प्रज्ञा, चंदनला तिहेरी किताब; अंशुमनला एकेरीत विजेतेपद

वायएमसीए अखिल गोवा मेजर मानांकन टेबल टेनिस स्पर्धा

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
05th July, 10:39 pm
प्रज्ञा, चंदनला तिहेरी किताब; अंशुमनला एकेरीत विजेतेपद

पणजी : ८व्या वायएमसीए अखिल गोवा मेजर मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत प्रज्ञा व चंदन यांनी तिहेरी किताब पटकावला तर अंशुमनने पुरुषांच्या एकेरीत विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा इनडोअर स्टेडियम, कांपाल-पणजी येथे खेळवण्यात आली होती.

अंशुमन अग्रवाल आणि प्रज्ञा कारो यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरी विजेतेपद पटकावत स्वर्गीय बाप्टिस्टा वाझ रोलिंग ट्रॉफी जिंकली. प्रज्ञाने स्पर्धेत चांगली कामगिरी केली आणि १७ वर्षांखालील आणि १९ वर्षांखालील मुलींमध्ये आणखी दोन विजेतेपदे मिळवून तिहेरी किताब जिंकला. चंदन कारोनेही तिहेरी किताब जिंकला. त्याने १३ वर्षांखालील, १५ वर्षांखालील आणि १९ वर्षांखालील मुलांच्या गटात विजेतेपद पटकावले.

वायएमसीए मेजर मानांक टूर्नामेंटमध्ये २०० पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये विविध वयोगटांमध्ये प्रभावी विजयांची मालिका आणि शानदार सामने पहायला मिळाले. ११ वर्षांखालील मुलींच्या गटात साची देसाईने इनारा डिसोझाचा ३-० (११-८, ११-७, ११-१) असा क्लीन स्वीप करून, तर युग प्रभूने कविश दळवीवर ३-० (११-३, ११-४, ११-६) असे वर्चस्व राखत मुलांच्या ११ वर्षांखालील गटात विजेतेपद पटकावले.

इशिता कुलासोने १३ वर्षांखालील मुलींच्या गटात अार्ना लोटलीकरचा ३-० (११-८, ११-१, ११-५) असा पराभव करून आपले कौशल्य दाखवले. चंदन कारोने १३ वर्षांखालील मुले आणि १५ वर्षांखालील गटात ध्रुव कामतचा ३-० (११-७, ११-३, ११-६) आणि रिशन शेखचा ३-१ (५-११, ११-८, ११-६) असा पराभव करत विजय मिळवला. नीझा कामतने इशिता कुलासोवर ३-० (११-८, ११-६, ११-२) अशी मात करून १५ वर्षांखालील मुलींचे विजेतेपद पटकावले.

मोठ्या वयोगटात प्रज्ञा कारोने १७ वर्षांखालील मुली आणि १९ वर्षांखालील मुलींचे विजेतेपद पटकावत इशिता कोलासोचा ३-१ (११-४, ११-७, ५-११, ११-५) आणि अनुश्री नाईकचा ३-० असा पराभव करत विजेतेपद पटकावले. अॅरोन फारियासने चंदन कारोचा ३-१ (९-११, ११-५, १२-१०, ११-७) पराभव करून मुलांच्या १७ वर्षांखालील गटातील विजेतेपद पटकावले तर चंदनने १९ वर्षांखालील मुलांच्या अंतिम फेरीत अॅरॉनविरुद्ध विजय मिळवला.गोवा टेबल टेनिस असोसिएशन आणि एसएजी यांच्या संयुक्त विद्यमाने वायएमसीए पणजीने ही स्पर्धा आयोजित केली होती. एका विशेष समारंभात पॅरा टेबल टेनिसमधील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदक विजेते लॉयड फर्नांडिसचा या खेळातील योगदान आणि कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला. वायएमसीएचे अॅड. जोसेफ वाझ, एल्विस गोम्स, क्लाइड लोबो, रॉय गॅस्पर, एरोल पायर्स, सानिल दा कोस्टा, अल्विटो डिसिल्वा आणि जीटीटीएचे सचिव ख्रिस्तोफर मिनेझिस हे समारोपीय कार्यक्रमाला उपस्थित होते.