणारी बस किंवा गाडी असेल तर  वेगवेगळ्या भागाचं दर्शन बदलत्या नेपथ्य किंवा स्टेजसारखं समोर प्रस्तुत होत जातं. कधी या बाजूने तर कधी त्या बाजूने, मधेच समोरून मागून येणाऱ्या गाड्या प्रखर उजेडाचे झोत मारून उगाच त्रास देणाऱ्या वात्रट मुलासारख्या छळत असतात. गार वाऱ्यावर डोलणारी शेते, ऊसाचे गुलाबी तुरे, मंद मंद झुलताना दिसतात. जणू कुणी अंगाई गीत गात त्यांना जोजवते आहे. त्यामुळे ती झोपेने पेंगुळलेल्या मुलासारखी भासतात. काही झाडे मात्र रात्रीचा खडा पहारा करणाऱ्या रखवालदारासारखी उभी दिसतात. आभाळ निरभ्र असेल तर चांदण्या फेर धरून नाच करताना दिसतात, तर पौर्णिमेचा पूर्ण चंद्र आकाशी असेल तर चकचकणाऱ्या कल्हई केलेल्या ताटासारखा दिसतो. अर्ध्या रात्रीनंतरचा चंद्र आपली पुसटशी अर्धपरिघाची रेषा उमटवताना दिसतो. कोरीचा चंद्रमा नभी असेल तर तो खरोखरीच चौदहवीं का चाँद म्हणजे अप्रतिम सौंदर्याचा नमूना दिसतो. पण अमावास्येच्या रात्री मनात जागते ती काळ्या रात्रीची काळी जादू. मग मनात भीती वाटते कुठे अडनीड, अनगड सुनसान जागी बस बंद पडली तर?  या कल्पनेनेच  मनात  भीती निर्माण होते. असं काही होऊ नये म्हणून मन प्रार्थना करू लागतं. भुताखेताच्या गोष्टींवर विश्वास नसला तरी त्या उगाच आठवू लागतात. सगळा मनाचा खेळ दुसरं काय.

 आजकाल रात्रीच्या प्रवासासाठी एसी व्हिडिओ बस किंवा स्लिपर कोच असतात त्या बसमध्ये एकतर खिडकी उघडता येत नाही. आणि आत लावलेला सिनेमा नावाचा प्रकार बघतच लोक झोपी जातात. मग बाहेरच्या अंधारात कशाला कोण डोकावतेय? रात्रीच्या निसर्गाशी भेट होतच नाही.

एकदा तर दाट झाडीत मला ख्रिसमस ट्री सारखं चमकणारं झाड दिसलं मग लक्षात आलं रानातल्या  काजव्यांनी   आपलं झाड झगमगून टाकलं होतं. अंधाराच्या पार्श्वभूमीवर ते फार सुंदर दिसत होतं. कट्यार काळजात घुसली चित्रपटातील त्या सीनची आठवण झाली. रात्र चढत जाते तसं चांदणं मोहरून येतं. लहान मुलांसारखे मनात प्रश्न उभे राहतात. कुणी बरं या टिकल्या लावल्या असतील आकाशीच्या काळ्या साडीवर आणि त्या पडत कशा नाहीत. आमच्या साडीवरच्या टिकल्या तर पडतच असतात. लहानपणी ऐकलेला कोड्यातला प्रश्न आठवतो, ‘सूप भर लाह्या, त्यात बंदा रुपया.’ 

वडाच्या दाट पारंब्याच्या झाडाखालून जाताना उगाच भीती दाटते मनात. या झाडावर अजून भुतंखेतं रहात असतील का? मग ते दिवसा कुठे जात असतील? त्यांना बहुतेक उजेडाचं वावडं असावं. म्हणून बहुतेक अमावास्येच्या रात्री मिट्ट काळोखात दिसत असावीत. आसमंतात निजलेली शांत नीरवता भरून राहिलेली असते, रातकिडयाची किरकिर चालू असते… बहुतेक त्यांचं प्रणयाराधन चालू असावं. सर्वांवर या चंद्र किरणांची जादू पसरलेली असते. चांदण्यांच्या वेगवेगळ्या आकारात चितारलेले नभ सारे चराचर जणू मंतरलेलं. स्तब्ध एक जादुई विश्वात रममाण झालेलं हे सर्व अनुभवण्यासाठी चंद्राच्या शीतल अमृतमय योगावरच प्रवास करावा. तनामनाला शांत करायची शक्ती त्यात असते. रात्र चढू लागते तशी डोळ्यात पेंग येऊ लागते. या सुखाच्या ग्लानीतच जाणवतं चांदण्या रात्री आकाशी झूलणाऱ्या चंद्राच्या झुंबराखालून प्रवास करणं म्हणजे रूप्याच्या वृष्टीतून घेतलेला एक अमृतानुभव असतो.


प्रतिभा कारंजकर, फोंडा.