गोवा : जेईईमुळे पुढे ढकलली बारावीची परीक्षा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
06th October, 12:04 am
गोवा : जेईईमुळे पुढे ढकलली बारावीची परीक्षा

पणजी : जानेवारी २०२५च्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या जेईई परीक्षेमुळे बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे १ फेब्रुवारी २०२५ रोजी सुरू होणारी ही परीक्षा १० फेब्रुवारी २०२५ रोजी सुरू होईल. परीक्षा २८ फेब्रुवारी रोजी संपणार आहे. यानुसार परीक्षेच्या वेळापत्रकात देखील बदल करण्यात आला आहे. गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने याबाबत नुकतेच पत्रक जारी केले आहे.
पत्रकात म्हटले की, जेईई परीक्षा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहेत. त्यानंतर १ फेब्रुवारी रोजी बारावीची परीक्षा होणार होती. हा कालावधी कमी असल्याने विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळत नाही. याबाबत लोकप्रतिनिधी, पालक, शाळांनी मंडळाकडे परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली होती. यावर विचार करून मंडळाने बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
नवीन वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांना बारावी परीक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा अवधी मिळणार आहे. मंडळाने जारी केलेल्या तात्पुरत्या वेळा पत्रकानुसार सोमवार १० फेब्रुवारी रोजी इंग्रजी आणि मराठी भाषा विषयाची परीक्षा होईल. ११ रोजी अर्थशास्त्र आणि शास्त्रीय संगीत, १२ रोजी बँकिंग , कॉम्प्युटर सायन्स, को ऑपरेशन, १४ रोजी मराठी दुसरी भाषा, १५ रोजी हिंदी दुसरी भाषा, १७ रोजी समाज शास्त्र, १८ रोजी भौतिकशास्त्र विषयाची परीक्षा होईल.